Mango Production : दर्जेदार आंबा उत्पादनात सातत्य

Mango Farming : रत्नागिरी जिल्ह्यातील सुनील नावले यांचे वडील गोपाळ हे मुंबईत नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी निरुळ (ता.जि. रत्नागिरी) येथे पारंपरिक पद्धतीने १५० कलमांची लागवड केली होती
Mango Management
Mango ManagementAgrowon

शेतकरी नियोजन

पीक : हापूस आंबा

शेतकरी : सुनील गोपाळ नावले

गाव : निरुळ, ता. जि. रत्नागिरी

हापूस आंबा क्षेत्र : २५ एकर

एकूण कलमे : १२००

रत्नागिरी जिल्ह्यातील सुनील नावले यांचे वडील गोपाळ हे मुंबईत नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी निरुळ (ता.जि. रत्नागिरी) येथे पारंपरिक पद्धतीने १५० कलमांची लागवड केली होती. १९९२ नंतर सुनील यांनी बागेकडे लक्ष दिल्यानंतर व्यवसाय वाढीसाठी नवीन बागांची खरेदी केली. मागील ३० वर्षांमध्ये नावले यांचे २५ एकर बागायती क्षेत्र झाले आहे. शिवाय अन्य बागांदेखील कराराने घेऊन आंबा उत्पादन घेण्यावर सुनील यांचा भर असतो.

मागील केलेले कामकाज

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु झाल्यानंतर हापूस कलमांना खते देण्यास सुरवात केली. खतमात्रा देताना कलमाच्या बुंध्यात रिंग पद्धतीने दिली जातात. कलमांचे वय आणि आकारमान यांचा अंदाज घेऊन खतमात्रा दिली जाते.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या कालावधीत कलमांना पाणी पुरेसे मिळते. त्यामुळे खतांचा तितकासा फायदा होत नाही. या महिन्यात कलमांच्या आकारमानानुसार संजीवकांच्या मात्रा दिल्या. मात्रा देताना कलमांचे मागील हंगामातील उत्पादन विचारात घेतले जाते.

Mango Management
Mango Farming : आंबा बागेतील फळगळीची कारणे अन् नियंत्रण उपाय

पावसाळ्यात बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत आणि बांडगुळांची वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यात बागेतील गवत आणि बांडगुळे काढून साफसफाई करून घेतली. काढलेले गवत कलमांच्या बुंध्यात टाकले. त्याचा कलमांना फायदा होतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात पाऊस सुरूच होता. त्यामुळे पुन्हा बागेमध्ये साफसफाई करून घेतली.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस बऱ्यापैकी थांबला होता. या काळात कलमांना मोहोर येण्यास सुरवात होते. त्यावेळी विविध किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी १० ते १२ दिवसांच्या अंतराने रासायनिक कीडनाशकांची फवारणी घेतली. या काळात काही कलमांना पालवी येते. नवीन येणाऱ्या पालवीवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास नवीन फुटींवर परिणाम होण्याची शक्यता असते.

जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच पडलेल्या अवकाळी पावसामुळे झाडावरील मोहोर कुजून गेला. त्यावेळी कणी ते सुपारीएवढ्या आकाराच्या कैऱ्या त्यातून वाचल्या. त्यापासून या हंगामात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्पादन मिळेल. त्यासाठी ५ जानेवारीनंतर २० फेब्रुवारीपर्यंत दहा दिवसांच्या अंतराने तीन रासायनिक फवारण्या घेतल्या आहेत.

सध्या हळूहळू तिसऱ्या टप्प्यातील फूट येण्यास सुरवात झाली आहे. त्यामधून मे महिन्यात उत्पादन मिळेल.

Mango Management
Mango Farming : सातत्यपूर्ण प्रयोगांमधून वाढविला आंब्याचा दर्जा

आगामी नियोजन

पुढील आठ दिवसांत उष्णतेच्या तीव्रतेत वाढ होण्यास सुरवात होईल. त्यानंतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

बागेतील आंबा काढणी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. काढणी काळात उन्हाचा तडाखा जास्त असतो. त्यासाठी दिवसाची सत्रामध्ये विभागणी करून त्यानुसार आंबा काढणी केली जाईल.

आंबा काढणी देठासह केली जाईल. फळांना चीक येणार नाही याची काळजी घेतली जाते.

संपूर्ण काढणी झेल्याच्या साह्याने केली जाईल.

काढणी केल्यानंतर त्वरित आंबे सावलीत ठेवले जातील. उन्हामुळे फळांत साका तयार होण्याची शक्यता असते.

त्यानंतर वजनानुसार फळांची प्रतवारी केली जाईल. साधारणपणे १८० ग्रॅम ते ३०० ग्रॅमपर्यंतची फळांच्या पेट्या भरल्या जातात. वजनामध्ये २५ ग्रॅमचा फरक असतो.

ग्राहकांच्या मागणीनुसार पाच ते आठ डझनाच्या पेट्या भरल्या जातात. तसेच मागणीनुसार एक, दोन डझनाच्या पुठ्याचे बॉक्सही तयार केले जातात.

निरुळ येथील बागेमधून पुणे, मुंबई, अहमदाबाद येथील बाजार समितीमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. तसेच वैयक्तिक विक्रीवरही भर दिला जातो.

गतवर्षी १२०० पेटी आंबा विक्रीसाठी पाठवला. सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये असा दर पाच डझनच्या पेटीला मिळाला होता. यंदा सुरवातीला दर चांगला मिळेल अशी अपेक्षा नावले यांनी व्यक्त केली.

सुनील नावले, ९८६००४२८३० (शब्दांकन : राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com