Dendrobium Umbellate In Kolhapur : कोल्हापूर शहरातील वृक्षसंपदेचा अभ्यास करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना ‘हॉर्स बूश’ अर्थात ‘पांढरा चिकटा’ वृक्ष मंगळवार पेठेतील दत्त कॉलनी येथे प्रकाश चव्हाण यांच्या घराजवळ आढळला. चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी नर्सरीमधून त्याचे रोपटे आणले होते. त्याची वाढ झाली आहे. वृक्ष मूळचा ऑस्ट्रेलिया खंडातील असून तो आफ्रिका, आशिया, पॅसिफिक आयलँड्स भागात पाहावयास मिळतो. त्याचे शास्त्रीय नाव डेन्ड्रोलोबीयम अंबेल्याटम आहे. स्थानिक भाषेत त्याला पांढरा चिकटा, म्हटले जाते.
या वृक्षाच्या नावाचा डेन्ड्रोलोबीयम याचा अर्थ डेन्ड्रॉस म्हणजे ट्री अर्थात वृक्ष आणि लोबीयम म्हणजे शेंगाधारी असा आहे. याच्या प्रजातीस उच्छत्र (अंबेल) प्रकारच्या फुलोऱ्यावरून अंबेल्याटम नाव दिले गेले आहे. पांढरे फूल असलेल्या झाडाच्या शेंगा कपड्यांना चिकटतात. त्यामुळे याला पांढरा चिकटा, असे स्थानिक नाव पडले असावे.
जगभरात डेन्ड्रोलोबीयमच्या सुमारे १८ प्रजाती पाहावयास मिळतात. त्यापैकी डेन्ड्रोलोबीयम अंबेल्याटम ही एकमेव प्रजात समुद्रकिनारी वाढणारी आहे. त्याची नोंद महाराष्ट्र राज्याच्या वनस्पती कोशात असून, कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशात नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पांढरा चिकटा या वृक्षाची नोंद होत आहे.
हा वृक्ष साधारणपणे ९ ते १२ फूट उंच वाढतो. याची साल राखाडी रंगाची असते. या झाडाची पाने पोपटी रंगाची आणि संयुक्त असून ती त्रिपर्णी असतात. टोकाकडील पर्णिका अंडाकृती असून, बाजूच्या दोन पर्णिका थोड्या निमुळत्या असतात.
फुलोरा पानांच्या बेचक्यात येत असून, फुले पांढऱ्या रंगाची करंजीच्या फुलांप्रमाणे असतात. फुले १ ते १.५ सेंटिमीटर आकाराची असतात. याची शेंग मालाशिंबा (मण्यांच्या माळेप्रमाणे दिसणारी) प्रकारची आणि दोन्ही बाजूने चपटी व वक्र असते. ३ ते ४ सेंटिमीटर लांब असलेली शेंग पक्व झाल्यावर तिचे सुट्या मण्यासारखे ४ ते ५ एकबीजी तुकडे सांध्यातून अलग होतात. बिया किडनीच्या आकाराच्या असून, त्या गडद चॉकलेटी ते काळ्या रंगाच्या असतात. वृक्षाला वर्षभर फुले-फळे पाहावयास मिळतात.
वनस्पतीची वैशिष्ट्ये
पांढरा चिकटा वृक्षाचा उपयोग शोभेसाठी
लाकूड टणक आणि टिकाऊ
लाकडाचा उपयोग छोटे खांब बनविण्यासाठी आणि इंधन म्हणून
समुद्र किनारे, वाळूच्या ढिगाच्या बाजूला धूप नियंत्रणासाठी
लागवडीच्या संरक्षणासाठी उपयोग
औषधी गुणांचा उपयोग ताप, मलेरिया, डोकेदुखी, प्लिहावृद्धीमध्ये
सूक्ष्म जीव प्रतिबंध गुणधर्मांचा आढळ
शहरातील वृक्ष गणना होणे आवश्यक आहे. त्यातून दुर्मीळ वृक्ष संपदेच्या वारशाची नोंद होईल. अनेक दुर्मीळ वृक्षांच्या बिया गोळा करून त्यांची रोपे तयार करता येतील आणि योग्य त्या ठिकाणी त्या पेरता येतील. या प्रकारे त्यांचे जतन आणि संवर्धन करणे सोपे होईल.
-डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पती अभ्यासक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.