Uttarakhand Forest Fire : सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघडीनंतर थेट १० जणांचे निलंबन; ७ वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Chief Minister Pushkar Singh Dhami : उत्तराखंडमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या आगीच्या घटना थांबलेल्या नाहीत. तर राज्यातील ११ जिल्ह्यातील १३१६ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.
Uttarakhand Forest Fire
Uttarakhand Forest FireAgrowon

Pune News : उत्तराखंडमध्ये आगीचा हाहाकार सुरूच असून आतापर्यंत ११ जिल्ह्यातील १३१६ हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. यावरून बुधवारी (ता.०८) सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले होते. तसेच आगीवर नियंत्रण लवकर मिळवा अशा सूचना केल्या होत्या. यादरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत डेहराडूनला जाऊन बैठक घेऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली.

मुख्यमंत्र्यांनी जंगलातील आगीची परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या सूचनेनंतर थेट सात वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून १० जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर हे निलंबन जंगलाला लागलेल्या आगीवेळी कर्तव्यात कसूर करण्यासह निष्काळजीपणा केल्याने केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी बैठकीत इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग कौन्सिलचे उपाध्यक्ष विश्वास डाबर, मुख्य सचिव राधा रातुरी, अपर मुख्य सचिव आनंद बर्धन, प्रधान सचिव आर.के.सुधांशू, विविध विभागांचे विभागप्रमुख आणि सर्व जिल्हादंडाधिकारी आभासी माध्यमातून उपस्थित होते.

Uttarakhand Forest Fire
Uttarakhand forest fire : जंगलात लागलेल्या आगीवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले; तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना

उत्तराखंडमधील जंगलातील आग काही केल्या आटोक्यात येत नसल्याने मुख्यमंत्री धामी यांनी डेहराडूनला बुधवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. तसेच आगीग्रस्त भागाची हवाई पाहणी देखील केली होती. यानंतर त्यांनी आग रोखण्यात निष्काळजीपणा केल्यावरून दोन वनपरिक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाण्याच्या सूचना केल्या.

ज्यांनी आगीवेळी कर्तव्यात कसूर करण्यासह निष्काळजीपणा केला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वन विभागाने संबंधीत वनपरिक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून १० वन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच अन्य काही कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही सांगितले आहे.

डेहराडूनला येथील बैठकीत मुख्यमंत्री धामी यांनी कठोर भूमिका घेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांसह आग लावणाऱ्या बेशिस्त घटकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जंगलातील आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सर्व सचिवांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी द्यावी अशी सूचना त्यांनी केल्या होत्या.

बैठकीनंतर मुख्यमंत्री धामी म्हणाले, सर्व सचिवांनी जंगलातील आगग्रस्त भागाची जागेवर जाऊन पाहणी करावी. जंगलातील आग रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. फायर लाईन बांधण्याच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेऊन त्यांची मदत घेण्यात यावी. यावेळी रुद्रप्रयागमध्ये फायर लाईन बांधण्याच्या मोहिमेत त्यांनी भाग घेतला.

Uttarakhand Forest Fire
Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी करा

आगामी मान्सून पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाल्यांची साफसफाई, गाळ काढण्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच नदीकाठावरील सुरक्षा भिंतींचे बांधकाम व दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करावे. सर्व जुन्या पुलांचे सेफ्टी ऑडिट करावे. पावसाळ्यात संवेदनशील भागातील घाट आणि पूलांची स्थिती पाहण्यात यावी. सर्व धरणांची खोली व क्षेत्रफळाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित विभागांची समन्वय समिती स्थापन करावी, अशाही सूचना मुख्यमंत्री धामी यांनी दिल्या आहेत.

एसएमएसद्वारे हवामानाची माहिती मिळाली

दरम्यान मुख्यमंत्री धामी यांनी चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर दौराकरून पाहणी केली. यावरून त्यांनी चारधाम यात्रेदरम्यान लोकांना हवामानासंबंधीच्या सूचना एसएमएसद्वारे मिळाव्यात, असे निर्देश दिले. चारधाम आणि इतर हवामानाशी संबंधित माहितीसह आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी संवेदनशील ठिकाणे आणि चारधाम यात्रा मार्गावर जेसीबीची पुरेशी व्यवस्था ठेवण्यात यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या कर्मचाऱ्यांवर झाली कारवाई

वन निरीक्षक, मनोज उनियाल, (केदारनाथ वन्यजीव विभाग, गोपेश्वर), बद्री सिंग चिलवाल, (नैनिताल विभाग), हरिश सिंग मेहरा, (केदारनाथ वन्यजीव विभाग) आणि प्रल्हाद सिंग गोनिया (सिव्हिल सोयम, अल्मोडा) वन कॉन्स्टेबल रवींद्र सिंग आणि विनय कुमार छिंद्रे (लॅन्सडाउन विभाग), कृपाल गिरी गोस्वामी आणि शंकर सिंग (चंपावत वन विभाग), सुरत सिंग रावत, चालक (उत्तरकाशी वन विभाग), प्रमोद कुमार रातुरी. सहाय्यक (टिहरी वनविभाग)

कारणे दाखवा नोटीस

वन परिक्षेत्र अधिकारी विपिन चंद्र जोशी (लॅन्सडाउन वन विभाग) आणि प्रदीप कुमार गौर (केदारनाथ वन्यजीव विभाग)

संलग्न कारणे दाखवा नोटीस

वन क्षेत्राधिकारी गोपाल दत्त जोशी (अलमोडा वन विभाग), वन कॉन्स्टेबल महेश चंद्र आर्य, निरीक्षक पूरणचंद्र आर्य आणि संदीप सूठा, आणि नरेंद्र सिंग बिश्त (सिव्हिल सोयम अल्मोरा).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com