Nanded News : हवामान विभागाने यंदा भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यात दरवर्षी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खतांची तजवीज केली आहे. पण, मृग नक्षत्राचे १२ दिवस उलटूनही पेरणीसाठी जमिनीला लागणारा १०० मिलिमीटर पाऊस पडला नाही.
पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एक ते १६ जूनपर्यंत सरासरी ८८.१० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र सरासरी ६८.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेत २० मिलिमीटर पावसाची तूट आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बी-बियाणे, रासायनिक खतांचा भरणा केला आहे. पीककर्ज अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही, तरी शेतकऱ्यांनी पेरणीची तजवीज केली.
जिल्ह्यात अधूनमधून कुठेतरी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, बिलोली, किनवट, देगलूर तालुक्यांत रविवारी (ता. १६) पाऊस झाला.
मुखेड तालुक्यातील जाहूर मंडलात ६७.५० मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी (ता. १७) सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पडणाऱ्या पावसापेक्षा २० मिलिमीटर पाऊस कमी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
एक ते १६ जूनपर्यंत सरासरी ८८.१० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र सरासरी ६८.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेत २० मिलिमीटर पावसाची तूट आहे. २२ जूनपर्यंत मृग नक्षत्र आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस ही तूट कदाचित भरून निघेलही, मात्र काही दिवसांपासून जिल्ह्यात ठरावीक ठिकाणीच पाऊस पडत आहे.
त्यामुळे त्या भागातच कापूस व हळदीची लागवड करण्यात आली आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. परंतु, अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.
पाच मंडलांत ९० ते १०० मिलिमीटर पाऊस
९३ मंडळांपैकी पाच मंडलांतच ९० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सलग पाऊस नाही. जमीन कोरडी आहे.
सलग १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करणे योग्य राहील; तसेच १५ जुलैपर्यंत पेरणी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करून नये, असे आवाहन बऱ्हाटे यांनी केले.
तालुकानिहाय अपेक्षित व प्रत्यक्षातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका अपेक्षित प्रत्यक्ष
नांदेड ७८.२० ७१.१०
बिलोली ८५.१० ७४.३०
मुखेड ७१.१० ११७.५०
कंधार ८०.१० ९६.८०
लोहा ७१.१० ९५.३०
हदगाव ९४.६० ६०.८०
भोकर १०० ५४.५०
देगलूर ७८.४० ६३.६०
किनवट १०७.४० ४४.८०
मुदखेड ६८.२० १००.५०
हिमायतनगर ९०.१० ३२.६०
माहूर १३७.६० २४.५०
धर्माबाद ८३.८० ५४.२०
उमरी ७५.१० ३५.६०
अर्धापूर ६२.६० ८९.३०
नायगाव ४४.४० ३६.८०
सरासरी ८८.१० ६८.२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.