
डॉ. गणेश कोटगिरे, डॉ.ए.डी.कडलग
Sugarcane Farming Issues : अचानकपणे होणाऱ्या हवामान बदलांचा पिकांवर विपरीत परिणाम वारंवार दिसत आहेत. हवामानातील बदलांमुळे पिकांवर जैविक किंवा अजैविक घटकांच्या माध्यमातून परिणाम होतात. मागील काही वर्षांपासून ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसत आहे. हा परिणाम ऊस पिकांवर पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे या विकृतीच्या स्वरूपात मर्यादित होता.
या विकृतीमुळे होणारे नुकसान अत्यल्प होते. यावर्षी महाराष्ट्रात हिवाळी हंगामात तापमान जास्त कालावधीपर्यंत कमी राहिले होते; तर काही भागात तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा खूप कमी नोंदविले गेले. यंदाच्या हिवाळ्याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे काही भागात सकाळी थंडीच्या वेळी वारे वहात होते. या हिवाळ्यात आर्द्रतेचे हवेतील प्रमाण अत्यल्प आहे; साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस तोडणी करून राखलेल्या खोडवा पिकात (२ ते ३ महिन्याचे पीक) थंडीचा विपरीत परिणाम लक्षणीयरित्या दिसून आलेला आहे.
पिकाची पाने जांभळ्या रंगाची होणे ,पानाचे टोक वाळणे, वाढ खुंटणे आदी लक्षणे दिसत होती. थंडीचा परिणाम हा पानापुरताच मर्यादित असून वाळलेले पोंगे सहजपणे उपसून येतात. मात्र, पोंग्यातील वाढणारा कोंब सुस्थितीत आहे. बेटातील मुळे कमी असली तरी जिवंत आहेत.
अति थंडीचा परिणाम
ज्या शेताच्या सभोवताली वाऱ्यास अडथळा आहे, त्या ठिकाणी पाने सुकण्याचे प्रमाण कमी आहे.
गाळप हंगामास तयार झालेल्या मोठ्या उसात काही भागात वाढ्यावरील पाने वाळलेली आढळली.
पाचट आच्छादित खोडवा पिकास जिथे पाण्याचा ताण दिला आहे, अशा पिकात पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे. पाने वाळण्याची समस्या पाचट ठेवलेल्या शेतापुरती मर्यादित नसून पाचट न ठेवलेल्या पिकात देखील दिसत आहे.
ज्या पिकास वारंवार किंवा नुकतेच सिंचन केले आहे, अशा शेतात थंडीचा परिणाम कमी आहे, याउलट, ज्या खोडवा पिकास पाण्याचा ताण दिला आहे; त्या ठिकाणी पिकाची पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे.
सर्वच ऊस जातीमध्ये थंडीमुळे नुकसान झाल्याचे दिसते. कोएम-०२६५ आणि को-८६०३२ या जातीच्या खोडवा पिकात नुकसानीचे प्रमाण इतर जातींपेक्षा जास्त आहे. या दोन जातीपैकी कोएम-०२६५ या जातीत तीव्रता अधिक आहे.
आडसाली हंगामात लागवड केलेल्या पिकात तसेच या हंगामात राखलेले बेणे, खोडवा पिकात थंडीचा परिणाम अत्यल्प आहे. या पिकांमध्ये पाने जांभळी होणे, पानांची टोके वाळली आहेत.
जमिनीच्या उंच आणि सखल भागात थंडीचा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो.
परिणामाची तीव्रता उंच भागात असणाऱ्या पिकात जास्त आहे.
बेटांमध्ये नवीन मुळे कमी प्रमाणात आहेत; पण असलेली मुळे जिवंत आहेत.
पाटपाणी सिंचन पद्धतीत असलेल्या पिकांत परिणामाची तीव्रता ठिबक सिंचनाखाली असलेल्या पिकापेक्षा कमी आढळली.
भारी जमिनीतील पिकात थंडीचा परिणाम हलक्या जमिनीतील पिकापेक्षा कमी प्रमाणात आहे. ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे , त्या जमिनीतील पिकात पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे.
कमी परिणाम झालेल्या ऊस पिकात पाने वाळण्याव्यतिरिक्त पाने टोकाच्या भागात वाळणे, पाने सुरकुतणे, पाने जांभळी होणे आणि वाढ खुंटणे इत्यादी लक्षणे दिसत आहेत.
ऊस पिकाव्यतिरिक्त मका, बाजरी, कलिंगड, काकडी या पिकांवर पाने वाळण्याची लक्षणे दिसतात.
शास्त्रीय कारणमीमांसा
अति थंडी आणि त्याचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानांतील पेशी निर्जीव होतात. त्या निर्जीव भागात प्रकाश संश्लेषणाचे कार्य होत नाही. त्यामुळे तो भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर राहतो.
पोंग्यातील पानाचा निर्जीव झालेला भाग सडतो आणि त्यानंतर वाळतो. हवामान बदलामुळे झालेली ही शारिरिक विकृती आहे. ही विकृती समस्याग्रस्त पानापुरतीच मर्यादित असते. त्याचा संसर्ग इतर पानांवर होणार नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपेल.
आडसाली हंगामातील पिकामध्ये आणखी काही दिवसानंतर वाढ्याच्या कोवळ्या (१, २ आणि ३ क्रमांकाच्या पानावर) २ ते ३ इंच रुंदीचे आडवे पट्टे उसाच्या समान उंचीवर आढळून येण्याची शक्यता आहे. या विकृतीस बँडेड क्लोरॉसीस / कोल्ड क्लोरॉसीस असे म्हणतात. पानावरील पांढरे किंवा हिरवट-पिवळसर पट्टे ही विकृती कोणताही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नाही, त्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही. या समस्येमुळे पिकाचे नुकसान होणार नाही. पानावरील पट्टे हे समस्याग्रस्त पानापुरती मर्यादित असतील.
अति थंडीत ऊस पिकासाठी करावयाच्या उपाययोजना
साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील प्रभावित झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण करावे. जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सोयीचे होईल.
पूर्णपणे पाने वाळलेल्या पिकाचा खोडवा राखण्यास हरकत नाही. वाळलेल्या पिकाची कापणी जमिनीलगत धारदार विळ्याच्या साहाय्याने करावी. पीक कापणीनंतर कापलेल्या बेटांवर कार्बेन्डाझिम १० ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के) ३ मिलि प्रति १० लिटर या प्रमाणात फवारणी करावी. ( ॲग्रेस्को शिफारस) यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
नियमीत खतमात्रेव्यतिरिक्त एकरी १०० किलो युरिया खताची जादा मात्रा शेणखत किंवा कंम्पोस्ट खतात मिसळून जमिनीत द्यावी.
पाचट राखलेल्या शेतात पाचटावर युरिया (एकरी ५० किलो) आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एकरी ५० किलो) शेणखत किंवा कंम्पोस्ट खतात मिसळून पिकाला द्यावे. पाचट लवकर कुजण्यासाठी पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक (द्रवरूप १ लिटर किंवा घनरूप स्वरूपातील एकरी ४ किलो या प्रमाणात) शेणखत किंवा कंम्पोस्ट खतात मिसळून पाचटावर पसरावे.
पिकाचे वय २ आणि ३ महिने झाल्यावर मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची फवारणी करावी.
पाचट कुट्टी केलेल्या खोडव्यात दातेरी कुळव किंवा बळीनांगराने जमीन भुसभुशीत करावी.रिजरने भरणी/ मोठी बांधणी करू नये. मोठी बांधणी करावयाची असेल तर ती पिकाचे वय ३ ते ३.५ महिन्याचे असावे.
ज्या पिकाची पाने वाळलेली नाहीत अशा पिकांवर मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची शिफारशीप्रमाणे फवारणी करावी. सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांच्या मात्रा खोडवा तसेच लागण पिकास शिफारशीप्रमाणे किंवा माती परिक्षणांवर आधारित द्याव्यात.
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेची सुविधा आहे, त्यांनी नदीतील पाण्याऐवजी विहीर किंवा कूपनलिकेच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.
चुनखडीयुक्त जमिनीत केवडा तसेच थंडीमुळे वाळण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते. ही समस्या टाळण्यासाठी झिंक, फेरस तसेच मँगेनीज ही सूक्ष्मअन्नद्रव्ये शेणखतात मिसळून जमिनीत द्यावीत किंवा फवारणीद्वारे द्यावीत. यासाठी व्हीएसआय निर्मित मल्टीमायक्रोन्यूट्रियंटचा वापर करावा.
या पुढील काळात पिकास जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी व्हीएसआय निर्मित वसंत ऊर्जा या कायटोसानयुक्त उत्पादनाचा वापर ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणीद्वारे केल्यास उन्हाळ्यात जास्त तापमान; तसेच संभाव्य किडी आणि रोगास प्रतिकारक्षमता वाढेल.
- डॉ. गणेश कोटगिरे, ९९६०८३३३०१ (कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), जि. पुणे )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.