Chana Cultivation : हरभरा पेरणीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही...

Chana Production : हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलल्यामुळे हरभरा पेरणीचे गणित बिघडले आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.
Chana
ChanaAgrowon
Published on
Updated on

धनंजय सानप

Dr. Rajaram Deshmukh : हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलल्यामुळे हरभरा पेरणीचे गणित बिघडले आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. अशा स्थितीत हरभरा पिकाची लागवड आणि व्यवस्थापन यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

हरभरा पेरणीची वेळ निघून गेली आहे का?
- पर्जन्यमानात बदल झाला आहे. मागील काही वर्षांत जूनच्या शेवटी पाऊस सुरू होतो आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे पेरणीची वेळही बदलते. खरीप पिकांची काढणी उशिरा होते. मग रब्बी पेरणी पुढे सरकते. ऑक्टोबरचा शेवट आणि नोव्हेंबरचे पहिले पंधरा दिवस हा हरभरा पेरणीसाठी चांगला कालावधी असतो. परंतु त्यासाठी खरीप पिकांची काढणी वेळेत झाली पाहिजे. दुसरं म्हणजे हरभरा पीक कोरडवाहू शेतकरी घेतात. त्याची पेरणी खरिपातील पावसावर अवलंबून असते. त्यामुळे हरभरा पेरणीची वेळ निघून गेली असं नाही. शेतकरी हरभरा पेरणी अजूनही करू शकतात. हरभरा पिकासाठी थंडी आणि ओलावा गरजेचा असतो. ऑक्टोबरमध्ये पेरणी केली तर ओलावा मिळतो. परंतु थंडी मिळत नाही. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होते. त्यामुळे जमिनीत ओल असेल तर शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी.

Chana
Gram Cultivation: हरभरा पेरणीसाठी कोणते वाण निवडावे ?

शेतकऱ्यांना हरभऱ्याचं चांगले उत्पादन देणारे वाण कोणते?
- शेतकऱ्यांच्या गरजेनुसार हरभरा वाण विकसित करण्यात आले आहेत. कोरडवाहू भागासाठी १९९३ मध्ये विकसित करण्यात आलेला ‘विजय’ वाण चांगला आहे. कोरडवाहू भागात हरभऱ्याचे घाटे वा दाणे मोठे असतील तर पिकावर ताण येतो. त्याऐवजी लहान घाटे वा दाणे असतील आणि घाट्याची संख्या अधिक असेल तर उत्पादन चांगलं मिळतं. विजयचे घाटे लहान आहेत. त्यामुळे कोरडवाहू भागात हरभऱ्याच्या विजय वाणाची पेरणी करावी.

Chana
Chana Cultivation : या तंत्राने करा हरभरा लागवड

पेरणीला फारच उशीर होणार असेल तर ‘दिग्विजय’ या वाणाची पेरणी करावी. सिंचनाची सोय असेल तर ‘विशाल’ वाण पेरावा. विशालचे दाणे मोठे आहेत. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बदनापूर संशोधन केंद्रानं विकसित केलेला ‘आकाश’ वाणही चांगला आहे. अलीकडेच ‘चणा नंबर १६’ हा वाण बदनापूर येथून प्रसारित करण्यात आला आहे. तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘पीडीकेव्ही कनक’ आणि ‘पीडीकेव्ही कांचन’ वाण विकसित केले आहेत. परंतु या दोन्ही वाणांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय यांचा समावेश आहे. विजय आणि दिग्विजय कोरडवाहू तर विशाल बागायती क्षेत्रासाठी आहे.

या वाणांची एकरी उत्पादकता किती आहे?
- हरभऱ्याचे विजय, विशाल, दिग्विजय वाण एकरी ६ क्विंटल म्हणजे १५ ते १६ क्विंटल उत्पादन देतात. परंतु पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं आणि पाण्याची सोय असेल तर याच वाणांचं उत्पादन ५० टक्क्यांनी वाढतं. दोन पाणी दिल्यास उत्पादन एकरी ९ क्विंटलवर जातं. तीन पाणी दिल्यास एकरी १२ क्विंटल उत्पादन हे वाण देतात. वेळेवर पेरणी, पोषक वातावरण, पाणी आणि खतांच्या योग्य मात्रा, बीजप्रकिया आणि किडीपासून संरक्षण इतकं काटेकोर व्यवस्थापन केलं तर हेच वाण हेक्टरी ४० ते ४५ क्विंटलपर्यंत उत्पादन देतात. मी स्वत: आणि काही शेतकऱ्यांनी या वाणांचं हेक्टरी ४४ क्विंटल उत्पादन घेतलं आहे.

एकरी बियाणे किती वापरावं आणि पेरणीतलं अंतर किती असावं?
- विजय या वाणाची पाभरीनं पेरणी करण्यासाठी एकरी २५ किलो बियाणं पुरेसं ठरतं. कारण दाणे आकाराने लहान आहेत. तर दिग्विजय, राजस वा आकाश या वाणांचं एकरी ३० किलो बियाणं वापरावं. तसेच विशाल किंवा काबुली हरभराचे पीकेव्ही ४ किंवा पीकेव्ही २ यासारख्या वाणांचं एकरी ३५ किलो बियाणं वापरावं. पेरणी करताना देशी वाणांसाठी दोन फणातील अंतर ३० सेंमी राखावं. म्हणजे दोन ओळींतील अंतर ३० सेमी तर दोन रोपातलं अंतर १० सेमी ठेवावं. पेरणी उशिरा करणार असाल तर एकरी बियाण्यांचं प्रमाण वाढवावं. जेणेकरून रोपांची संख्या विरळ होणार नाही.

हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय काळजी घ्यावी?
- हरभरा पीक एकाच शेतात सतत घेतलं तर मर रोगाचं प्रमाण वाढतं. विशेषत: मर रोगाला बळी पडणारे वाण पेरले तर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. मर रोगाचे जिवाणू जमिनीत सहा वर्षे जिवंत राहतात. त्याचा पिकाला फटका बसतो. त्यामुळे आम्ही संशोधनातून मर रोगाला प्रतिकारक्षम असणारे वाण विकसित केले. यामध्ये विजय, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत हे वाण आहेत. घरातील बियाणे वापरत असाल तर पेरणीच्या आधी बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे मर रोगाचा धोका कमी होतो.

हरभऱ्याचं आंतरपीक कोणकोणत्या पिकांमध्ये घ्यावं?
- हरभरा पीक कोरडवाहू भागात करडई, ज्वारी पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेऊन शकता. परंतु ते पट्टा पद्धतीने घ्यावं. म्हणजे दोन ओळीनंतर एक ओळ अशी पद्धत वापरण्याऐवजी चार-सहा ओळी हरभऱ्याच्या आल्यानंतर ज्वारी, करडईच्या ओळी येऊ द्याव्यात. त्यातून उत्पादन चांगलं मिळतं. उसामध्ये तर हरभरा आंतरपीक म्हणून चांगलं येतं. आता पट्टापद्धतीने ऊसाची लागवड केली जाते. दोन सरींमध्ये चार फूट अंतर असतं. या मधल्या वरंब्यावर दोन ते तीन ओळी हरभऱ्याच्या लावाव्यात. जेणेकरून उसाला पाणी देताना हरभराला ओलावा मिळेल. त्यातून एकरी १० क्विंटल उत्पादन मिळतं. त्यामुळे ऊस पिकात आंतरपीक म्हणून हरभरा घ्यावा.

काबुली हरभऱ्याची उत्पादकता कमी का आहे?
- खरं म्हणजे काबुली हरभऱ्यासाठी राज्यातील हवामान तितकसं चांगलं नाही. पंजाब आणि हरियानात काबुलीची उत्पादकता चांगली आहे. काबुलीसाठी थंडी जास्त लागते. त्यामुळे जमिनीत ओलावा अधिक असावा लागतो. कारण काबुलीचे दाणे टपोरे असतात. पण काबुली नाजुक आहे. पेरणी करताना जास्त पाणी झालं तर काबुली सडतो. तसंच जास्त तापमानही काबुलीला सहन होत नाही. पाण्याची कमतरतादेखील सहन होत नाही. त्यामुळे या पूरक गोष्टी असतील तरच काबुली पेरावा. अन्यथा, देशी वाणांची निवड करावी. देशी हरभऱ्याच्या तुलनेत काबुलीला दीडपट जास्त भाव मिळतो. पण देशी हरभऱ्याला देखील भाव वाईट नाही. करडई, ज्वारीखालील क्षेत्र कमी झालं पण हरभऱ्याखालील क्षेत्र कमी झालं नाही, उलट वाढलं. त्याचं कारण डाळवर्गीय पिकात हरभराचे भाव आणि उत्पादन तुलनेने स्थिर आहे. तुरीचं मात्र उलट आहे, भाव कधी उच्चांकी पातळी गाठतो आणि झटक्यात नीचांकावरही येतो. पण हरभरा मात्र बऱ्यापैकी स्थिर असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काबुलीपेक्षा देशी हरभरा पेरणीचा पर्याय निवडावा.

खरिपात सोयाबीन आणि त्याच शेतात रब्बीत हरभरा पीक घेणं फायदेशीर आहे?
- खरं म्हणजे सोयाबीन, हरभरा कॉम्बिनेशन फायदेशीर वाटत असलं तरी हे लॉग टर्म फायदेशीर नाही. खरिपात मूग, उडदापेक्षा सोयाबीनचं आणि रब्बीत ज्वारी, बाजरीपेक्षा हरभऱ्याचं उत्पादन चांगलं मिळतं. थोड्या प्रमाणात रब्बीत गहू पीक घेतलं जातं. पण त्याची उत्पादकता कमी आहे. आणि रब्बीत गव्हाला पाणी व खत अधिक लागतं. त्यामुळे खरिपात सोयाबीन आणि रब्बीत हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पण सोयाबीन आणि हरभरा हे दोन्ही द्विदल धान्य आहेत. त्यामुळे रोग आणि किडी दोन्ही पिकांवरील एकसारख्या असण्याची शक्यता अधिक असते.

उदा. सोयाबीन दरवर्षी घेतलं तर मूळकुजचा आणि शेंगा पोखणाऱ्या अळीचा सोयबीनवर प्रादुर्भाव होतो. त्यामुळे दरवर्षी सोयाबीन काढलं की हरभरा आणि हरभरा काढला की सोयाबीन हे कॉम्बिनेशन धोकादायक आहे. एकदल पिकात ज्वारी, बाजरी, गहू, मका याला वेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य लागतात. तर द्विदल पिकात मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, राजमा यांना वेगळे अन्नद्रव्य लागतात. त्यामुळे द्विदल वर्गातील पीक सारखं घेत राहणं धोकादायक आहे. परंतु रब्बीत हरभऱ्याशिवाय दुसरा सक्षम पर्यायही नाही. त्यामुळे हरभरा करताना मर, मुळकुज आणि किड-रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com