Hailstorm Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने पिके जमीनदोस्त

Heavy Rain Update : राज्यात थंडीची प्रतीक्षा असतानाच, रविवारी (ता. २६) दुपारनंतर मॉन्सूनोत्तर वादळी पाऊस आणि गारपिटीने राज्यात अक्षरशः थैमान घातले.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Pune News : राज्यात थंडीची प्रतीक्षा असतानाच, रविवारी (ता. २६) दुपारनंतर मॉन्सूनोत्तर वादळी पाऊस आणि गारपिटीने राज्यात अक्षरशः थैमान घातले. या पावसाच्या तडख्याने खरीप पिकांसह, पेरणी झालेली रब्बी पिके, फळबागा आणि भाजीपाला, चारा पिके जमीनदोस्त झाली. सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळाला.

रविवारी (ता. २६) दुपारनंतर आलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. भातसा तलाव क्षेत्रात २४ तासांमध्ये तब्बल ५६० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

तर तानसा ४७०, वैतरणा ३७०, अप्पर वैतरणा ३३०, मध्य वैतरणा तलाव क्षेत्रात ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

Crop Damage
Unseasonal Rainfall : मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

राज्यात सर्वदूर सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या मुसळधार वादळी पावसाने द्राक्षे, पपई, केळी, संत्रा, वेलवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी, आंबा या फळपिकांना, तूर, मका, गहू, ज्वारी, भात, हरभरा, करडई ही धान्यपिके, टोमॅटो, मिरची, कांदा, फ्लॉवर, कोबी, बटाटा, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाजीपाला पिकासह, वेचणीस आलेल्या कपाशी आणि चारा पिके पिकांना पावसाने चांगलाच तडाखा देत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

खानदेशात रविवारी (ता. २६) रात्री सर्वत्र पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात गारपीटदेखील झाली. यामुळे कांदा, केळी, पपई, कापूस, हरभरा आदी पिकांची हानी झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पपईची मोठी हानी झाली आहे. तसेच कांद्यालाही फटका बसला आहे. धुळ्यातही शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री भागात कांदा, शेतात ठेवलेला कडबा आदींचे नुकसान झाले आहे. केळीच्या बागांचे नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. नांदगांव तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. निफाड, चांदवड, सिन्नर तालुक्यांत गारपिटीचा फटका बसला आहे. द्राक्ष, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.

भाजीपाला व चाऱ्याचे नुकसान अधिक आहे. भात, मका व सोयाबीन पीक पावसात भिजल्याने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. जोरदार पावसामुळे कांदा, द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले, तर गारपीट आणि पावसाच्या माऱ्यामुळे द्राक्ष घड आणि मण्यांचे नुकसान झाले.

Crop Damage
Unseasonal Rain : ते आले, त्यांनी पाहिले अन् निघून गेले... ; दादा भुसेंच्या नुकसान पाहणी दौऱ्यानंतर शेतकरी संतप्त

नगर जिल्‍ह्यात रविवारी (ता. २६) दुपारनंतर तसेच रात्री उशिरा झालेल्या जोरदार पाऊस, वादळ व गारपिटीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. सर्वाधिक फटका पारनेर तालुक्याला बसला असून कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

नगर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, शेवगाव, राहुरी, राहाता, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने फळबागा तसेच ज्वारी कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळाला.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, मावळ, मुळशी अशा काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भाग, खेडमधील पश्चिम भागात जोरदार वारे, गारपिटीसह मुसळधार वादळी पाऊस कोसळला.

जुन्नर तालुक्याच्या काही भागांत मध्यम तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या पाऊस बरसला. या अचानक आलेल्या पावसासह गारपिटीने फ्लॉवर, कोबी, बटाटा, कोथिंबीर, मेथी, शेपू, मका, चारा पिके, गहू, ज्वारी, भात, हरभरा, आंब्यासह फळझाडांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

सातारा जिल्ह्यात शनिवारी व रविवारी अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जावळी तालुक्यात काढणीला आलेल्या भाताचे तसेच स्ट्रॉबेरीचे नुकसान ठरणार असून रब्बीतील पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. स्ट्रॅाबेरीस फुलकळी गळती, पाणी साचल्याने मर, फळकूट तसेच ढगाळ वातावरणामुळे भुरी, रसशोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात रविवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी पावसाचा जोर सर्वाधिक होता.

नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतही अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिटीचा फटका बसला. परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील रविवारी मध्यरात्रीनंतर ते सोमवारी (ता. २७) सकाळ पर्यंत विजांच्या कडकडाट वेगाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रब्बी ज्वारी, हरभरा, तूर पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. वाढीच्या अवस्थेतील ज्वारी, तुरीचे पिके आडवी झाली आहेत. वेचणी राहिलेला कापूस भिजला आहे.

Crop Damage
Crop Damage Hailstorm: वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांचं नुकसान

नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकाला दिलासा मिळाला आहे. जमिनीत ओल नसल्याने शेतकऱ्यांना रब्बीत हरभरा, ज्वारी, करडई, धने, गहू आदी पिके पेरता आले नाहीत. परिणामी हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी या पिकासह खरिपातील कपाशी व तुरीला दिलासा मिळाला आहे.

रविवारी (ता. २६) मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसाने पूर्व विदर्भाला झोडपून काढले. वाशीम जिल्ह्यात, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. अकोला, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने तूर, कपाशी या पिकांना बसला आहे.

अमरावती जिल्ह्यात पावसाने संत्रा पिकाच्या पुढील हंगामातील आंबिया बहाराच्या उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे खरिपातील पिके तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानला जात आहे. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात ८ मेंढ्या दगावल्या.

सोमवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण :

वाडा ५०, वसई ४०, मोखेडा, अंबरनाथ ३०.

मध्य महाराष्ट्र :

तळोदा १५०, जामनेर ९०, यावल ८०, नंदुरबार, शहादा, शहापूर प्रत्येकी ७०, धाडगाव ६०, देवळा, वेल्हे, जुन्नर, साक्री, राहुरी, त्र्यंबकेश्वर, रावेर प्रत्येकी ५०, पारनेर, घोडेगाव, सटाणा, निफाड, मालेगाव, जळगाव प्रत्येकी ४०, पाचोरा, पाचेरा, एरंडोल, सिंदखेडा, धरणगाव, भुसावळ, सिन्नर, नाशिक, मुक्ताईनगर, सावळीविहीर, संगमनेर, शिरूर प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

पूर्णा ९०, अर्धापूर, मानवत, परभणी प्रत्येकी ८०, जाफराबाद, गंगापूर, पालम, पाथरी, सेलू, परतूर प्रत्येकी ७०, नांदेड, हदगाव प्रत्येकी ६०, छत्रपती संभाजीनगर, भोकर, बीड, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड प्रत्येकी ५०, किनवट, कळमनुरी, वसमत, गंगाखेड, पैठण, धर्माबाद, वैजापूर प्रत्येकी ४०, सोनपेठ, माजलगाव, बीड, सेनगाव, अंबड, हिंगोली प्रत्येकी ३०.

विदर्भ :

सिंदखेड राजा, देऊळगाव राजा प्रत्येकी ८०, मेहकर , लोणार प्रत्येकी ७०. रिसोड, वाशीम, बुलडाणा प्रत्येकी ६०, मलकापूर, उमरखेड, शेगाव, मंगरूळपीर, मालेगाव, पुसद, मनोरा, पातूर प्रत्येकी ५०, जळगाव जामोद, महागाव, नांदूरा, बाळापूर, संग्रामपूर, बार्शीटाकळी, मातोळा, दारव्हा, नेर प्रत्येकी ४०.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव :

वैतरणा ३७०, तानसा ४७०, तुलसी ९०, अप्पर वैतरणा ३३०, भातसा ५६०, मध्य वैतरणा ३१०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com