
Pune News: दैनिक ‘ॲग्रोवन’च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचे संदेश प्राप्त होत आहेत. शेतकरी, कृषी, कृषी पूरक-प्रक्रिया, व्यापार, उद्योग, शासन-प्रशासन आदी क्षेत्रातून ॲग्रोवनच्या द्विदशकीय वाटचालीबद्दल प्रतिक्रियांचा ओघही सुरू आहे.
दोन दशकांना मानाचा मुजरा !
कृषी विषयावरचं समर्पित दैनिक ‘अॅग्रोवन’च्या दोन दशकांना मानाचा कोल्हापुरी मुजरा. हे दैनिकाने केवळ एक वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून कार्य करत आहे. अत्यंत उत्तमपणे पद्धतीने, संपूर्णतः शेतकरीहितासाठी चालवले जाणार हे दैनिक जणू एक कृषी ज्ञानकोशच!
अॅग्रोवनने नेहमी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना शाश्वत उपाय सुचवले, शेतीत नवे दृष्टिकोन दिले आणि आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळेच आज हे वृत्तपत्र राज्याच्या लाखो शेतकऱ्यांच्या विश्वासाचं, आपुलकीचं नाव बनलं आहे. आपल्या निष्ठेने आणि सेवाभावाने उभं केलेलं हे कार्य प्रेरणादायी आहे. २०व्या वर्धापन दिनाच्या या गौरवशाली क्षणी, महाराष्ट्रातील संपूर्ण कृषी क्षेत्रातर्फे विशेष करून आमच्या साखर उद्येागाकडून संपूर्ण टीमचं मन:पूर्वक अभिनंदन, कौतुक आणि कृतज्ञता!
पी. जी. मेढे,साखर उद्येाग अभ्यासक, कोल्हापूर
ॲग्रोवनने माणसं जोडली
दैनिक ॲग्रोवन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा सोबती २० वर्षाचा केव्हा झाला, हे कळलेच नाही. जिवाभावाची माणसं जोडण्याचे, शेतीमध्ये नवीन प्रयोग करून आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ॲग्रोवन दैनिकाने केले, त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करतो.
बाळासाहेब बिडवे, सातोना बु., ता. परतूर, जि. जालना
बँकेत ॲग्रोवन सुरू केला...
सकाळ-ॲग्रोवनला बघता बघता दोन दशके पूर्ण झालीत. शेती व व्यवसायासंदर्भातील अत्यंत प्रभावशाली विषय, त्यांचे लेख व ती मांडण्याची पद्धत खरंच वाखाणण्याजोगी आहे. अंकातील यशोगाधा वाचून अनेकांनी त्याचे अनुकरण केले. याप्रकारे एक रोजगार निर्मितीच झाली आहे. यामुळेच आम्हीही आमच्या बँकेत ॲग्रोवन सुरू केला. वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या शाश्वत शेतीवरील दोन्ही विशेषांक अप्रतिम आहेत. वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
मोहन अप्तूरकर, पीआरओ, जिल्हा बँक, अकोला
पीक बदल केला
माझी राजगिरा शेती ॲग्रोवनमुळेच सुरू झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ॲग्रोवनमधील लेख वाचल्यानंतरच पीक बदल करण्याचे ठरवलं. २०१६ पासून राजगिऱ्याची शेती करत आहे. टीम ॲग्रोवनमधील सर्वांना शुभेच्छा.
पंडित थोरात, खानापूर, ता. जि. परभणी
२००५ पासून मी वाचक
२० एप्रिल २००५ रोजी राज्यात पहिल्या कृषी दैनिकाचे पहिला अंक प्रसारित झाला, तेव्हापासून मी ॲग्रोवनचा वाचक आहे. गेल्या वीस वर्षांत या दैनिकाने शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान दिले. कृषी तंत्रज्ञान पोहोचविले, पिकावरील अनेक संकटे-समस्या सोडविण्यासाठी मोठा हातभार लावला. कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांना मोठे व्यासपीठ मिळाले.
राकेश वसू, तालुका कृषी अधिकारी, पारशिवनी, नागपूर
मार्गदर्शक ॲग्रोवन
शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा ॲग्रोवन आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. शेतकरी जे काही चांगले करतो, ते इतरांना सांगतो आणि त्यातून प्रगती साधली जाते, याचा समन्वयक माध्यम आहे, ते म्हणजे ॲग्रोवन! वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेला सर्वांग सुंदर अंक मनाला भावला. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रमेशभाई पुरुषोत्तम पाटील (प्रगतिशील शेतकरी, चेअरमन, दूध उ.संघ) पाचोराबरी, ता. नंदुरबार
शेतीप्रगतीसाठी बळ मिळते
गेली पंधरा वर्षे मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. यातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या शेतामध्ये प्रत्यक्षरीत्या करतो. ॲग्रोवन वाचून मला माझ्या शेती बद्दलच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळतात, शेतीची प्रगती साधण्याचे बळ मिळते. शेतीमध्ये विविध प्रयोगामध्ये वेळोवेळी यशस्वी झालो, याचे श्रेय मी ॲग्रोवनला देतो. ॲग्रोवनला खूप खूप शुभेच्छा.
- विकास हरिभाऊ चव्हाण, मु.पो.पारगाव (मंगरूळ), ता.जुन्नर, जि.पुणे
शेतकऱ्यांचे कौतुक होते...
ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्याचा होत असलेला प्रयत्न सुंदर आहे. यशोगाथेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नालाही वाचा फुटते. त्यामुळे ॲग्रोवन हा आमचा स्वतःचा मार्गदर्शक असल्याबरोबरच कुटुंबाचा ज्येष्ठ घटक वाटतो. ॲग्रोवनला शुभेच्छा !
- दीपक कुलकर्णी, नंदुरबार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.