Chicken Disease : कोंबडीमधील ओम्फायलायटीस आजाराचे नियंत्रण

Omphalitis Disease : ओम्फायलायटीस हा जीवाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे नवजात पिल्लांच्या नाभी आणि पोटावर सूज येऊन पोटाचा आकार वाढतो.
Chicken Disease
Chicken DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ.सुधाकर आवंडकर

Control of Omphalitis Disease in Chickens : ओम्फायलायटीस (मशी आजार) हा कोंबड्यांच्या नवजात पिल्लांना जडणारा जीवाणूजन्य आजार आहे. या आजारात नवजात पिल्लांच्या नाभीवर सूज येते.

या आजारामुळे नवजात पिल्लांत वयाच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू होतात. मृत्युदर ५ ते १० टक्के असू शकतो. परंतु कधी कधी तो १०० टक्के पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो.

कारण

जन्मावेळी नाभी पूर्ण बंद न झाल्याने नाभीमध्ये इ. कोलाय, स्टेफायलोकोकस, बेसिलस सिरस, सुडोमोना, प्रोटीअस आणि क्लोस्ट्रीडिया जीवाणूंचा संसर्ग होऊन आजार होतो.

जीवाणूसंसर्ग पिल्ले अंड्यातून बाहेर येतेवेळी किंवा त्यानंतर लगेचच होतो.

हॅचरीमध्ये पिल्ले अंड्यातून बाहेर येतेवेळी नाभी पूर्णपणे कोरडी न झाल्यास हा आजार जडण्याची शक्यता वाढते.

हॅचेरीत नाभी सुकणे ही प्रक्रिया उष्मायान आणि स्फुटन यंत्राचे तापमान आणि त्यातील आर्द्रता यांवर अवलंबून असते.

अंड्यांच्या उष्मायान कालावधीत उचित तापमान नसणे, स्फुटन यंत्रात अस्वच्छता असणे, आणि अंडी स्फुटन होत असतांना स्फुटन यंत्राचे तापमान योग्य नसणे या कारणांमुळे आजार होतो.

हॅचेरीमधील उपकरणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण न केल्यास आजार

होतो.

स्फुटन प्रक्रिया होताना अंडी फुटल्यास पिल्लांमध्ये जीवाणूसंसर्ग होतो.

Chicken Disease
Chicken Disease : कोंबड्यांतील फाउल कॉलरा संसर्गजन्य आजार

प्रसार

हॅचेरीमध्ये पिल्ले अंड्यातून बाहेर येतेवेळी नाभी पूर्णपणे कोरडी न झाल्यास आजाराचा प्रसार होतो.

स्फुटन करण्यासाठी अंडी अस्वच्छ असल्यास, अंडी कवच निर्धारित गुणवत्तेचे नसल्यास आणि पिल्लांना अस्वच्छ डब्यात ठेवल्यास जीवाणू संक्रमण होते.

अंडी कोंबड्यांच्या मलमुत्राने दुषित होणे हा जीवाणूसंसर्गाचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. दुषित अंड्यांत जीवाणूंचे बहुलीकरण अतिशय वेगाने होऊन नवजात पिल्लांमध्ये ते संक्रमित होतात.

बाधित पिल्ले इतर पिल्लांसाठी संक्रमणाचा स्त्रोत ठरतात.

लक्षणे

नवजात पिल्लांच्या नाभी आणि पोटावर सूज येऊन पोटाचा आकार वाढतो.

आंत्रावरणाचा संसर्गजन्य दाह होतो.

पोटात काळसर किंवा निळसर पाणी जमा

होते. नवजात पिल्लांच्या पोटात अंड्याच्या पिवळ्या बलकाची पिशवी असते. ती काही ठराविक कालावधीत सुकून जाते. परंतु या आजारात ती पिशवी न सुकता, दाह उत्पन्न होऊन सुजते.

पिल्ले सुस्त दिसतात. त्यांना नैराश्य येते. ते मान खाली टाकतात.

पिल्ले जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी गोळा होतात.

त्यांचे खाद्य खाणे आणि पाणी पिणे कमी होते.

पिल्लांना हगवण लागते. गुदद्वार विष्ठेने बंद होते. पिल्लांची वाढ खुंटते.

बाधित पिल्लांचा २४ तासांत मृत्यू होतो.

निदान

पिल्लांचे वय, लक्षणे आणि उत्तरीय तपासणीमध्ये दिसलेल्या लक्षणाद्वारे करता येते. प्रयोगशाळेत जीवाणू विलगीकरण करून आजाराचे निदान करता येते.

उपचार

आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या गटातील पिल्लांना पिण्याच्या पाण्यातून पाच दिवस योग्य प्रतिजैविक आणि इलेक्ट्रोलाईट द्यावे.

प्रतिजैविकाचा प्रकार, मात्रा आणि मात्रांचा कालावधी याबाबत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

प्रतिजैविकाचा वापर करण्याआधी प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी करावी. अन्यथा चुकीच्या प्रतिजैविकांमुळे आजार बळावण्याची शक्यता असते.

Chicken Disease
Chicken Disease Control : कोंबड्यामधील बाह्य परजीवी आजारांचे नियंत्रण

प्रतिबंधात्मक उपाय

उपकरणांची नियमित निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता होत असलेल्या हॅचेरीतून पिल्ले विकत घ्यावीत.

ब्रूडरची स्वच्छता व्यवस्थित करावी. त्यावर जीवाणूनाशक औषध फवारावे.

मरतुक झालेल्या पिल्लांना तत्काळ बाहेर काढावे. त्यांना जाळून किंवा खोल खड्ड्यात पुरून नष्ट करावे.

शेडमध्ये हवा खेळती असावी.

पिल्ले गर्दी होईल इतक्या जास्त संख्येने ठेऊ नयेत.

पिल्लांना अधिक उष्णता आणि थंडीपासून अलिप्त ठेवावे.

पिल्लांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छ, नितळ आणि ताजे असावे.

पाणी निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिनचा वापर करावा.

हॅचेरीमध्ये अंड्याचा साठा चांगल्या प्रकारे करावा.

अशक्त आणि मलूल पिल्लांना अंडी स्फुटन झाल्यानंतर लगेचच वेगळे करून नष्ट करावे.

फुटलेली आणि अस्वच्छ अंडी उबवणुसाठी ठेऊ नयेत.

नवजात पिलांची मरतुक तीन टक्के पेक्षा जास्त होत असेल तर प्यारेंट फ्लॉकच्या आरोग्याची तपासणी करावी. तसेच हॅचेरी मधील नियमित प्रक्रियांचे निरीक्षण करून समीक्षा करावी. नवजात पिल्लांच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा करू नये.

पिल्ले गादीवर सोडत असताना गादी पुरेशी गरम असल्याची खात्री करावी.

अंडी उबवणूक यंत्र प्रत्येक स्फुटनानंतर निर्जंतुक करावे.

निर्जंतुकीकरणासाठी धुरीकरण प्रक्रिया वापरत असल्यास, उबवणूक यंत्राचे छिद्र बंद करावे.

धुरीकरणासाठी प्रत्येक चौरस मीटर जागेसाठी ५० मिलि फोर्मल्डिहाइड(४०टक्के) किंवा प्यारा फोर्मल्डिहाइडमध्ये २२ ग्रॅम पोटॅशिअम परमॅंगनेटचा वापर करावा.वापर करताना कामगारांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

यंत्रांचे बाहेरील आवरण आणि हॅचेरीतील वातावरण दुषित असल्यास निर्जंतुकीकरण केलेले यंत्र दुषित होण्यास वेळ लागत नाही. म्हणून उबवणूक यंत्रासोबतच संपूर्ण खोलीचे निर्जंतुकीकरण करणे उपयुक्त ठरते.

डॉ. सुधाकर आवंडकर,९५०३३९७९२९, (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com