
Nagpur News : श्रावण महिना सुरू झाला असून नागपंचमीपाठोपाठ नारळी पौर्णिमा या सणांच्या निमित्ताने नारळाची मागणी वाढली आहे. यंदा उत्पादन चांगले असल्याने नारळाचे भाव स्थिरावलेले असून सध्या दररोज एक लाखांच्या जवळपास नारळाची विक्री होत आहे. किरकोळमध्ये दर ३० रुपयांपर्यंत मिळत आहेत.
चातुर्मासात अनेक धार्मिक व्रतवैकल्ये असल्यामुळे पूजेसाठी नारळांना अधिक मागणी असते. चातुर्मासात नागपुरात साडेतीन लाखांपर्यंत नारळाची विक्री होते. शहरात तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि गोवा येथून नारळांची आवक होते. चारही राज्यांत उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे आवकही सुरू झाली आहे.
दररोज शहरात सात ते आठ गाड्यांची आवक सुरू आहे. पूर्वीच्या तुलनेत नारळाचे व्यापारीही कमी झाले आहेत. सध्या १० ते १२ व्यापारी हा व्यापार करीत आहेत. भाव यंदा स्थिरावलेले आहेत. आषाढी एकादशीच्या दरम्यान पाऊस सुरू असल्याने मागणी कमी झालेली होती. मात्र, आता नारळाला भाविकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे.
सध्या बाजारात सुक्या आणि ओल्या नाराळाची आवक होत आहे. १०० भरतीच्या ओल्या नारळाची किंमत १३००-१५०० रुपये आहे. तर मध्यम आकारातील १२० ते १५० भरतीच्या नारळाची किंमत १५०० ते १८०० रुपये आहे. या नारळ ठोकमध्ये नगाला १६ ते २२ रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. आवक चांगली असल्याने भविष्यात भाववाढ होण्याची शक्यता धूसर आहे.
नागपूर ही मध्य भारतातील मुख्य बाजारपेठ होती. मात्र, हळू-हळू नागपूरची बाजारपेठ आजूबाजूच्या शहरांमध्ये विस्तारली. आता बाहेरून येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी शहरात दररोज २० ते २५ ट्रक नारळांची आवक होती. प्रत्येक ट्रकमागे सहा ते साडेसहा लाख दराने एकूण दोन ते अडीच कोटींची उलाढाल व्हायची. नागपुरातून संपूर्ण विदर्भात नारळ विक्रीस जायचे. पण आता तेथील व्यापाऱ्यांनी चारही राज्यांतून नारळांची खरेदी वाढविल्यामुळे नागपुरातून जावक कमी झाली आहे. शहरातील नारळाचा व्यापार अर्ध्यावर आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.