Chhatrapati Sambhajinagar News : शेती मशागतीवर होणारा हजारोंचा खर्च वाचला. शिवाय, त्यामुळे वाढणारा मानसिक ताणही थांबला आहे,’’ अशी भावना शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव व सिल्लोड तालुक्यातील बोधवड येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) चे मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांनी गुरुवारी (ता. २३) खामगाव व बोदवड येथील मशागत तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधला. या दोन्ही प्रक्षेत्रावरील भेटीवेळी फुलंब्री, सिल्लोडसह कन्नड व सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शून्य मशागत एसआरटी तंत्रज्ञानाचे फायदे समजून घेतले.
या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी आघाव, सिल्लोडचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोरे, शून्य मशागत तंत्रज्ञानाचे प्रचारक गुलाबराव खंडागळे, सुरेश बेडवाल आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा शून्य मशागत तंत्रज्ञान भाताव्यतिरिक्त इतर पिकांत स्वीकारणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे. जवळपास २ हजार ५०० एकर इतर पिकांत जिल्ह्यात शून्य मशागत, एसआरटी तंत्रज्ञानाचा स्वीकार झाला आहे.
पेरणीपूर्व मशागत व आंतरमशागत असा एकूण जवळपास १२ ते १५ हजार रुपये एकरी पीकनिहाय खर्च वाचत आहे, अशी माहिती खामगाव व बोदवड येथील शेतकऱ्यांनी दिली. पावसाच्या प्रदीर्घ खंडातही या तंत्रातील बेडवरील पिकांना कुठलाही धोका झाला नसल्याचे व उत्पादनातही फारशी घट जाणवली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कोळेकर आज (ता. २४) सकाळी ८ वाजता पुन्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सकाळी ११.३० वाजता जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी आढावा बैठक घेतील. या बैठकीत जिल्ह्यातील प्रकल्प घटकांची बाबनिहाय अंमलबजावणी, फलनिष्पत्ती तसेच अडचणी जाणून घेतल्या जातील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.