Nanded News : जिल्ह्यात रविवारी (ता. १२) दुपारी चारच्या सुमारास पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. पावसादरम्यान वीज पडून एका व्यक्तीसह दहा जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या नांदेड शहर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नांदेड, मुदखेड, धर्माबाद, भोकर, किनवट, माहूर, उमरी, बिलोली या तालुक्यांत सर्वाधीक पाऊस झाला आहे. या तसेच शेतीपिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नांदेड जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. या अंदाजानुसार रविवारी (ता. १२) दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले.
चारच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या वेळी हदगांव तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी रामराव गंगाराम वानखेडे (वय ७५) यांचा संध्याकाळी पाच वाजता वीज पडून मृत्यू झाला.
बिलोली तालुक्यातील डोणगाव खुर्द येथे वीज पडून प्रशांत बालाजी कसल्लू व बालाजी सायना कसल्लू यांचे दोन गायी, एक कालवड व एक लहान वासराचा वीज पडून मृत्यू झाला. धर्माबाद तालुक्यातील जुनी येथील शेतकरी देवराव संभाजी कदम यांचे दोन बैल शेतात चारच्या दरम्यान वीज पडून दगावले.
नायगाव तालुक्यातील मेळगाव येथील शेतकरी बालाजी गोविंदराव शिंदे यांच्या बैलावर वीज पडून बैल दगावला आहे. बळेगाव येथील दिगंबर किसन बेलकर यांची बैलजोडी वीज पडून दगावली. टाकळी तब (ता. नायगाव) येथील मारोती सटवाजी मोरे यांची म्हैस सायंकाळी ६ वाजता वीज पडून ठार झाली. हा पाऊस नांदेड तालुक्यात सर्वाधीक झाला.
पावसाचा जोर अधिक असल्याने नांदेड शहर महसूल मंडळात ६९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची झाली. यासह हा पाऊस नांदेड ग्रामीण मंडळात ५७.८ मिलिमीटर, तुप्पा २३, वसरणी ३८.५, वाजेगाव ३८.५, विष्णुपुरी २९, सगरोळी ४०, मुगट ४५, भोकर ३८, लोहगाव २८, धानोरा ४० मिलीमीटरची नांदेड झाली. जिल्ह्यात सरासरी १२.३ मिलीमीटरची नोंद झाली.
हिंगोली, धाराशिवमध्ये पावसाचा फटका
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी दीड ते तीन या काळात मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात काही काळ गारापीटही झाली. यामुळे गावात अनेक घरांवरील पत्रे उडाले, गावात व शिवारात झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पूर्वमोसमी पावसामुळे गावात रस्त्यांवरून पाणी वाहिले असून ठिकठिकाणी घरात पाणी शिरले.
हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत मागील चार दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिजवलेली हळद व उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या दोन जिल्ह्यांतील २९ मंडळांत सोमवारी (ता. १३) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.