Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर पिके मातीमोल

Heavy Rain Crop Damage : दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शिवाय, शेडनेटमध्ये होणाऱ्या संरक्षित शेतीची धूळधाण झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शिवाय, शेडनेटमध्ये होणाऱ्या संरक्षित शेतीची धूळधाण झाली.

या दोन दिवसांत वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत सुमारे १०० पेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्या दगावल्या. वाशीम जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता.२८) पहाटे पुन्हा जोरदार पाऊस झाला आहे. त्यात बुलडाण्यात पुन्हा २०११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

बुलडाणा जिल्ह्यात रविवार (ता. २६)पासून पावसाने ठाण मांडले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या संकटामुळे प्रामुख्याने कपाशी, तूर, कांदा, मका, भाजीपाला, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सोमवारी (ता.२७) रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

नांदुरा तालुक्यात १० हजार ६७० हेक्टरवरील कपाशी, तूर, फळपीक, संग्रामपूरमध्ये टोमॅटो, मिरचीचे २१ हेक्टरवर, लोणारमध्ये ७६०० हेक्टरवरील तुरीचे, सिंदखेडराजात ७९८५ हेक्टरवर गहू, कांदा, भाजीपाला, फळपिकांचे तर देऊळगावराजा तालुक्यात ७६१० हेक्टरवरील फळपिके, रब्बी ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठांना अहवाल देण्यात आला आहे.

Crop Damage
Crop Damage : पावसामुळे भात, स्ट्रॅाबेरीचे नुकसान ; रब्बी पिकांना मात्र दिलासा

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा या तालुक्यांत शेडनेटमधील संरक्षित शेतीला पाऊस, गारपीट व वादळाचा फटका बसला. जीआय स्ट्रक्चरमधील ४७ शेडनेट जमीनदोस्त झाले. तर बांबू स्ट्रक्चर असलेले ९५९ शेडनेट जमिनीवर आले.

यात लोणारमध्ये २४८, देऊळगावराजा २११, सिंदखेडराजा ५०० शेडनेटचा समावेश आहे. दोन्ही मिळून १००६ शेडनेट व १३२ हेक्टरवरील बीजोत्पादनाचे नुकसान झाले. शेडनेट नुकसानाची बाब ‘एनडीआरएफ’च्या निकषात बसत नाही. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनेनंतर प्रशासनाने याबाबतचा अहवाल बनवित शासनाला कळविले आहे.

पळसखेड चक्का गारपिटीचे केंद्र

सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा परिसरातील पळसखेड चक्का, पिंपळगावलेंडी व इतर गावांत रविवारी (ता. २६) मध्यरात्रीनंतर जोरदार गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. किनगावराजा, पांगरी उगले, उमरद, जांभोरा, रुम्हणा, सोनोशी, राहेरी खुर्द, राहेरी बुद्रुक, हिवरखेड पूर्णा, विझोरा, निमगाव वायाळ, साठेगाव, पिंपळगाव लेंडी, शेलगाव राऊत, पळसखेड चक्का, सावखेड तेजन यासह असंख्य गावांना फटका बसला. पळसखेड येथे मोठ्या आकाराची गारपीट झाली.

Crop Damage
Heavy Rain : अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरवर पिके वाया

वीज पडून शेतकरी दगावला

वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील शेतकरी प्रकाशराव सरनाईक (वय ५१) यांचा वीज पडून मृत्यू झाला. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे गारपिटीने ८ मेंढ्यांचा, कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे २५, दापूरा येथे ३० तर शहा येथे ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला.

पंचनामे करण्याचे आदेश

अकोला जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या पावसाने शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. शेती व फळपिकांच्या नुकसानीबाबत तातडीने सविस्तर पंचनामे व सर्वेक्षण करावे. तालुकास्तरावर संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश कुंभार यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

अंदाजे ४ हजार ६०८ हेक्टरी शेतजमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात ४ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे, तर तेल्हारा तालुक्यात ३२ हेक्टरवर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

बाळापूर तालुक्यात गायगावात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या २० मेंढ्या दगावल्या. पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांची एक गाय दगावली.

२४ तासांत पुन्हा सर्वत्र पाऊस

अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत बहुतांश मंडलांमध्ये पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अकोट तालुक्यात २७, तेल्हारा २४.८, बाळापूर २३.४, पातूर २०.६, अकोला २०.४ , बार्शीटाकळी ११.९, मूर्तिजापूर १६.९, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद ३५.३, संग्रामपूर ३२.८, चिखली १९.६, बुलडाणा १३.९, देऊळगावराजा १९.९, मेहकर २३.७, सिंदखेडराजा २२.७, लोणार १२.७, खामगाव २४.५, शेगाव ३३.७, मलकापूर २४.७, मोताळा २०, नांदुरा १४.२, वाशीम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. वाशीममध्ये ३४.८, रिसोड ३०.५, मालेगाव ३९.४, मंगरूळपीर ४६.७, मानोरा २९, कारंजा ३९.७ मिलिमीटर असा दमदार पाऊस झाला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आधी पाऊस झाला नाही म्हणून नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्याला आता पावसाने मोठा फटका बसला आहे. प्रशासनास पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार, सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com