Crop Loan Target : पीककर्ज वाटपाचे बँकनिहाय उद्दिष्ट निश्चित

Agriculture Credit : चालू आर्थिक वर्षात खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Latur/Dharashiv News : चालू आर्थिक वर्षात खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात यंदा उद्दिष्टात शंभर कोटीने तर धाराशिव जिल्ह्यात ७९ कोटीने वाढ करण्यात आली आहे.

यातूनच दोन्ही हंगामात बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून यंदा लातूर जिल्ह्यात तीन लाख १६ हजार ८०५ शेतकऱ्यांना तीन हजार शंभर कोटीचे तर धाराशिव जिल्ह्यात दोन हजार २८० कोटीच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी दोन हजार चारशे तर रब्बी हंगामासाठी सहाशे कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अपवाद सोडला तर उर्वरित बँकांनी उद्दिष्टानुसार कर्जाचे वाटप केले नाही.

भारतीय स्टेट बँकेने मागील अनेक वर्षाच्या तुलनेत सरलेल्या आर्थिक वर्षात हात ढिला सोडत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले. जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्यामुळे कर्ज वाटपाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्क्याच्या पुढे सरकले.

Crop Loan
Crop Loan interest : जिल्हा बँकेच्या खातेदारांनी व्याज सवलतीचा लाभ घ्यावा

उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे अन्य बँकांनी उद्दिष्टाच्या कमी कर्ज वाटप करूनही त्याची चर्चा घडून आली नाही. धाराशिव जिल्ह्यात मात्र, अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या विविध कारणे पुढे करून कर्ज वाटपाला टाळाटाळ केली. बँकांच्या या नाठाळपणाचा विषय तत्कालीन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्यापर्यंत गेला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उद्दिष्टानुसार कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बँकांच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले. यातूनच बँक व प्रशासनात तेढ निर्माण झाली.

गुन्हे दाखल करण्याच्या प्रकाराविरुद्ध बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले. काही आमदारांनी बँक व शेतकऱ्यांत संवाद घडवून आणत कर्ज वाटपासाठी पुढाकार घेतला. या सर्व घडामोडीत पीक कर्ज वाटपाचा टक्का किंचित वाढला. धाराशिव जिल्हा बँक डबघाईला आल्यामुळे जिल्ह्यात पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांचाच शेतकऱ्यांना आधार आहे. गेल्यावर्षीचे अनुभव लक्षात घेता यंदा बँकांकडून शेतकऱ्यांना भरीव कर्ज वाटप होण्याची आशा आहे.

Crop Loan
Crop Loan Distribution : परभणीत पीककर्ज वाटपाचे ४९.२९ टक्के उद्दिष्ट साध्य

लातूरला जिल्हा बँकेचा मोठा वाटा

लातूर जिल्हा बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. यात बँकेने सुरु केलेल्या पाच लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा शेतकरी मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. यामुळेच बँकेकडून उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. या स्थितीत एकूण उद्दिष्टात जिल्हा बँकेच्या वाट्याला मोठे उद्दिष्ट असून यंदा बँकेकडून एक हजार ११३ कोटी वाटप होणार आहे.

जिल्हा अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला ६२० कोटी वाटपाचे उद्दिष्ट असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ३०५ तर बँक ऑफ महाराष्ट्राला २१२ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. एकूण २२ बँकांना तीन हजार शंभर कोटीचे उद्दिष्ट असून यात रब्बीसाठी दोन हजार ४५८ कोटी १४ लाख तर रब्बीसाठी ६४१ कोटी ८५ लाखाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

धाराशिवला स्टेट बँकेवरच मदार

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी मिळून यंदा दोन हजार २८० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षी हेच उद्दिष्ट दोन हजार २०१ कोटी रुपये होते. यंदा खरिपात एक हजार ६४१ कोटी ६० लाख रुपये तर रब्बीसाठी ६३८ कोटी ४० लाख कर्ज वाटप होणार आहे.

यात सर्वाधिक ६१३ कोटी कर्ज वाटप भारतीय स्टेट बँक करणार असून त्यानंतर जिल्हा बँक ४२६ कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बँक ४२० कोटीचे वाटप करणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राला ३७७ कोटी तर आयसीआयसीआय बँकेला ११३ कोटी वाटपाचे उद्दिष्ट आहे. सर्व २२ बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com