Sugarcane Crop Protection: ऊस पिकातील चाबूक काणी, गवताळ वाढ नियंत्रण

Sugarcane Farming: उन्हाळ्यात पाण्याचा ताण, वाढलेले तापमान, गरम हवा यामुळे पिकाच्या शारीरिक क्रिया मंदावतात. पानांतील हरितद्रव्ये कमी होऊन अन्न तयार होण्याचा व वहनाच्या मार्गात अडथळा येतो. त्यामुळे पीक अशक्त होऊन अनेक रोगास बळी पडते. रोगाची तीव्रतादेखील वाढते. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
Sugarcane Crop
Sugarcane CropAgrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. ए. डी. कडलग, जी. ई. आत्रे

Sugarcane Disease Control: राज्यात ऊस लागवडीखाली क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, देशात ऊस पिकाचे दरमहा दर हेक्टरी उत्पादन मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी होत चालले आहे. उसाचे व साखरेचे प्रति हेक्टरी उत्पादन कमी येण्यामागे रोगांचा प्रादुर्भाव व वाढता प्रसार हे महत्त्वाचे कारण आहे. अलीकडे उसावर आढळणाऱ्या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामागे एकाच भागात ऊस पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड, ऊस बेण्यांची अनिर्बंध ने-आण, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा असंतुलित व अवेळी वापर, किडींचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव, पाण्याचा ताण, अति पाण्याचा वापर, अतिवृष्टी व पूर परिस्थिती अशा कारणांचा समावेश होतो.

राज्यात उन्हाळी हंगामात ऊस पिकावर येणारा ताण ही नेहमीची बाब आहे. उन्हाळ्यात पाण्याचा ताण, वाढलेले तापमान, गरम हवा यामुळे पिकाच्या शारिरिक क्रिया मंदावतात. पानांतील हरितद्रव्ये कमी होऊन अन्न तयार होण्याचा व वहनाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्ामुळे पीक अशक्त होऊन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. पर्यायाने पीक अनेक रोगास बळी पडते. तसेच रोगाची तीव्रतादेखील वाढते. त्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे.

Sugarcane Crop
Sugarcane Management : वाढत्या तापमानात ऊस पिकाचे व्यवस्थापन

चाबूक काणी किंवा काजळी

रोगकारक बुरशी ः स्पोरिसोरियम सिटॅमिनी.

सर्व ऊस उत्पादक भागात प्रादुर्भाव आढळतो.

राज्यात लागवडीखाली असणाऱ्या सर्वच जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात.

पीक वाढीच्या सर्व अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

लागण पिकापेक्षा खोडवा पिकात काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते. कारण लागण पिकातील रोगग्रस्त बेटे काढली जात नाहीत तसेच खोडवा पिकाचा सुरुवातीचा काळ उन्हाळ्यात राहतो. हवेतील व जमिनीचे तापमान वाढते. अशा पोषक हवामानात रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव जास्त होतो. खानदेश आणि मराठवाडा भागात रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे.

रोगाचा प्रसार

मुख्यत्वेकरून दूषित बेण्यामार्फत तसेच वारा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत होतो.

लक्षणे

रोगाची लागण झालेल्या उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता होत गेलेला पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो, तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.

रोगामुळे उसाची पाने अरुंद व आखूड राहतात. त्यामुळे रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात.

काहीवेळा खोडवा पिकात रोगग्रस्त बेटात जास्त प्रमाणात फुटवेदेखील आढळतात. 

उभ्या उसास रोगाची लागण झाल्यास कांड्यावरील डोळ्यातून काणीयुक्त पांगशा फुटतात. रोगट बेटे कालांतराने वाळून जातात. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो.

काणी रोगामुळे लागण व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन अनुक्रमे २९ ते ७० टक्क्यांपर्यंत घटल्याची नोंद आहे. साखर उतारादेखील ४ युनिटपर्यंत घटतो. तसेच रसाची शुद्धता घटते.

Sugarcane Crop
Sugarcane Farming : उसासाठी कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन हवे

रोगाचे नियंत्रण

बेणे मळ्यातील बेणे लागणीसाठी निवडावे. मूलभूत बेणे तयार करण्यासाठी ऊस बेण्यास लागणीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राद्वारे ५४ अंश सेल्सिअस तापमानास १५० मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर बेण्यास कार्बेन्डाझिम बुरशीनाशक (०.१ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात प्रक्रिया करावी. मूलभूत बियाणे तयार करण्यासाठी उती संवर्धित रोपांचा पर्याय निवडावा.

मध्यम रोगप्रतिकारक जाती (उदा. कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ४३४, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ०३१०२, पी. डी. न १५०१२, व्हीएसआय ८००५, कोव्हीएसआय १८१२१) ची लागवड करावी.

नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे मुळासहित काढावीत व जाळून नष्ट करावीत. काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वी बेटे निर्मुलन झाले, तर रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. याकरिता प्रथम काणीयुक्त फोकारे प्लास्टिकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यावीत व नंतर बेटे काढावीत. साखर कारखान्याच्या माध्यमातून सामुहिक पद्धतीने काणीग्रस्त बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावी करता येईल.

खोडवा पिकाचे शास्त्राेक्त पद्धतीने नियोजन करावे.

 उन्हाळ्यात ऊस पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकास ताण सहन करण्यासाठी शिफारशीनिहाय उत्पादनांचा वापर करावा.

गवताळ वाढ

 हा रोग बेण्याद्वारे व किडीद्वारे पसरणाऱ्या फायटाेप्लाझमामुळे होतो.

 प्रसार ः मुख्यत्वेकरून दूषित बेण्यामार्फत व किडीद्वारे (मावा, तुडतुडे) होतो.

 को ४१९, कोएम ०२६५, कोसी ६७१, को ८६०३२, पी. डी. एन १५०१२, व्हीएसआय ८००५ व कोव्हीएसआय १८१२१ या जातींमध्ये रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण सरासरी १० टक्क्यांपर्यंत असून ते वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लक्षणे

पिकाच्या सुरुवातीच्या काळात ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात. बेटास गवताच्या ठाेंबाचे स्वरूप येते. बेटांत फुटव्यांची संख्या काहीवेळा १०० पेक्षा जास्त आढळते.

रोगामुळे उसाच्या पानामध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे पाने पिवळी किंवा पांढरी पडतात.

रोगट बेटात गाळण्यालायक ऊस तयार होत नाहीत. रोगट उसावरील पाने अरुंद व आखूड होतात.

पूर्ण वाढ झालेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात. कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर (केवड्यासारख्या) पांगशा फुटतात.

रोगट ऊस नंतर पोकळ पडतो व वाळतो.

या रोगामुळे ऊस उत्पादनात ५ ते २० टक्क्यांपर्यंत घट येते.

खोडवा पिकात रोगामुळे जास्त प्रमाणात बेटे पिवळी पडून मरतात. खोडवा पिकात रोगाचे प्रमाणदेखील सुरुवातीच्या काळात जास्त आढळते. रोगग्रस्त खोडवा पिकातील उसांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट येते.

नियंत्रण

बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागणीसाठी निवडावे. बेणे मळ्यासाठी मूलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्यास बाष्प उष्ण हवा प्रक्रिया ५४ अंश सेल्सिअस तापमानास १.५ तास मिनिटे करावी किंवा उती संवर्धित रोपांचा वापर करावा.

कार्बेन्डाझिम बुरशीनाशक एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बेणे १५ मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवड करावी.

उसाची उगवण झाल्यानंतर नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे काढावीत. ती त्वरित जाळून नष्ट करावीत. शक्यतो हा बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम सामूहिक पद्धतीने राबविल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.

उसावरील रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण वेळीच करावे. जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.

रोगाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या पिकाचा खोडवा घेवू नये. पिकाची फेरपालट करावी, जेणेकरून रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील.

०२०२६०९०२२६८ - डॉ. गणेश कोटगिरे ९९६०८३३३०१, ८७८८१५३३३२ (ऊसरोग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com