Climate Change : तापमानवाढीचा ‘ट्रेलर’

Weather Update : तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचा आग्रह जगभरातील शास्त्रज्ञ करीत आहेत. परंतु बहुतांश देशांकडून याबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने ‘सी-३ एस’ने खेद व्यक्त केला आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

Climate Change : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वादळी पावसाचा कहर सुरू आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. उष्णतेच्या या कहराने हंगामी पिके, भाजीपाला होरपळून निघत आहे. संत्रा, मोसंबी, आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब आदी फळबागा करपून जात आहेत.

‘या आठवड्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने शिवारातील पाच ते सहा शेतकऱ्यांना बागा काढून टाकाव्या लागल्या,’ ही प्रतिक्रिया आहे जालना जिल्ह्यातील उमेश वाघ या शेतकऱ्यांची! असेच काहीसे चित्र राज्यभर पाहावयास मिळतेय. जनावरांना चारा-पाणी नाही, वाढत्या उष्णतामानाने कुक्कुट पक्षी जगविणे मुश्कील झाले आहे.

१७४ वर्षांच्या इतिहासात २०२३ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरले. या वर्षीचा एप्रिल महिना हा आतापर्यंतचा सर्वांत उष्ण असल्याचे युरोपीय समुदायाच्या कोपर्निकस पर्यावरण बदल सेवा (सी-३ एस) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. यंदाच्या वर्षी भारतासह जगभरातील सरासरी कमाल तापमानामध्ये १.५ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.

राज्याचा विचार करता गेल्या वर्षी सरासरी कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस होते. यंदाच्या वर्षी हे सरासरी तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअसवर गेले आहे. जेव्हा जागतिक सरासरी तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा पिकांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटते, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आता येतोय. त्यामुळेच तापमानवाढीची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसतशी भुकेची चिंता वाढत जाणार आहे.

Climate Change
Global Warming : एकत्र या; अन्यथा विनाश अटळ

तापमान वाढीमुळे पृथ्वी, समुद्र, व बर्फाच्छादित प्रदेश यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम वादळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, अनिश्‍चित पाऊसमान, वादळी वारे, उष्णलहर, गारपीट, शीतलहर, पावसाचे खंड, मातीची धूप व दुष्काळाने वाळवंट पसरत जात आहे. हवेच्या तापमानापेक्षा जमिनीचे तापमान नेहमीच अधिक राहत असल्याने जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होऊन सुपीकता कमी होते.

पाणीसाठे दूषित होतात. कीड-रोगांची तीव्रता वाढते. पिकांच्या चयापचय क्रियेत बदल होऊन उत्पादन घटते. त्याही पुढील बाब म्हणजे तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यावर वनस्पती आपले कार्य पूर्णपणे थांबवतील, मानवी आरोग्याच्या देखील अनेक नव्या समस्या उद्‍भवतील, असे यातील जाणकार सांगत आहेत.

Climate Change
Global Warming : २०२३ आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष

हे सर्व मानव-निसर्ग-पर्यावरणाची घडी विस्कटून टाकणारे आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे हा तापमानवाढीचा ट्रेलर असल्याचे बोलले जात असताना पूर्ण पिक्चर किती भयानक असेल, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. हवामानातील अतितीव्र बदल टाळण्यासाठी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचा आग्रह शास्त्रज्ञ करीत आहेत.

परंतु बहुतांश देशांकडून याबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने ‘सी-३ एस’ने खेद व्यक्त केला आहे. जागतिक तापमानवाढ कमी करायची असेल तर कर्ब उत्सर्जन शून्यावर आणावे लागेल. त्याकरिता जीवाश्म इंधनाऐवजी जैव इंधनावर भर द्यावा लागेल. अक्षय ऊर्जास्रोतांचा वापरही वाढवावा लागेल.

भारताने याबाबत पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्ष कामाची गती वाढवावी लागेल. अनियंत्रित वृक्षतोड थांबवून शक्य तिथे झाडे लावावी लागतील. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वनक्षेत्रात दुपटीने वाढ करावी लागेल. हवामान बदलास अनुकूल शेतीचा अवलंब करावा लागेल. हवामान अनुकूल शेतीचे शाश्‍वत मॉडेल उपलब्ध नसले तरी जगभर त्यावर संशोधन सुरू आहे.

हवामान बदलास पूरक पिकांच्या जाती विकसित कराव्या लागतील. अनेक पिकांत बीबीएफ लागवड तंत्र वापरूनही नैसर्गिक आपत्तीत नुकसान कमी करता येते. अन्नद्रव्य आणि पाणी याचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. संरक्षित आणि काटेकोर शेती हे चांगले पर्याय पुढे येत आहेत. त्यांचा अवलंब वाढवावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com