Animal Census : नियमित गणना हाच पशुधनाचा आरसा

21st Livestock Census : पशुगणना केवळ पारंपरिकता ते आधुनिकता यांच्यातील सांधा दर्शविणारी नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेस रोजगार, अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य यांच्या भविष्यकालीन व्यवस्थापनेसाठी पशुधनाचा आरसा ठरणार आहे.
Animals
AnimalsAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर, डॉ. स्नेहल पाटील

Livestock Update : केंद्र शासनाने नुकतीच २१ व्या देशव्यापी पशुगणना अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे २०० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ ‘वसुबारस' सणाच्या पूर्वकाळात होत आहे. पशुधनाच्या साथीच्या आजाराच्या नियंत्रणासाठी आणि निरोगी पशुधनासाठी पशुगणना अभियानासह भारत सरकारने ‘पॅंडेमिक फंड प्रोजेक्ट’ या पशू आरोग्य सुरक्षा बळकटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.

पशुधन आणि भारतीय परंपरा

उत्सवप्रिय भारत देशात निसर्गचक्राचे संतुलन करणाऱ्या घटकांचे स्मरण येणाऱ्या पिढ्यांनी ठेवावे यासाठी प्रत्येक सण उत्सवाला रूढी परंपरेचे कोंदण भारतीय संस्कृतीत आपल्याला दिसून येते. शेतकरी बांधवांचा सखा असलेल्या बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जसा पोळा साजरा केला जातो, तसाच गाईचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी ‘गोवत्स द्वादशी’ म्हणजेच ‘वसुबारस’ हा उत्सव साजरा केला जातो.

वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. वसुबारस या सणाला सवत्स गाईची पूजा केली जाते. पाडसासह धेनू ही समृद्धतेचे, संपन्नतेचे आणि सुफलतेचे प्रतीक समजले जाते.

वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेले भारतीय गोधन हा आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. म्हणून वसुबारस हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस खऱ्या अर्थाने संपन्न भारतीय गोसंपदेचा गौरवोत्सव म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिवाळीपूर्वी अनेक पशुपालक ‘वाडगा पूजन’ करतात. पशुधनाच्या गोठ्यास म्हणजे वाडग्यास शेणाने छान सारवून स्वच्छ केले जाते. शेणामातीने सारवताना गोठ्यातील लहानसहान भेगा बुजल्या जातात आणि त्यात होणारी गोचीड, पिसवांची पैदास प्रतिबंधित होऊन संक्रमक आजारास आळा घातला जातो, कदाचित हे वैज्ञानिक ज्ञान पूर्वजांना असेल म्हणून अशा परंपरांचा जन्म झाला असावा.

Animals
Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

पशुगणनेचे महत्त्व

भारतात पशुगणनेचा पाया ब्रिटिश काळात घातला गेला. १९१९ साली पहिली पशुगणना झाली आणि दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. विविध पशुधनाच्या जाती, वय, लिंग इत्यादी घटकनिहाय नोंदीवरून कृषी, रोजगार, प्राणिज प्रथिने, अन्नसुरक्षा, पशुधन व्यापार वगैरे बाबींचे तपशीलवार नियोजन करणे सोयीचे ठरते.

केवळ पशुधनाच्या संख्यात्मक घडामोडीच नाही तर विविध भागांतील बाजारपेठेत असणारे ग्राहकाच्या पसंतीचे चढ-उतार लक्षात येतात. पशुधन आणि पशुपालक यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक आर्थिक तरतुदी, सेवा आणि गरजांचे नेमके चित्र स्पष्ट होते. याशिवाय जागतिक पातळीवर अन्न व कृषी संघटना आणि तत्सम यंत्रणांना पशुगणना अहवाल देणे बंधनकारक असल्याने पशुगणना नियोजनात्मक पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. आज भारतातील ६० टक्के लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उपजीविकेचे साधन म्हणून ज्ञात असलेले

‘पशुपालन क्षेत्र’ हे गेल्या पाच वर्षापासून स्थिर संयुक्त वार्षिक वृद्धिदर (६ टक्के) असलेले ‘रोजगाराचे आश्वासक क्षेत्र' म्हणून पुढे आले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि उत्पादनक्षमता असलेली जातिवंत जनावरे मात्र आजमितीला अनेक कारणांनी दुर्मिळ झाली आहेत. पशुपालक समाजाची भटकी जीवनशैली, व्यावसायिक मानसिकतेतून आणि स्थानिक देशी गोवंशाच्या कमी उत्पादन मर्यादेमुळे अधिक दूध उत्पादनाच्या हव्यासातून झालेले संकरीकरण, यांत्रिकीकरणामुळे बैलांची घटती मागणी, चराई क्षेत्राची घसरण, लागणारे मनुष्यबळ आणि उत्पादनाचा खर्च अशा अनेक कारणांनी दिवसेंदिवस शुद्ध गुणधर्म असलेल्या जातिवंत गोधनाची संख्या कमी होत आहे.

बाजारपेठेत जातिवंत गाई किंवा बैलजोड्या मिळत नसल्याची पशुपालक सार्वत्रिक तक्रार करताना दिसतात. याचप्रकारे, इतरही पशुधनाच्या बाबतीत अनेक समस्या दिसून येतात. म्हणूनच जातिवंत देशी पशुधनाचे संवर्धन करणे एक आव्हान आहे.

Animals
Animal Census : पशुसंवर्धन विभाग २१ व्या पशुगणनेसाठी सज्ज

पशुपालकांची भूमिका

पशुपालक समाजाच्या भटक्या जीवनशैलीमुळे शुद्ध पशुधन जातींचे प्रसार आणि त्यायोगे संकरीकरण घडलेले आहे. वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या पशुधनावरून एखाद्या भूभागाची प्रसिद्धी आणि ओळख ही त्या भागातील पशुपालकांसाठी अभिमानाचा विषय असून सहकार भावनेतून संबंधित पशुधनाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न लोकाश्रयाच्या माध्यमातून झाले आहेत.

पशुपालकांना रोजगार, माहितीचे प्रसारण तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय किंवा बिगर शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक मदतीच्या दृष्टीने ‘ब्रीड सोसायटी’ उपयुक्त पर्याय ठरते. म्हणून पशुपालकांनी प्रगणकांना आपली कौटुंबिक माहिती, पशुधनाची माहिती अचूक द्यावी. दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारावर भविष्यकालीन धोरण, योजना आणि आर्थिक तरतूद अवलंबून आहे.

‘पॅंडेमिक फंड प्रोजेक्ट'

कोविड-१९ सारख्या जागतिक आरोग्य समस्येचा अनुभव लक्षात घेता, जी-२० या परिषदेत ‘पॅंडेमिक फंड प्रोजेक्ट’ हा २५ दशलक्ष डॉलरचा प्रकल्प मंजूर झाला. १४० दशलक्ष लोकसंख्येच्या भारतासारख्या देशात जिथे ५३६ दशलक्ष पशुधन आणि ८५२ दशलक्ष कुक्कुटपक्षी आहेत, तिथे प्राणी आणि मानव यांच्यातील संक्रमण आजारांची शक्यता अधिक गडद होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवातील २/३ संसर्गजन्य आजार हे पशूंपासून संभवतात.

म्हणून पशूजन्य संक्रमक मानवी आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘पॅंडेमिक प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्स’ (पीपीआर) हा मानवी आणि पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. बदलत्या वातावरणानुसार पशुधनातील सांसर्गिक आजारांचे सर्व्हेक्षण, संनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय साधणे आणि पशुधन व मानवी आरोग्य जपणे, अन्नसुरक्षा साधणे, शाश्वत जीवनविकास करणे अशी ध्येय आहेत.

यासाठी, रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सक्षमीकरण, संनियंत्रण आणि पूर्वसूचित करणाऱ्या यंत्रणांचा विकास, बदलत्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम मनुष्यबळ विकास, धोक्याच्या पातळीचे विश्लेषण करणाऱ्या माहितीचे पृथक्करण आणि प्रसारण तसेच आपत्ती निवारणासाठी विविध यंत्रणांचे सुसंवाद प्रस्थापित करणे इत्यादी विविध पैलूवर ‘पॅंडेमिक फंड प्रोजेक्ट’ अंतर्गत काम करण्यात येणार आहे.

२१ व्या पशुगणनेची वैशिष्ट्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, वापरकर्त्या प्रगणकास सुलभ अशा मोबाईल अॅप माध्यमातून माहिती संकलन होणार असल्याने अचूकता, वेगवानता आणि पृथक्करण करण्यास सक्षमता अशा सुविधा.

दुर्गम भागात सर्व्हेक्षण करताना इंटरनेट नसल्यास हे अॅप ऑफलाइन मोडवर काम करीत असल्याने माहिती संकलन करण्यास अडचण नाही.

देशी पशुधनाची सुयोग्य नोंद

देशात विविध पाळीव पशुपक्ष्यांच्या देशी जाती आढळून येतात. यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, वराह, श्वान, उंट यांपासून ते दुर्गम भागातील मिथुन, याक सारख्या पशूंची नोंद.

पाळीव पक्ष्यांत कोंबड्या, बदके, इमू, लावा (बटेर), टर्कीचा समावेश. पशुधनाच्या नोंदणीकृत जातींच्या गुणवैशिष्ट्ये विशद करणारे मार्गदर्शक पुस्तिकेतून प्रगणकांना देशी जाती ओळखणे सहज शक्य.

केंद्र शासनाने अवर्णीत (अज्ञानापोटी गावठी म्हणून गणले जाणारे किंवा ज्यांचे गुणधर्म दुर्लक्षित राहिले आहेत) अशा पशुधनाच्या अभ्यासाचा ‘मिशन शून्य अवर्णीत पशुधन’ हा देशव्यापी प्रकल्प कार्यरत आहे. प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सर्व्हेक्षण अभ्यासातून नोंदीकृत नवीन देशी पशुधनाचा अंतर्भाव.

भटक्या पशुपालक समाजाची नोंद

जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या पुढाकारातून भटका पशुपालक वर्ग आणि पशुधनाचा शाश्वत विकासाच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघातर्फे २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय रेंजलँड आणि पॅस्टोरलिस्ट वर्ष’ घोषित.

जागतिक पातळीवर कुरणाळ प्रदेश आणि भटक्या पशुपालकांच्या अभ्यासासाठी आवाहन केल्यामुळे, यंदाच्या पशुगणनेत भटक्या पशुपालक समाजाची नोंद. त्यांच्या नोंदीवरून पशुधनाचे स्थलांतर मार्ग, पशुपालक समाजाच्या गरजा, अडचणी स्पष्ट होतील.

महिलांचे योगदान

पारंपरिक पशुपालनात दूध दोहन, चारा-पाणी करणे, शेणखत, गोठ्याची स्वच्छता अशा कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, कुक्कुटपालन आदि लघुउद्योगांमध्ये ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटांना संधी असल्याने यंदाच्या पशुगणनेत महिलांच्या योगदानाची नोंद.पशुधनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण.

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९ ,

(डॉ. प्रवीण बनकर हे स्ना.प.प.संस्था, अकोला येथे सहयोगी प्राध्यापक, तर डॉ. स्नेहल पाटील या पंचायत समिती, अकोला येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com