
Indian Agriculture : अलीकडे विदर्भातील वाशीम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत चिया सीड या नवीन पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. विदर्भ आणि मराठवाड्यात खरीप तसेच रब्बी हंगामात देखील पारंपरिक पिकांना फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांचा वाढता उत्पादन खर्च, कमी उत्पादकता आणि मिळणाऱ्या कमी भावामुळे या पिकांची शेती उत्पादकांना तोट्याची ठरत आहे.
अशा परिस्थितीत नवनव्या पिकांच्या शोधात शेतकरी असताना त्यांना रब्बी हंगामात चिया सीडच्या माध्यमातून एक पर्यायी पीक मिळाले आहे. त्यामुळे मागील तीन चार वर्षांपासून या परिसरात क्षेत्र वाढत आहे. चिया सीड हे मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिकोतील पुदिना कुटुंबातील पीक आहे. जवळपास चार महिने कालावधीचे हे पीक कमी खर्च आणि शाश्वत मिळकत म्हणून पुढे येत आहे.
काटक अशा या पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव कमीच होतो. बाजारातून सेंद्रिय अथवा नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या चिया सीडला मागणी असल्याने या पिकात रासायनिक खते, कीडनाशकांचा फारसा वापर शेतकरी करीत नाहीत. राज्याच्या सर्वच भागांत वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी त्रस्त असताना चिया सीडला वन्यप्राण्यांपासून कुठलाही धोका नाही.
कृषी विभाग - आत्मा तसेच महसूल विभागही चिया सीडला प्रोत्साहन देत आहे, ही शेतकऱ्यांसाठी जमेचीच बाजू म्हणावी लागेल. जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चिया सीडची शेती वाढत आहे.
चिया सीड ह्या उच्च पोषणमूल्ययुक्त खाद्य तेलबिया आहेत. ग्लुटेनमुक्त धान्य म्हणूनही ओळखले जाते. चिया सीडमध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. चिया सीड पचनास सोपे असून अनेक आजारांवर उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. भरडधान्यांप्रमाणे सुजी, शिरा यांच्या माध्यमातून याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. फालुदा, आइस्क्रीमसह इतरही अनेक प्रक्रियायुक्त पदार्थांत चिया सीड वापरले जाते.
शक्तिवर्धक प्रोटिन पावडरमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. असे असले तरी आपल्या देशात चिया सीडच्या आहारात वापराबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जाणीव जागृती नाही. त्यामुळे सध्या तरी चिया सीडला मर्यादित बाजारपेठ उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पातळीवर विक्री-प्रक्रिया-निर्यात कमीच आहे. काही कंपन्या शेतकऱ्यांसोबत बाय-बॅक करार करून चिया सीडचे उत्पादन घेत आहेत.
या कंपन्या प्रामुख्याने रसायन अवशेषमुक्त चिया सीडलाच प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, लागवड तंत्र देऊन त्यांच्यापासून ठरावीक दराने ह्या कंपन्या चिया सीड खरेदी करतात. त्यानंतर त्यांना स्वच्छ करण्यापासून ते पुढील सर्व प्रक्रिया करून देशांतर्गत तसेच विदेशी बाजारात विकतात. राज्यात काही नवीन पिकांबाबत कंपन्यांसोबतचे बाय-बॅकचे अनुभव चांगले नाहीत.
मागणी घटून दर मिळत नसेल तर कंपन्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल नेत नाहीत. तसे चिया सीडबाबत होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. शिवाय विदर्भासह महाराष्ट्रात चिया सीडच्या शाश्वत शेतीसाठी याचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल. नवीनतम अशा या पिकाचे प्रगत लागवड तंत्र कृषी विद्यापीठांनी विकसित करून शेतकऱ्यांना द्यायला हवे. चिया सीडचे आहारातील महत्त्वाबाबत व्यापक प्रबोधन झाले पाहिजेत. राज्याच्या दुर्गम भागातील महिला,
मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी उच्च पोषणमूल्ययुक्त चिया सीडचा उपयोग करता येईल का, हेही पाहायला हवे. स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात चिया सीडला मागणी वाढून त्याची शेतकऱ्यांकडून बाजारात थेट विक्री व्हायला हवी. चिया सीडवर उत्पादकांद्वारे प्रक्रिया, निर्यात झाली पाहिजेत. असे झाले तरच चिया सीडची शेती शेतकऱ्यांसाठी शाश्वत ठरेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.