Satara News : जिल्ह्यात शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जावळी तालुक्यात काढणीला आलेल्या भाताचे तसेच स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात रविवारी रात्री जावळी तालुक्यातील मेढा व केळघर परिसरात जोरदार पाऊस झाला. या अवेळी पडलेल्या पावसाने या परिसरात ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण केली आहे. भातशेतीचे नुकसान झाले आहे तर ऊस, ज्वारी इत्यादी पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.
या परिसरात सध्या भात काढणीला वेग आला आहे. काही ठिकाणी काढून ठेवलेले भात पीक भिजले आहे. याशिवाय जनावरांना खाण्यासाठी ठेवलेली भाताची वैरणही भिजली आहे. स्ट्रॅाबेरीस फूलकळी गळती, पाणी साचल्याने मर, फळकुज तसेच ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री जावळी, सातारा, वाई, पाटण आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर मंडलात ७४.३, तर वाई तालुक्यातील ओझर्डे मंडलात ७३.० मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात पावसाळी वातावरण झाले होते.
शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सातारा शहरासह इतर तालुक्यांत हलक्या पावसाला सुरवात झाली. अल्पावधीतच सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटात पावसाने संपूर्ण परिसर व्यापला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.