Crop Damage : शेतकऱ्यांवर ‘अवकळा’

Heavy Rain Update : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, चारा व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.

हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते.

Crop Damage
Heavy Rain : नांदेड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांना पावसाने झोडपले

सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली.

तालुक्यातील ब्राह्मणवाडी, शेणसरी येथील एका घराचे पत्र उडाले, तर शिशणे, पांढरतारा येथील संदेश माया वावरे यांच्या घराचे छप्परदेखील उडाले. डहाणूजवळील कैनाड, कडूपाडा येथील अंतू धर्मा भेरा याच्या घरावरील दहा पत्रे वाऱ्याने उडाले, तर कोसेसरी, मोहपाडा येथील एका घराचे नुकसान झाले आहे. धानिवरी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्याच्या घरावर झाड पडले. त्याचे घर आधीच भूकंपाने नादुरुस्त होते. त्यावर पुन्हा झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Orange Crop Damage : गारपीट, पूर्वमोसमी पावसामुळे संत्र्याला १३७ कोटींचा फटका
सूर्या प्रकल्पाच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर उन्हाळी भातपीक चांगले आले होते. चार दिवसांपूर्वीच कापणीला सुरुवात केली होती; पण हे पीक पूर्वमोसमी पावसाने भिजवून टाकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जयराम तांडेल, शेतकरी
दरवेळीच्या नुकसानीमुळे वीटभट्टीचा व्यवसाय करावा की नाही, हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण पूर्वमोसमी पाऊस हा कधी पडेल सांगता येत नाही. त्यामुळे बेभरवशाच्या वातावरणामुळे पारंपरिक वीटभट्टी, तसेच गवत पावली या धंद्यावर उदरनिर्वाह करत होतो; पण आता नुकसानीमुळे काय करावे, हा आमच्यापुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
विष्णू बरफ, वीटभट्टी मालक
सोमवारी पूर्वमोसमी पाऊस पडल्याने उन्हाळी भातशेती, वीटभट्टीचे नुकसान झाल्याचे समजते. त्याचबरोबर तीन ते चार घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. महसूल विभाग, तसेच कृषी विभागाकडून पाहणी केली जाईल.
अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com