Electricity Saving Tips : वीज बचतीच्या उपाययोजना

Summer Electricity Saving : वीज ही मूलभूत गरज आहे. दिवसेंदिवस वीज वापर वाढत आहे. साधारणतः उन्हाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी, वीज बिलांची रक्कम वाढत जाते.
Solar Energy
Solar Energy Agrowon
Published on
Updated on

Energy Saving Appliances : वीज ही मूलभूत गरज आहे. दिवसेंदिवस वीज वापर वाढत आहे. साधारणतः उन्हाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी, वीज बिलांची रक्कम वाढत जाते. तथापि, विजेचा अनावश्यक वापर टाळून किंवा काही सोपे व साधे उपाय करून केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर आपण विजेची व पर्यायाने आर्थिक बचत करू शकतो. घरामध्ये आवश्यक अनेक उपकरणांना वीज आवश्यक असली तरी ते योग्यप्रकारे वापरले तर वीज बचत होऊ शकते.

विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्त्वाचे आहे. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्या वेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विविध विद्युत उपकरणे व लाइट बंद करणे आवश्यक आहे. ज्या उपकरणांमध्ये कॉइलचा वापर केला जातो ते सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात विजेचा पंखा आघाडीवर आहे.

त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे वीज बचतीसाठी योग्य ठरते. पंखे, एअर कंडिशनर, गिझर, वॉशिंग मशिन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, ज्यूसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, संगणक, चार्जर, व्हॅक्युम क्लिनर ही वीजबिलात वाढ करणारी उपकरणे आहेत. ही उपकरणे वीज बचतीच्या जाणिवेने वापरली तर वीज बचतीला निश्‍चितच मोठा वाव आहे आणि उपायही खूपच साधे आहेत.

एअर कंडिशनरवर नियंत्रण

सर्वाधिक वीज लागणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यात एसीचा मोठा वाटा आहे. या एसीला पंख्यापेक्षा नऊ पट अधिक वीज लागते. त्यामुळे आवश्यकतेनुसार एसी वापरता येईल.

एसीचे नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरू असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. एसी वापरायचा असल्यास गारवा निर्माण झाला की एसी बंद करावा. त्या वेळी शक्यतो पंखा वापरावा.

Solar Energy
Agricultural Electricity : ट्रान्सफॅार्मर मंजूर होऊनही बसवला नाही, शेतकऱ्यांची पिके जळू लागली

रेफ्रिजरेटर

घरात वर्षभर जेवढी वीज वापरलेली असते त्यात सुमारे २५ ते ३० टक्के वाटा हा फक्त एकट्या रेफ्रिजरेटरचा असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात फ्रीजचा दरवाजा सतत उघडावा लागला तर आतील तापमान वाढत जाते आणि शीतकरणासाठी विजेचा वापर जास्त होतो. त्यामुळे फ्रीजमधून एकामागे एक भाजी किंवा पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकाच वेळी काढावेत.

सतत फ्रीजचे दरवाजे उघडल्यास विजेचा वापर वाढतो.

‘अनप्लग’ करा उपकरणे

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाच्या तडाख्यामुळे बहुतांश वेळ हा घरातच घालवला जातो. त्यामुळे टीव्ही, संगणक किंवा मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गेम्स किंवा चित्रपटांसाठी जादा वेळ सुरू राहतात. संगणक किंवा मोबाइलच्या चार्जिंगचा वेळ वाढतो. घरातील लहानथोरांच्या मनोरंजनासाठी सध्या हे उपकरणे महत्त्वाचे आहेत. मात्र ज्या वेळी हे सर्व उपकरणे वापरात नसतील तेव्हा ते बंद करताना अनप्लग करणे महत्त्वाचे आहे.

वापरात नसतानाही टीव्ही, संगणक आणि चार्जर किंवा अन्य उपकरणे स्टॅण्डबायवर असल्यास वीज वापरतात. त्यामुळे ही उपकरणे स्टॅण्डबायवर ठेवू नका तर ती अनप्लग करणे वीज बचतीसाठी आवश्यक आहे.

उपकरणांचा योग्य वापर

मायक्रोवेव्हमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे २५ अंश सेल्सिअस तापमान खाली येते. तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते.

सीलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरावा.

योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वॉशिंग मशिन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते.

अंघोळीसाठी गरम पाणी लागत असल्यास अंघोळ होईपर्यंत गिझर सुरू ठेवणे हे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य ठरते.

कमीत कमी चार एनर्जी स्टार असलेले उपकरणे खरेदी केल्यास ५० टक्के विजेच्या बचतीची संधी आहे.

Solar Energy
Agriculture Electricity Crisis : विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

वीज उत्पादक होण्याची संधी

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॉटपर्यंत प्रति किलोवॉट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

छतावरील सौर प्रकल्पांतून वीजग्राहकांच्या गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेते आणि त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

एलईडी बल्बचा वापर

घरातील ४० किंवा ६० वॉटचे जुने पारंपरिक विजेचे दिवे (बल्ब) आणि ट्यूबलाइट त्वरित बदलून त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी बल्ब लावण्यास प्राधान्य द्यावे.

एलईडी (लाइट एमिटिंग डायोड्‍स) हे कमीत कमी वीज वापर करणारे बल्ब आहेत. पारंपरिक विजेच्या बल्बचे आयुष्य सुमारे ५ हजार तास असते. याउलट एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते.

एलईडी बल्ब वापरल्यास ४० किंवा ६० वॉट क्षमतेच्या बल्ब व ट्यूबलाइटच्या तुलनेत सुमारे ८० टक्के वीज बचत होऊ शकते. घरातील बाथरूम किंवा बेडरूममध्ये ‘झीरो’ बल्बचा पूर्वीपासूनच वापर होत आहे. हा ‘झीरो’ म्हणजे पारंपरिक बल्ब तब्बल १५ वॉटचा असतो. त्यामुळे या बल्बऐवजी आता कमी वॉटचे एलईडीचे बल्ब लावता येईल. बाजारात एक वॉट, तीन वॉटमध्ये देखील एलईडी बल्ब उपलब्ध आहेत.

- निशिकांत राऊत, ७८७५७६७००९

(लेखक पुणे येथे महावितरणमध्ये उपमुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com