Cotton Cultivation : कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटणार

Cotton Sowing : मागील वर्षी कापसाच्या दराच्या अतिनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

Mumbai News : मागील वर्षी कापसाच्या दराच्या अतिनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी लागवडीखालील क्षेत्र ४१.२९ हेक्टरवरून ४०.२० लाख हेक्टरवर आले असून, शेतकरी मका पिकाकडे वळण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, निविष्ठांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना व्हॉट्‍सॲप आणि टोल फ्री क्रमांकावरून तक्रार नोंदवता येणार आहे.

मागील वर्षी दरातील चढ-उतार, पूर्वमोसमी पाऊस, कमी उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्याचा परिणाम यंदाच्या कापूस लागवडीखालील क्षेत्रावर दिसून येत आहे. यंदाच्या हंगामासाठी १ कोटी ७१ लाख पाकिटे बियाण्यांची गरज असून, पुरेशी बियाणे उपलब्ध असल्याचा दावाही केला आहे.

मागील हंगामात कापूस वेचणीच्या वेळी नेमका पूर्वमोसमी पाऊस पडला त्यामुळे कापसाच्या प्रतीवर त्याचा मोठा परिणाम झाला. तसेच कापसाच्या बियाण्यांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. बीजी ३ तंत्रज्ञानास मान्यता मिळेल म्हणून बीज २ बियाणे उत्पादन कार्यक्रम कमी क्षेत्रावर घेण्यात आला, त्यामुळेही बियाण्यांची काही ठिकाणी कमतरता जाणवत आहे.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी बळीराजा सरसावला

यंदाच्या हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक असून ५०.८६ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. यासाठी १३ लाख ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. राज्यात सध्या १८. ४६ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे. भात पिकाखाली १५.३० लाख हेक्टर क्षेत्राकरिता २.२० लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, २.५५ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे. महाबीजमार्फत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेत तेलबियांचे ७६ हजार क्विंटल, कडधान्य पिकांचे २४ हजार, भात पिकाचे १० हजार क्विंटल बियाणे प्रात्यक्षित व प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.

सोयाबीनच्या बियाण्यांची स्थिती

लागवडीखालील क्षेत्र : ५०.८६ लाख हेक्टर

प्रतिहेक्टर ७५ किलोप्रमाणे गरज ः ३८.१४ लाख क्विंटल

महाबीजकडे उपलब्ध बियाणे : ३.९ लाख क्विंटल

राष्ट्रीय बीज निगम : ०.४४ लाख क्विंटल

खासगी : १४.९३ लाख क्विंटल

घरचे सोयाबीन मोहीम : ४१ लाख क्विंटल

Cotton Cultivation
Cotton Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी कपाशी लागवड सुरू

कापूस बियांणे खरेदीसाठी १५ दिवस आधीच परवानगी

शेतकऱ्यांना १ जूनपासून कापूस बियाणे विक्री केली जाते. मात्र यंदा १५ मेपासून विक्रीस परवानगी देण्यात आली. सीमेलागतच्या जिल्ह्यातून बियाणे खरेदी केल्यानंतर अनेकदा पावती मिळत नाही. एचटीबीटी बियाणांकडे शेतकऱ्यांचा ओघ असतो त्यामुळे १५ दिवस आधीच विक्री सुरू केली. प्रत्यक्षात १ जूनपासून कापूस लागवड सुरू करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला होता.

जैविक खते, बुरशीनाशकांचा वापर वाढला

मागील तीन वर्षांत जैविक खते आणि बुरशीनाशकांचा वापर वेगाने वाढत चालला आहे. २०२१ ज्या खरीप हंगामात रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी या जैविक खतांचा ३५ हजार ७५८ लिटर, २०२२ च्या खरिपात ३७ हजार ३८७, २०२३ च्या खरीप हंगामात ७२ हजार २११ हजार लिटर वापर झाला आहे. तर बुरशीनाशक अनुक्रमे ३९५, ४५४ आणि ८५०. ८९ क्विंटल कृषी उद्योग महामंडळातून विक्री करण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामासाठी जैविक खते ८३ हजार ४०५ लिटर, तर बुरशीनाशक ११०० क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

खते, बियाण्यांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत यासाठी पुणे येथील आयुक्त कार्यालायात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सॲप क्रमांक दिला असून, १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक दिला आहे.

या दोन्ही क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिंकिंग याबाबत तक्रार करता येणार असून नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचा तपशील नोंदवावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com