
डॉ. सुमंत पांडे
Water Conservation :ग्रामपंचायतीचे संरपंच आणि सर्व सदस्यांनी एकत्रपणे काम केल्यास गाव नक्की पाणीदार होऊ शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, कडवंची यांच्याप्रमाणे, किंबहुना यांच्यापासून प्रेरणा घेऊन पाणीदार झालेल्या गावांची संख्या निश्चितपणे वाढत आहे, ही सकारात्मक बाब आहे.
गाव पाणीदार होणे हे गावाची स्थिरता आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये दक्षिण-पश्चिम मॉन्सून प्रभावी असून, जून ते ऑक्टोबर असा त्याचा प्रवास आहे. पर्जन्य अनियमितता आणि पर्जन्य विचलनामुळे पाण्याच्या अनुपलब्धतेचा कालावधी वाढतो आहे. जर तो अवर्षण प्रवण क्षेत्र किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेला भूभाग असेल तर या ठिकाणी चार ते सहा महिने पाण्याची तीव्र स्वरूपात टंचाई जाणवते. जर आधीच्या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल तर हाच टंचाईचा कालावधी चार ते सहा महिने एवढा असतो. सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तर भूपृष्ठ जल डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये उपलब्ध असल्याचे जाणवते.
ज्या गावांमध्ये चार ते सहा महिने हा कालावधी तीव्र टंचाईच्या स्वरूपात असेल तर अशा गावातून अपरिहार्य स्थलांतर हे अधिक असते. अशा प्रकारच्या टंचाईची वारंवारता सलग दोन-तीन वर्ष जाणवल्यास तात्पुरत्या स्वरूपाचे स्थलांतर हे कायमस्वरूपी स्थलांतर होण्याची शक्यता अधिक असते, असा अभ्यास सांगतो. महाराष्ट्रामध्ये अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये हे प्रमाण अधिक आढळते. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये ज्या कुटुंबाला गावामध्ये स्थायी स्वरूपाची स्थावर आणि जंगम मालमत्ता नसेल ते कुटुंब सर्वात आधी गाव सोडते.
राज्यातील स्थिती ः
महाराष्ट्रामध्ये २०१४- १५ या वर्षात सुमारे १५१ तालुक्यांतील पाच हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई होती. महाराष्ट्र पाणीदार करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २०१५ मध्ये सुरू झाले. सध्या जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू आहे. गाव पाणीदार करण्यासाठी गावाचा सरपंचाकडे आराखडा असणे आवश्यक आहे. सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्रपणे काम केल्यास गाव नक्की पाणीदार होऊ शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, कडवंची यांच्याप्रमाणे किंबहुना यांच्यापासून प्रेरणा घेऊन पाणीदार झालेल्या गावांची संख्या निश्चितपणे वाढते आहे. राज्यात पाणीदार गावांची उदाहरणे तयार झाली आहेत.
गावातील महत्त्वाच्या नोंदी ः
सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांसमोर गावातील समस्यांची तीव्रता आणि त्या सोडविण्याचा प्राधान्यक्रम असला पाहिजे.
हवामान विषयक माहिती ः
१.गाव कोणत्या नदी खोऱ्यात येते?
२.गावातील पर्जन्यमान किती?
३.पर्जन्याचा कालावधी?
४.किती दिवस पाऊस पडतो आणि तो कसा पडतो?
५.सरासरी तापमान किती असते? उन्हाळ्यात कमाल तापमान किती असते?
६. गावातील जलस्रोतांच्या नोंदी (विहिरी, तलाव), तलावाची साठवण क्षमता.
जमिनीविषयक माहिती ः
- गावातील एकूण जमीन किती?
- पिकाखालील जमीन किती?
- वन जमीन किती?
- गावालगत डोंगर किंवा उंच भाग आहे का?
- सरासरी उतार किती आहे?
लोकसंख्येची शास्त्रीय आणि इतर माहिती :
- गावातील कुटुंब संख्या आणि लोकसंख्या.
- पशुधनाची संख्या.
- व्यावसायिक दुकानदार.
- शाळा, महाविद्यालय.
- उद्योग, व्यवसाय.
- गाव जर तीर्थक्षेत्र असेल तर उत्सवाचे दिवस कधी असतात?
- उत्सव, आठवडी बाजाराच्या काळात किती लोक गावाला भेट देतात?
पावसाच्या नोंदी ः
गावामध्ये पर्जन्य मापक असल्यास योग्य आणि अचूक माहिती गावामध्ये उपलब्ध होते. अन्यथा, पर्जन्याची माहिती हवामान विभाग किंवा कृषी विभागातर्फे उपलब्ध होवू शकते. इतर सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे असते. ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती वेळोवेळी अद्ययावत झाली किंवा नाही याची खातरजमा करावी.
पर्जन्य नोंदवही ः
- पावसाच्या कालावधीचे दिवस.
- एकूण पर्जन्यमान.
- अवर्षणाचा कालावधी.
- पाऊस नसण्याचा दिवसाचा तपशील.
हिवरे बाजार गावामध्ये पावसाच्या नोंदी शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने घेतल्या जातात. हिवरे बाजार गावामध्ये तीन सूक्ष्म पाणलोट आहेत. या प्रत्येक पाणलोटामध्ये ग्रामपंचायतीने पर्जन्यमापक बसवलेले आहेत. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकामधील दैनंदिन पावसाची नोंद शाळेत येण्याच्या आधी मुलांनी घेणे बंधनकारक आहे.
दरवर्षी ही जबाबदारी नवीन विद्यार्थ्याला दिली जाते. शाळेत आल्यानंतर संबंधित विद्यार्थी मोजलेल्या पावसाची आकडेवारी शिक्षकांकडे देतात. शिक्षक त्याची नोंद पर्जन्य नोंदवहीत करतात. पाण्याचा ताळेबंद काढून तोच ग्रामसभेपुढे पुढील नियोजनासाठी ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे गावातील सज्जनशक्ती आणि विद्यार्थी शक्ती एका निश्चित दिशेला मार्गक्रमण करते, जी गाव किंवा गावाला जल आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी नक्कीच मदत करते.
अशारीतीने मोजलेल्या पावसाच्या नोंदी गावामध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अंदाज सांगतात. पावसाच्या नोंदीची माहिती समोर असेल तर त्याचा उपयोग पाण्याचा ताळेबंद करून लोकांच्या समोर ग्रामसभेमध्ये मांडता येतो. त्याआधारे रब्बी पेरणीचा हंगाम निश्चित करता येतो. म्हणजेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय शेतकरी आणि ग्रामस्थांना लागते. पाण्याचा ताळेबंद उणे असेल तर मात्र वाहून जाणाऱ्या पावसाची (अपघाव) मोजदाद करता येते. हा अपधाव कसा अडविता येऊ शकेल? यासाठीची उपचार पद्धती निश्चित करता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.