
Pune News : राज्यात चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट कोणी म्हणत नाही. चांगल्याला बक्षीस आणि वाईटाला शिक्षा कोणी देत नाही. ‘सब घोडे बारा टके’ अशी सध्याची अवस्था आहे. मात्र आपल्याला हे सगळे बदलायचे आहे. राज्यातील जिल्हा परिषदांचे बहुतांश मुख्य कार्यकारी अधिकारी हे तरुण आहेत. त्यांच्यातील हिरो कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे. त्यांच्यात स्पर्धा खूप आहे. पण प्रत्येकाच्या कामाची नोंद घेतली जाईल. त्यांचा योग्य गौरव केला जाईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.
ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘यशदा’ येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला शनिवारी (ता. २६) प्रारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘यशदा’चे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा थेट ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत संपर्क असतो. त्यामुळे तुमच्याकडून मला इथे शिकायला मिळेल म्हणून मी आलो आहे. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचा सीईओ व्हायला २५-३० वर्षे लागतात. पण तुम्ही २५-३० व्या वर्षीच सीईओ होता. मिलियन प्लस लोकसंख्येचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला तरुण वयात मिळते. ही संधी जबाबदारीवर आधारित असते. त्यातून उत्तम काम करायचे आहे. राज्याची विकासाची दिशा आणि वेग काय असला पाहिजे, यासाठी १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा टास्क देण्यात आला होता.
यामध्ये आपण सर्वांनी उत्तम काम केले आहे. आपण पाठविलेल्या प्रस्तावांचे मूल्यमापन सुरू आहे. उत्तम प्रस्तावांचे (बेस्ट प्रॅक्टिसेस) चे मूल्यमापन आणि स्टॅडररायजेशन करून चांगल्या योजना आणू. विविध संकल्पनांचे एकत्रिकरण करून, त्यांची क्लॉलिटी कंट्रोल ऑफ इँडियाद्वारे (QCI) तपासणी सुरू आहे. या माध्यमामतून तुमच्या सीईओंमधील हिरो कोण आहे, याची माहिती घेण्यासाठी मी उत्सुक आहे. स्पर्धा खूप आहे. प्रत्येकाच्या कामाची नोंद घेतली जाईल. आणि त्यांचा कुटुंबीयांसह ‘वर्षा’ बंगल्यावर गौरव केला जाईल.’’
जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘राज्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना आणत आहोत. ही योजना ग्रामविकास विभागाचा चेहरा असणार आहे. या योजनेद्वारे ग्रामविकास विभागाच्या सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे. याद्वारे सर्वोत्तम गावाला राज्यस्तरीय पहिले ५ कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे, तर सीईओंना पण पुरस्काराची शिफारस मी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे.’’
१०० दिवस संपले की १५० दिवसांचा कार्यक्रम येतोय
१०० दिवसांच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी उत्तम काम केले आहे. पुढील ६ गटांद्वारे आपल्या संकल्पना सुचनांचे एकत्रिकरण करून, चांगल्या लोककल्याणकारी योजना आणल्या जातील. आपला अहवाल १५ ऑगस्टपर्यंत अहवाल द्या. त्यापूर्वी त्याचे सादरीकरण करून तो अंतिम करू. यानंतर १५० दिवसांच्या कार्यक्रमांचा आराखडा तयार केला जातोय. तो तुम्हाला लवकरच सादर केला जाईल.
८० टक्के नियुक्त्या गुणवत्तेवर, तर २० टक्के राजकीय
विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या गुणवत्तेवर केल्या जात आहेत. तर २० टक्के नियुक्त्यांसाठी राजकीय विचार करावा लागतो म्हणून त्या खुर्चीवर बसतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
डवले ग्रामविकास जलसंधारणाचे एक्सपर्ट
एखादा अधिकारी चांगले काम करू लागला की, त्यावर अधिकची जबाबदारी देऊन चांगल्या अर्थाने अन्याय केला जातो. तसे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे झाले आहे. डवले हे ग्रामविकास आणि जलसंधारणाचे एक्सपर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्याचा विचार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.