CM Eknath Shinde : ...तर मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत, कोल्हापूर बंदची हाक, कृती समिती आक्रमक

Kolhapur Protest : गनिमी काव्याने काळे झेंडे दाखवणे, पोस्टरवर काळे फासणे आदी आक्रमक पद्धतीने निषेध करण्याचाही इशारा देण्यात आला.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeagrowon

All Party Action Committee Protest : कोल्हापूर शहराची हद्दवाढ व खंडपीठ, तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी वारंवार आश्‍वासने देऊनही ठोस निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मंगळवारी (ता. २५) होणाऱ्या दौऱ्यादिवशी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय काल(ता.२४) कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गनिमी काव्याने काळे झेंडे दाखवणे, पोस्टरवर काळे फासणे आदी आक्रमक पद्धतीने निषेध करण्याचाही इशारा देण्यात आला.

महाराणा प्रताप चौकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत होते. यावेळी रिक्षाचालक व वाहनधारकांनी बंदला जाहीर पाठिंबा दिला. बिंदू चौकात सकाळी साडेनऊ वाजता जमून दुचाकी रॅलीद्वारे शहरात बंदचे आवाहन करण्याचेही ठरले.

यावेळी आर. के. पोवार म्हणाले, ‘‘शासनाने, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवण्याची कितीदा आश्‍वासने दिली; पण पुढे काहीही झालेले नाही. नगरविकास मंत्री असताना आश्‍वासन देणारे मुख्यमंत्री झाले तरी पूर्ण झालेले नाही. सर्व मंत्री खोटे बोलत आहेत. त्यामुळे बंद पाळून या प्रश्‍नांचे गांभीर्य दाखवून देऊया.’’ ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘या प्रश्‍नांची निकड सांगण्याची आता गरज राहिलेली नाही. मुख्यमंत्र्यांना खंडपीठासाठी सात वेळा भेटलो; पण त्यांना मुख्य न्यायमूर्तींना भेटण्याची सवड मिळालेली नाही.’’

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य न्यायमूर्तींना भेटण्याचे धाडस नाही. हद्दवाढीचा प्रश्‍न जनआंदोलनाशिवाय सुटणार नाही. आंदोलनात राजकीय पुढारी घेतले, तरीही प्रश्न सुटणार नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढवायला हद्दवाढ हवी, ही भूमिका बदलत नाही, तोपर्यंत ग्रामीणमधून सहकार्य मिळणार नाही. कोल्हापूर बंद बरोबरच मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मुक्कामाला असतील तेथे काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणा देऊ.

कोल्हापूरचे पुरोगामित्व घालवणाऱ्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळे फासू.’’ सर्जेराव खोत यांनी हद्दवाढीचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. खंडपीठाची ‘आर या पार’ची लढाई यावर्षीच पूर्ण करायची आहे. त्यासाठी (ता. २९)ला बैठक घेतली आहे. दिलीप देसाई म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येण्यास बंदी घालावी. त्यांचा सन्मान काळे झेंडे दाखवूनच केला जावा.’’

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री चर्चेला तयार असतील, तर चार पावले मागे घेण्यास हरकत नाही; पण एकदा निर्णय घेतल्यास बंद कडकडीत झाला पाहिजे. त्यासाठी शहर बंद करण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून घेऊया.’’

CM Eknath Shinde
Sangli Kolhapur Flood : महापूर काळात सांगली जलसंपदा विभाग निवांत; कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी संपर्कच नाही, अहवालातून स्पष्ट

दिलीप पवार म्हणाले, ‘‘प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. तहामध्ये हरायला नको, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.’’ सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या छातीत धडकी भरवणारे आंदोलन केले पाहिजे.’’ पद्मा तिवले म्हणाल्या, ‘‘या प्रश्‍नांबाबत सरकार निर्णय घेणार नसेल, तर पालकमंत्री, आमदारांनी राजीनामे द्यावेत. प्रसंगी त्यांच्या दारात जाऊनही आंदोलन करून ते सोबत आहेत की नाही, हे तपासता येईल.’’

चंद्रकांत यादव म्हणाले, ‘‘जनतेला सोबत घेऊन राज्यकर्त्यांवर दबाव वाढवल्याशिवाय पर्याय नाही.’’ त्यांनी आपला कोण व शत्रू कोण हे ओळखायला हवे, असे सूचकपणे मांडले. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांचे पाठीराखे कोण होते? अशा झारीतील शुक्राचार्यांच्या घरासमोरही काळे झेंडे दाखवले पाहिजेत.’’ ॲड. रणजित गावडे म्हणाले, ‘‘आंदोलनासाठी नियोजन करून समिती सतत कार्यरत ठेवण्याची गरज व्यक्त केली.’’ अशोक भंडारे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, अनिल घाटगे, रघुनाथ कांबळे, सुनील देसाई, मारुतराव कातवरे आदी उपस्थित होते. बाबा पार्टे यांनी स्वागत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com