Crop Management : नियोजन उन्हाळी हंगामातील पिकांचे...

Summer Crop Management : उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. उपलब्ध पाण्यामध्ये दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्य पिकांची निवड करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड

उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. उपलब्ध पाण्यामध्ये दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्य पिकांची निवड करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यात पीकनिहाय वाणांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य होईल.

यं दाचा उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. त्या दृष्टीने या उन्हाळी हंगामात विविध उन्हाळी पिकांचे नियोजन, त्यानुसार जमिनीची निवड, पेरणी पद्धती, पेरणीची योग्य वेळ, बियाणे निवड आणि प्रमाण, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन इत्यादी बाबींविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ मिळविणे शक्य होईल.

उत्पादन कमी येण्याची कारणे

बदलते हवामान

अवेळी पेरणी.

योग्य अंतरावर पेरणी न करणे.

कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये सिंचन व्यवस्थापन.

वाणांची उपलब्धता

सेंद्रिय व जैविक खतांचा अभाव

रासायनिक खतांची असंतुलित मात्रा

कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव.

Crop Management
Turmeric Crop Management : सद्यःस्थितीतील हळद पिकाचे व्यवस्थापन

प्रमुख उन्हाळी पिके

उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बाजरी, मूग, भुईमूग, सूर्यफूल, तीळ इत्यादी पिकांची लागवड केली जाते.

उन्हाळी मूग

कमी पाण्यात, कमी दिवसांत आणि कमी खर्चात येणारे कडधान्यवर्गीय पीक.

लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीत लागवड करू नये.

लागवडीपूर्वी जमिनीची हलकी नांगरट करून कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर हेक्टरी ६ ते ८ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

पेरणी व बियाणे

पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिल्या पंधरवडा या दरम्यान करावी.

दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी.

पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंमी तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.

वाण

पुसा वैशाखी, वैभव, पी.के.व्ही ग्रीन गोल्ड, कोपरगाव, एस-८, फुले एम-२.

हे वाण ६५ ते ७० दिवसात तयार होतात.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत ६ ते ८ टन प्रति हेक्टरी प्रमाणे कुळवणीवेळी द्यावे.

पेरणीवेळी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद किंवा १०० किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे मात्रा द्यावी.

उन्हाळी सूर्यफूल

लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

पेरणी

उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

मध्यम खोल जमिनीत ४५ बाय ३० सेंमी तर भारी जमिनीत ६० बाय ३० सेंमी तसेच संकरित आणि जास्त कालावधीच्या वाणांची ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बियाणे व खत एकाच वेळी पेरता येते.

बियाणे ५ सेंमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.

पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो तर संकरित वाणाकरिता ५ ते ६ किलो प्रति हेक्टर बियाणे पुरेसे होते.

वाण

सुधारित वाण ः फुले भास्कर,भानू, एस एस ५६,

संकरित वाण ः केबीएसएच ४४, फुले रविराज, एमएसएफएच १७.

बीजप्रक्रिया (प्रमाण ः प्रतिकिलो बियाणे)

मर रोगासाठी, थायरम २ ते २.५ ग्रॅम प्रमाणे चोळावे.

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. उर्वरित नत्राची मात्रा खुरपणी झाल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी.

गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

Crop Management
Chana Crop Management : हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन

उन्हाळी भुईमूग

जमीन

मध्यम प्रकारची, भुसभुशीत, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

लागवडीपूर्वी १२ ते १५ सेंमी खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. तसेच पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना किंवा वखराने काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. आणि परिणामी उत्पादनात घट येते.

पेरणी व बियाणे

पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी.

पेरणी करताना उपट्या जातीसाठी दोन ओळींत ३० सेंमी व दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे. निम पसऱ्या जातींसाठी ४५ बाय १० सेंमी अंतर ठेवावे.

बियाणे प्रमाण ः (प्रमाण ः प्रति हेक्टर)

दाण्याचा आकार कमी असलेल्या जाती ः १०० किलो.

मध्यम आकाराच्या दाणे ः १२५ किलो

टपोरे दाणे असलेल्या वाणांसाठी ः १५० किलो

वाण निवड

एसबी ११, टीएजी २४, टीजी २६, जेएल ५०१, फुले ६०२१ (बियाणे प्रमाण ः हेक्टरी १०० किलो)

फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी-४१, फुले उनप, फुले भारती (बियाणे प्रमाण ः हेक्टरी १२५)

बीजप्रक्रिया

पेरणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाणांस,थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम.

त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक यांची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १० टन प्रमाणे कुळवणीच्या वेळी द्यावे.

पेरणी करतेवेळी नत्र २५ किलो आणि स्फुरद ५० किलो अधिक जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टरी देण्याची शिफारस आहे. यांपैकी २०० किलो जिप्सम पेरणीवेळी व उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावे.

मध्यम, काळ्या जमिनीत अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पूर्वमशागतीवेळी हेक्टरी ५ टन शेणखत तर शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर उर्वरित शेणखत द्यावे. शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के खते (२५:५० नत्र:स्फुरद किलो/हेक्टरी) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून ९ समान हप्त्यात द्यावे.

महत्त्वाच्या बाबी

पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण देणे गरजेचे आहे.

आऱ्या सुटण्याअगोदर आंतरमशागत करू नये.

आऱ्या सुटण्याच्या अगोदर युरियाची मात्रा देणे टाळावे.

पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था

फुले येण्याची अवस्था (पेरणीपासून २२-३० दिवस)

आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून (४०-४५ दिवस)

शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५ ते ७० दिवस)

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८६

(मृद्‌शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com