
Maharashtra Monsoon Assembly Session : समृद्धी महामार्ग जीवघेणा ठरत आहे. हा महामार्ग व्हावा असे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते, पण हे जीवघेणे स्वप्न ठरत आहे. त्यामुळे पुढील सहा महिने हा महामार्ग बंद ठेवून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, त्यातील दोष काढूनच मग हा महामार्ग सुरू करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाचे पुन्हा उद्घाटन करता यावे यासाठी घाईघाईने या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा अपघात घडला,’ अशी टीका केली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधानसभेत निवेदन करून अपघाताची माहिती दिली. मात्र त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिटबाबत काहीही भाष्य केले नाही. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर स्थगन प्रस्तावाद्वारे समृद्धी महामार्गावरील अपघातप्रश्नी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी चर्चेची मागणी केली. हा महामार्ग शापित ठरत असून तो बंद करावा, अशी मागणी केली.
विजय वडेट्टीवार यांनी, हा महामार्ग जीवघेणा ठरत असून, महामार्गावर सुविधा नसतानाही तो सुरू करण्याचा घाट घातला. त्यामुळे येथे सर्व सुविधा झाल्यानंतरच तो सुरू करावा. या अपघाताची जबाबदारी कुणा व्यक्तीवर टाकून मोकळे होता येणार नाही. ज्याप्रकारे या रस्त्याची निर्मिती झाली ते पाहता त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की ‘गर्डर बसविताना झालेला अपघात टाळता येण्यासारखा होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी या महामार्गाचे काम करून त्याचे पुन्हा उद्घाटन करण्यासाठी घाईने हे काम सुरू आहे. तज्ज्ञ इंजिनिअर्सच्या अभावी हा अपघात झाला आहे. त्यामुळे नाहक बळी गेले आहेत.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख म्हणाले, ‘अशा प्रकारचे गर्डर लाँचिंग करत असताना अपघात होत नाही. समुद्रातील काम करत असतानाही असे अपघात झालेले नाहीत. मग इथे अपघात कसा झाला? शिवाय महामार्गावरील अपघात कसे होतात याची चौकशी केली पाहिजे.’
यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सरकार सविस्तर निवेदन करेल असे सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री भुसे यांनी केलेल्या निवेदनात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७०१ किमीपैकी ६०० किमीचे काम पूर्ण झालेले असून, हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. उर्वरित नाशिक व ठाणे जिल्ह्यांतील १०१ किमीचे काम प्रगतिपथावर आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे सुमारे २.२८ किमी लांबीच्या व्हायडक्ट पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून, बांधकामाकरिता कंत्राटदार मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने व्ही. एस. एल. इंडिया प्रा. लि. सिंगापूर या जगातील अग्रगण्य कंपनीला हे काम दिलेले आहे. संपूर्ण जगात अशा तीन ते चार कंपन्या आहेत. या कंपनीचे स्वयंचलित लाँचर वापरण्यात येत असून, याचे वजन ७०० टन इतके आहे. या स्वयंचलित लाँचरमार्फत एकूण ११४ गाळ्यांपैकी ९८ गाळ्यांचे बांधकाम या कंपनीने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
तथापि, ३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.३० वाजता लाँचिंग गर्डर दुसऱ्या दिवसाची पूर्वतयारी करण्यासाठी गेले असताना क्रेन (सेगमेंट लाँचर) पूर्ण झालेल्या गर्डरसह ३५ मीटर उंचीवरून अचानक कोसळली. यात १७ कामगार, ४ अभियंते व ७ कर्मचारी असे एकूण २८ जण दुसऱ्या दिवसाची पूर्वतयारी करण्यासाठी गेले होते. त्यापैकी १३ कामगार, २ अभियंते व ५ कर्मचारी असा एकूण २० जणांचा मृत्यू झाला असून, ३ जखमी झाले आहेत, असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.