Kolhapuri Chappal GI Tag : कोल्हापुरी चपलांचे पाऊल अडते कुठे?

Handmade Footwear India : कोल्हापुरी चपलांना मिळालेले ‘जीआय’ मानांकन हे वरदान आहे की शाप, असा प्रश्‍न पडावा अशी आज परिस्थिती आहे. खरे तर कोणतेही परंपरागत हँडीक्राफ्ट लक्झरी प्रॉडक्ट, किमान प्रीमिअम प्रॉडक्टमध्ये, आले पाहिजे.
Kolhapur Chappal
Kolhapur Chappal Agrowon
Published on
Updated on

Kolhapuri Chappal Brand Controversy : कोल्हापुरी चपलांना मिळालेले जीआय मानांकन हे पोटॅन्शियली चांगले असले, तरी सद्यपरिस्थितीत त्याचा किती उपयोग होईल हे सांगता येत नाही. खरे तर कोणतेही परंपरागत हँडीक्राफ्ट लक्झरी प्रॉडक्ट, किमान प्रीमिअम प्रॉडक्टमध्ये आले पाहिजे. त्याचे व्यवस्थित ब्रॅंडिंग झाले पाहिजे. कोल्हापुरी चपलेचे तसे झाले नाही.

जीआय मानांकन काय करते? कोल्हापूर आणि आसपासच्या भागात खास परंपरागत पद्धतीने बनलेल्या चपलेलाच ‘कोल्हापुरी’ हे लेबल लावण्याचा हक्क देते. म्हणजे दिल्लीतील कोणी उत्पादक कोल्हापुरी चपलांची निर्मिती करून कोल्हापुरी म्हणून विक्री करू शकत नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण यातून मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंनी अडचण निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग निघत नाही.

आधी पुरवठ्याची बाजू पाहू. परंपरागत कोल्हापुरी चप्पल परंपरागत पद्धतीने कमविलेल्या चामड्याची बनते. या प्रक्रियेला महिना लागतो. ढोर समाजातील लोक गुरांचे चामडे चर्मकार समाजातील लोकांना विकतात. हे चामडे हिरडा, बाभळीची साल, मीठ या मिश्रणात बुडवून सुकवावे लागते.

कोल्हापुरात जवाहर नगरमध्ये ढोर समूहाच्या मालकीच्या कातडी कमावण्याच्या जागा अर्थात टॅनेरी होत्या. शाहू महाराजांनी ही व्यवस्था केली होती. पण नंतर या पाण्याने प्रदूषण होते, या सबबीखाली टॅनेरी मालकांना एसटीपी प्लँट लावणे सक्तीचे करण्यात आले.

खरे तर या टॅनेरीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात रासायनिक अंश कमी असतो. त्यात प्रामुख्याने हिरडा, बाभळीची साल आणि मीठ असते. सध्या पंचगंगेत मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषके जात आहेत. टॅनरीने फार फरक पडला नसता. खरे कारण वेगळे असण्याची शक्यता आहे.

Kolhapur Chappal
Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चपलेला आता ‘क्यूआर कोड’

कोल्हापूर शहर विस्तारते आहे. जमिनीचे भाव वाढत आहेत. टॅनेरीच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या भागाच्या ‘विकासा’वर मर्यादा येत होती. म्हणून मग टॅनेरी बंद करण्यात आल्या असाव्यात. शिवाय या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळे जशी शहरे वाढतात तसा हा व्यवसाय बंद पडत जातो.

सातारा, कासेगाव येथील टॅनेरी व्यवसाय सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ढोर-चांभार समाज संघटित नाही. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रक्रियांचा सक्षमपणे विरोध करण्यासाठी लागणारे आर्थिक, सांस्कृतिक भांडवल त्यांच्याकडे नाही. वर्षानुवर्षे जातीय शोषणाचा अनुभव असल्यामुळे संघटितपणे प्रतिकार करण्याचा आत्मविश्‍वास नाही.

या उलट कर्नाटकमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे. तिथले सरकार टॅनेरींना प्रोत्साहन देते. पाणीपुरवठा वगैरे सोई देते. म्हणून मग कोल्हापूरचे ढोर समाजाचे लोक कर्नाटकात कातडी विकतात आणि कोल्हापूरचे चर्मकार कर्नाटकातून चामडी खरेदी करतात. त्यामुळे खर्च वाढतो. चपला महागतात. किंमत वाढवावी लागते.

काही चर्मकार मग चेन्नई, अंबुर येथून प्रेस चामडे मागवतात. हे चामडे चांगले असले, तरी परंपरागत पद्धतीने कमावलेले नसते. ते रासायनिक पद्धतीने कमावलेले असते. जीआय मानांकनाच्या नियमात हे बसत नाही. दुसरीकडे हजारो कारागीर प्रेसच्या चामड्याच्या चपला बनवून उदरनिर्वाह चालवीत आहेत. यातून जीआय मानांकनाच्या उपयुक्ततेविषयी प्रश्‍न निर्माण होतो.

ब्रॅंडिंगचा अभाव ः

कोल्हापुरी चपलांच्या मागणीबाबत सुद्धा अवघड परिस्थिती आहे. ‘कोल्हापुरी’चे ब्रॅंडिंग झालेले नाही. जीआय मानांकनाचे निकष पूर्ण करणारा माल महाग पडतो. ‘कोल्हापुरी’चा टिपिकल ग्राहक त्याकडे लक्झरी प्रॉडक्ट म्हणून पहात नाही. अधूनमधून (ऑकेजनल) वापरासाठी स्वस्तात मिळणारी वस्तू म्हणून त्याकडे पाहतो. त्याला चप्पल परंपरागत पद्धतीने बनली की नाही याच्याशी फार घेणेदेणे नसते. तो स्वस्त चप्पल पाहत असतो. त्याला हवी असलेली चप्पल जीआय मानांकनात बसत नाही. त्याला हवी असलेली कमी दर्जाची चप्पल मुबलक प्रमाणात उपलब्ध होतेही.

कोल्हापुरी चपलांची ८० टक्के विक्री ही कमी दर्जाच्या स्वस्त चपलांची आहे. मागणी तसा पुरवठा. पण यातून दर्जेदार कामाला पुरेशी मागणी उरत नाही. दर्जेदार काम करण्याची संधीच मिळत नसल्यामुळे दर्जेदार कारागीर तयार होत नाहीत. मग ज्यांना दर्जेदार माल विकायचा आहे त्यांना माल मिळत नाही. आहेत त्या कारागिरांना जपावे लागते. ते त्यांच्या सोईने काम करतात. त्यामुळे वेळेत चांगले काम मिळेल याची खात्री नसते.

म्हणून दर्जेदार कोल्हापुरी चपलांचा कारखाना कोणी टाकत नाही. एकाने टाकला तो बंद पडला. दर्जेदार कोल्हापुरी चपला बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर (स्केल) होत नाही. दुसरीकडे स्वस्त, पायाला लागणाऱ्या, लवकर तुटणाऱ्या, कार्डबोर्ड मिश्रित मालापासून बनलेल्या चपला मात्र स्केलवर बनतात. दिल्लीला सरोजनी मार्केटला १६० रुपयांपासून कोल्हापुरी चपला मिळतात.

Kolhapur Chappal
Kolhapuri Chappal : अस्सल कोल्हापूरी चप्पल कशी ओळखायची?

कोल्हापुरी चपलांचे ‘लक्झरी हँडीक्राफ्ट’ म्हणून ब्रॅंडिंग होणे आवश्यक आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. लक्झरी ब्रॅंडिंग करण्यासाठी किंमतविषयक, दर्जाविषयक धोरण त्यांना सामूहिकरीत्या ठरवावे लागेल. कमी दर्जाच्या, स्वस्त कोल्हापुरी विकण्यावर निर्बंध घालावे लागतील. हे सगळे करण्यासाठी उत्तम नेतृत्व लागेल, सामूहिक आत्मविश्‍वास लागेल. हे झाले तरच जीआय मानांकनाचा उपयोग होईल.

भूषण कांबळे हा चर्मकार समाजातील तरुण या सगळ्यापेक्षा वेगळा विचार करतोय. ब्रॅंडिंग करून ‘कोल्हापुरी’ला उच्चभ्रूंचे उत्पादन (एलीट प्रॉडक्ट) न करता दर्जेदार कोल्हापुरीसाठी परवडणाऱ्या किमतीत मास मार्केट कसे तयार होईल, यासाठी तो प्रयत्न करतोय. पण वर बघितलेल्या कारणांमुळे स्केलवर दर्जेदार कोल्हापुरीची खात्रीपूर्वक पुरवठा साखळी उभी राहणे अवघड आहे.

आवश्यक त्या संख्येने कारागीर नाहीत. पुढची पिढी हे करायला मागत नाही. सामाजिक प्रतिष्ठा कमी असलेल्या धंद्यातून बाहेर पडायला बघते आहे. व्यवसायात सामाजिक प्रतिष्ठा आणि बऱ्यापैकी कमाई, दोन्ही आल्याशिवाय पुढची पिढी थांबणार नाही. हे दोन्ही कसे मिळवायचे हा खरा प्रश्‍न आणि प्रमुख आव्हान आहे.

मग यात लगेच काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. इथलेच जुने अनुभवी कारागीर हे काम करू शकतील. ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट’ची उपशाखा कोल्हापुरात काढता येईल किंवा शिवाजी विद्यापीठातून एखादा डिप्लोमा स्वरूपाचा अभ्यासक्रम राबविता येईल. हे राज्य शासनाला करावे लागेल. स्थानिक कारागीर, व्यावसायिक लोकांना विश्‍वासात घेऊन ते करावे लागेल.

‘कोल्हापुरी’ची वैशिष्ट्ये ः

अस्सल कोल्हापुरी चप्पल कशी ओळखावी असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. खऱ्या ‘कोल्हापुरी’ची काही वैशिष्ट्ये असतात. एक तर चामडे ज्याला फूल ग्रेन म्हणतात ते असते. ते नैसर्गिकरीत्या कमावलेले असते. त्याला म्हसड म्हणतात. चामडीचा सर्वांत वरचा थर मजबूत आणि टिकाऊ असतो. त्यातल्याही चांगल्या चामड्याला बांडा म्हणतात. स्वस्त कोल्हापुरी प्रेस लेदरच्या असतात. म्हणजे निरनिराळ्या चर्मोद्योगात वेगवेगळी कामे करताना चामड्याचे जे तुकडे उरतात त्यापासून एक शीट बनवितात. म्हसड, बांड आणि प्रेस लेदर यात फरक असतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरी कोल्हापुरी शिवलेली असते. खिळा नसतो. ती चिकटविलेली नसते. डुप्लिकेट कोल्हापुरी चिकटविलेल्या असतात. त्याला पोस्टिंगचा माल म्हणतात. खऱ्या ‘कोल्हापुरी’ला तेल दिले की ती मऊ होते. पेस्टिंगच्या चपलेला तेल दिले की ती बाद होते. तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे पट्ट्यावर खूप कलाकुसर असते. अगदी बारीक, हाताने विणलेल्या वेण्या असतात. हे काम घरातील महिला करतात. नाहीतर पंचिंगचे बारीक काम असते. तळव्यावर सुद्धा पंचिंगचे काम असते.

चौथा फरक चप्पल उलटी करून पाहिल्यावर दिसतो. टाचेला आणि तळव्याला जोडणारा ‘नळका’ असतो. तो चपलेला स्थिरता (स्टॅबिलिटी) देतो. त्यामुळे चालणाऱ्याला तोल सांभाळायला मदत होते. शेवटचा महत्त्वाचा फरक म्हणजे चांगली कोल्हापुरी दीड हजार रुपयांपासून सुरू होते आणि दहा हजारांपर्यंत जाऊ शकते. चामडे, कलाकुसर आणि विकत घेणाऱ्याचा शौक यावर किंमत अवलंबून असते.

महिलांसाठी मात्र खऱ्या ‘कोल्हापुरी’चा चॉइस कमी आहे. त्यांच्या कोल्हापुरी चपला इतक्या चांगल्या बनत नाहीत. चेपल्या म्हणून एक पारंपरिक डिझाइन आहे तेवढेच. कोल्हापुरी चपलेविषयी आणि ते बनविणाऱ्या कारागिरांविषयी, त्यांच्या कलेविषयी आत्मीयता असेल तर प्रत्येकाने आयुष्यात किमान दोन तरी चांगले जोड वापरावेत.

आपल्या लोकांच्या चांगल्या कामाला चांगले पैसे द्यायला शिका. चांगल्या ‘कोल्हापुरी’चे आणि तुमचे नाते अनेक वर्षे झालेल्या जुन्या लग्नासारखे असते. सुरवातीला दोघांना थोडे अॅडजेस्ट करायला लागते, पण नंतर एकमेकांना इतके सरावतात की वेगळेच काढता येत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com