Chia Cultivation : आरोग्यदायी चिया पिकाची लागवड

Chia Production : चिया हे मूळ मेक्सिकोमधील एक तेलबिया पीक आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी हे तुलनेने नवीन असले तरी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत आहे.
Chia Cultivation
Chia CultivationAgrowon
Published on
Updated on

ऋतुजा दरेकर, डॉ. एम. एस. गाडेकर

चिया हे मूळ मेक्सिकोमधील एक तेलबिया पीक आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी हे तुलनेने नवीन असले तरी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत आहे. परिणामी या पिकाच्या लागवडीमध्ये वाढ होताना दिसत आहे.

चिया हे पीक माफक सुपीक आणि चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत सहज घेता येते. मात्र त्याचे अधिक क्षारयुक्त व क्षारयुक्त जमिनीत उत्पादन कमी मिळते. त्यामुळे चियाच्या चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय चिकणमाती सर्वांत योग्य आहे.

मध्य आणि दक्षिण भारतातील काही प्रगतिशील शेतकरी निर्यातीसाठी चिया बियांची लागवड करतात. आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादन म्हणून त्याची लागवड केली जात असल्यामुळे चिया पिकाचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केल्यास उत्तम.

पेरणीची वेळ

भारतीय हवामानात चिया पेरणीचा सर्वोत्तम काळ ५ ते २५ ऑक्टोबर मानला जातो. मात्र पेरणीवेळी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान बियांच्या चांगल्या उगवणीसाठी योग्य ठरते. चिया थंडीसाठी अत्यंत संवेदनशील आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारी या काळात फुले येऊन दाणे भरणे सुरू होते.

Chia Cultivation
Chia Seeds Farming : चिया सीडच्या शाश्वत शेतीसाठी...

चियाची पेरणी

चियाची पेरणी सीड ड्रील किंवा पेरणी यंत्राने करता येते. चिया बिया खूप लहान असून, त्याच्या पेरणीसाठी ड्रील उपकरणांमध्ये योग्य ते समायोजन करून घ्यावे.

पेरणी अंतर

पेरणीसाठी ओळीत ३० ते ४५ सें.मी., तर दोन रोपांमध्ये ३० सेमी अंतर ठेवावे.

बियाण्याचे प्रमाण

बियाण्याचा दर सुनिश्‍चित करण्यासाठी चिया बियण्यांसोबत ३ ते ७ च्या प्रमाणात भाजलेली बाजरी मिसळता येते. अचूक पेरणी केल्यास हेक्टरी फक्त ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. मात्र अनेक शेतकरी हेक्टरमध्ये २ ते २.५ किलो बियाणे वापरतात. पेरणीनंतर साधारण दोन आठवड्यांनी उगवणीनंतर ३० सेंमी अंतरातील अन्य अशक्त रोपे काढली जाते. या विरळणीमुळे फक्त सशक्त वाढलेली रोपे शेतात राहतात.

खताचा वापर

चिया पिकाचे चांगले पोषण होऊन बियांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे. हलक्या जमिनीत पेरणी वेळी २० ते ३० किलो नत्र, २० ते २५ किलो स्फुरद आणि १५ ते २० किलो पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे. गरज भासल्यास पेरणीनंतर ३०-४५ दिवसांनी १० किलो नत्र प्रति हेक्टरी देऊन घ्यावे.

Chia Cultivation
Chia Seeds : चिया सीड पिकाकडे शेतकऱ्यांचा कल

सिंचन

बिया अंकुरित होण्यासाठी पेरणीच्या वेळी चियामध्ये पुरेशी माती ओलावा असला पाहिजे. सिंचनाची संख्या मातीच्या प्रकारावर आणि सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असते. वालुकामय किंवा वालुकामय चिकणमाती जमिनीत पेरणी केल्यानंतर साधारणपणे ४ ते ५ पाणी द्यावे लागते. चिया पीक पक्व होत असताना आर्द्रतेसंबंधी अधिक संवेदनशीलता असते. त्यामुळे या काळात पाणी देऊ नका.

चिया वनस्पती १ मीटर उंच वाढू शकते. त्याची पाने दीड ते तीन इंच लांब आणि १ ते २ इंच रुंद असतात. त्यात पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाची ३-४ मिमी आकाराची छोटी फुले येतात. त्याचे अंडाकृती आणि काळे, तपकिरी आणि काळे-पांढरे ठिपके रंगात असतात.

तण आणि कीटक नियंत्रण

चिया हे तणांशी स्पर्धा करत वाढणारे ताकदवान पीक आहे. असे असले तरी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तणांचे व्यवस्थापन केल्यास फायदा होतो. पेरणीनंतर २५-३० दिवसांनी ट्रॅक्टरने आंतरमशागत करून घ्यावी. हे पीक काटक असून, रोग किडीचा फारसा त्रास होत नाही. मात्र पीक पक्वतेच्या काळात मुंग्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

कापणी, मळणी आणि साठवण

चिया पीक १२०-१३० दिवसांत पिकते. मग त्याची सर्व पाने गळून पडतात आणि देठावर फक्त राहतात. विकसित देशांमध्ये लहान बियाण्यांच्या मशिनद्वारे कापणी केली जाते. मात्र भारतात हे पीक विळ्याने कापले जाते. मळणी करताना चिया लाकडाच्या काठीने दाबून किंवा कुचून बिया वेगळ्या केल्या जातात. वरील सर्वसाधारण उत्पादन पद्धतीने चियाची लागवड केल्यास हेक्टरी ६ ते ८ क्विंटल उत्पादन मिळू शकते. स्वच्छ व वाळलेल्या बिया सामान्य कोठारात किंवा गोदामात ३-४ महिने साठवता येतात.

- प्रा. ऋतुजा दरेकर, ९४२२७२६२२१

- डॉ. एम. एस. गाडेकर, ७५८८६१७९६३

(कृषी वनस्पती विभाग, के. एस. पी. कृषी महाविद्यालय नाशिक)

(टीप ः कोणत्याही नवीन पिकाच्या लागवडीपूर्वी त्याच्या उत्पादनाला बाजारपेठेत असलेली मागणी आणि मिळणारे दर यांची खात्री केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com