Food Processing : चिक्की, लाडू उत्पादनांनी जागवली ‘उमंग’

Processing Industry : चिकाटी, जिद्द, उद्योगशील वृत्ती व ‘मार्केटिंग’ कौशल्यातून संभाजी यांनी व्यवसायात जम बसवीत आश्‍वासक उलाढालीसह यशाची उमंग जागविली आहे.
Food Processing
Food Processing Agrowon

माणिक रासवे

Groundnut Processing : परभणी जिल्ह्यातील डासाळा (ता. सेलू) येथील संभाजी गजमल या युवकाने नोकरीसाठी पुणे गाठले खरे. पण लॉकडाउनमध्ये घरी परतावे लागले. याच काळात शेंगदाणा लाडू व चिक्कीनिर्मितीची दिशा त्याला मिळाली. त्यानंतर चिकाटी, जिद्द, उद्योगशील वृत्ती व ‘मार्केटिंग’ कौशल्यातून संभाजी यांनी व्यवसायात जम बसवीत आश्‍वासक उलाढालीसह यशाची उमंग जागविली आहे.

परभणी जिल्ह्यात डासाळा (ता. सेलू) येथील शिवाजीराव गजमल यांची १२ एकर शेती आहे. हंगामी पिके व अडीच एकर सीताफळ आहे. त्यांचा मुलगा संभाजी यांनी सेलू येथून २०१६ मध्ये बी.एस्सी. पदवी संपादन केली. पुढे पुणे येथे रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापकाची नोकरी पटकाविली. पण २०२० मध्ये ‘लॉकडाउन’ सुरू झाल्यानंतर ते गावी परतले. दरम्यानच्या काळात लग्न झाले. वडिलांसोबत शेती करू लागले. परंतु जिरायती क्षेत्रातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे उद्योगाचे पर्याय शोधले. त्यातून शेंगदाणा लाडू व चिक्कीनिर्मिती उद्योग आश्‍वासक वाटला. सन २०२० च्या सप्टेंबरमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडे उमंग ब्रॅण्डने नोंदणी व परवाना प्राप्त केला.

उद्योगातील वाटचाल

डासाळा गावी शेताजवळ छोटे युनिट उभारून चिक्कीनिर्मिती सुरू केली. गाव परिसरातील किराणा दुकानावर स्वतः पोहोच देत विक्री सुरू केली. सुरुवातीला मागणी कमी असल्याने आठवड्यातील तीन दिवस उत्पादन व तीन दिवस विक्री असे नियोजन होते. महिन्याला १० ते १५ हजार रुपयांपर्यंतच उलाढाल व्हायची. हळूहळू परिसरातील किराणा माल विक्रेत्यांशी परिचय झाला. दर्जा उत्कृष्ट ठेवल्याने चिक्कीला मागणी वाढली. एकाच महिन्यात २५ ते ४० हजार रुपयांची विक्री झाल्याचा एक अनुभव आत्मविश्‍वास वाढवून गेला. मग शेंगदाणा व तीळ लाडूनिर्मितीला सुरुवात केली.

Food Processing
Food Processing : औद्योगिक अवलंबनावर परिणाम करणारे घटक

उद्योगात वाढ

मागणी वाढू लागली तसे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्य राबत होतेच. गावातील दोन व्यक्तींनाही रोजगार दिला. संभाजी स्वतः दुचाकीवर चिक्की व लाडू घेऊन निघायचे. सेलू तालुक्यांतील विविध गावे, परभणी शहर, जिंतूर तालुका, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यांतील गावे आदी ठिकाणी फिरून विक्री करायचे. महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडू लागले. गावी म्हणजे युनिट असलेल्या ठिकाणी भारनियमनाची समस्या येऊ लागली.
मग २०२२ च्या दरम्यान युनिटचे स्थलांतर सेलू शहरात केले.

Food Processing
Food Processing : पदार्थातील पोषक घटकांची उपलब्धता वाढवायची कशी

आजचा प्रक्रिया उद्योग दृष्टिक्षेपात

-चिक्कीचे शेंगदाणा, तीळ, राजगिरा, खोबरा, स्पेशल काजू, ड्रायफ्रूट आदी, तर लाडूचेही शेंगदाणा, तीळ, ड्रायफ्रूट आदी प्रकार.
-चिक्कीचे दर प्रकारानुसार अंदाजे प्रति किलो ३६० रुपये. ड्रायफ्रूट चिक्की- सुमारे १२०० रु.
-ड्रायफ्रूट चिक्की निर्मितीसाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर आदींचा वापर.
-सर्व प्रकारच्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन मोठ्या पॅकिंगपासून ते २५० ग्रॅम, ५०, ८० ग्रॅमपर्यंत छोटे पॅकिंगही.
-उत्पादनांमध्ये रासायनिक ‘प्रिझर्व्हेटिव्हज’ किंवा रंगद्रव्ये यांचा समावेश नाही. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला गूळ, वेलची पावडर यांच्या वापरामुळे उत्पादनांना विशिष्ट चव प्राप्त झाली आहे.
-कच्च्या मालाची जालना येथून खरेदी.
-प्लॅस्टिकचे गोल, चौकोनी कंटेनर, कागदी बॉक्स, प्लॅस्टिक बरण्यांमधून उमंग ब्रॅण्डने विक्री.

विक्री व्यवस्था उभारली

संभाजी स्वतः विविध ठिकाणच्या विक्रेत्यांपर्यंत उत्पादने पोहोच करतातच. आता त्यांच्या उमंग ब्रँडची चिक्की व लाडू मनमाड ते नांदेड रेल्वे मार्गावरील जालना, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड या रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्सवर उपलब्ध आहेत. कामगरांच्या साह्याने रेल्वेच्या वातानुकूलित कोचपर्यंतही विक्री होते. अशा रीतीने रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून मोठा ग्राहक वर्ग मिळाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आदी शहरे तसेच मॉल्स, छोटी किराणा दुकाने (डेली नीड्स साठीची), रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणीही विक्री होते. महिन्यातून सुमारे २४ दिवस चिक्कीची निर्मिती होते.

घरच्यांची मिळाली साथ

वडील शिवाजीराव, आई सिंधू तसेच पत्नी कांचन हे कुटुंबातील सर्व सदस्यदेखील उद्योगात राबतात.
संभाजी यांचे धाकटे बंधू नारायण पुणे येथे ‘शेफ’ असून, त्यांची देखील उत्पादनांच्या विकासात मदत होते. उद्योगातून दोन पुरुष व दोन महिलांना रोजगार मिळाला आहे. सर्वांच्या एकत्रित कामांमधूनच
एकेकाळी ३० हजारांवर सुरू केलेला व्यवसाय आता महिन्याला दोन लाख रुपयांची उलाढाल करू लागला आहे, याचे संभाजी यांना समाधान आहे. येत्या काही दिवसांत ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील कंपन्यांकडेही उत्पादने उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

यांत्रिकीकरण

-२०२१ मध्ये देऊळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेकडून मुद्रा योजनेअंतर्गत सव्वा लाख
रुपये मध्यम मुदतीचे कर्ज व अडीच लाख रुपये ‘कॅश-क्रेडिट’ उपलब्ध झाले. त्यामुळे
यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य झाले.
-पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफई) अंतर्गत परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे
गृहविज्ञान विशेषज्ञ डॉ. अरुणा खरवडे यांचे मार्गदर्शन. या अंतर्गत प्रकल्प सादरीकरणानंतर एका बँकेकडून ८० हजार रुपये कर्ज मंजूर.
-सध्या शेंगदाण्याची टरफले काढण्यासाठी पिलिंग यंत्र, रोस्टर व विशिष्ट आकार, वजनाच्या वड्या तयार करण्यासाठी हातचलित साधन.

संभाजी गजमल, ९९६००१२८३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com