Pune News : मागील काही महिन्यांपासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे निर्यात कमी होत आहे. पण देशातील मक्याचा वापर वाढल्याने मागणी चांगली राहू शकते.
त्यातच इथेनाॅलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज असून याचा आधार मका बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील मका उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात देशात ३५९ लाख टन मका उत्पादन झाले होते. ते यंदा ३४३ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन घटण्याचे महत्वाचे कारण आहे.
महत्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये उत्पादकता घडल्याचे. यंदा खरिप हंगामात पाऊस कमी होता. याचा फटका मका पिकाला बसला. तसेच लागवडही काही प्रमाणात घटली होती. यामुळे एकूणच उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव दबावात आहेत. मक्याचा बाजार अपेक्षेपेक्षाही कमी पातळीवर असल्याचे अभ्यासक सांगतात. पण देशात मात्र मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भावापेक्षा काहीसे अधिक होते.
म्हणजेच देशातील मका निर्यातीसाठी स्पर्धात्मक नव्हता. त्यामुळे नेपाळ, भुतान, बांगलादेश आणि श्रीलंका असे शेजारच्या देशांना भारताचा मका घेणे परवडत नव्हते. त्यामुळे निर्यात गेल्यावर्षीपेक्षा कमी दिसत आहे.
देशात ऑगस्ट महिन्यापासून मक्याचे भाव काहीसे वाढले आहेत. पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव कमी होत गेले. त्यामुळे भारताचा मका आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत गेला. सध्या शेजारच्या दक्षिण आशियातील बाजारात मक्याचे जे भाव आहेत त्याच्या तुलनेत भारताच्या मक्याचे भाव टनामागे २० ते ३० डाॅलरने अधिक आहेत.
त्यामुळे देशातून होणारी मक्याची निर्यात कमी झाली. देशातून मागील हंगामात जवळपास ३२ लाख टन मका निर्यात झाली होती. तर यंदा निर्यात ३१ लाख टनांवर स्थिरावू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मक्याला उठाव मिळू शकतो?
केंद्र सरकारने थेट ऊस आणि उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मीती बंद करण्याचा निर्णय घेतला. पण देशातील इथेनाॅल उत्पादन घटणार नाही, असाही दावा सरकारने केला. यामुळे धान्यापासून इथेनाॅल निर्मिती वाढू शकते.
पण देशात केवळ मक्याचा पुरवठा चांगला दिसतो आणि किमतीही नियंत्रणात आहेत. त्यामुळे इथेनाॅलसाठी मक्याचा वापर वाढू शकतो. एक टन मक्यापासून ३७० लिटर इथेनाॅल मिळते. यामुळे मक्याला इथेनाॅलसाठी मागणी वाढू शकते, असे झाल्यास पुढील काळातही देशातील बाजारातील भाव चांगले राहू शकतात, असा अंदाज आहे.
यंदा वापर कसा राहू शकतो?
देशात यंदा ३२५ लाख टन मक्याचा वापर होण्याचा अंदाज आहे. यापैकी २०० लाख टन पशुखाद्यसाठी होऊ शकतो तर १२५ लाख टन मानवी आहार, बियाणे आणि औद्योगिक वापरासाठी होऊ शकतो, असाही अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.