Bamboo Production : हवामान बदलात बांबू उत्पादनाचे महत्त्व वाढले

Bamboo Farming : ‘हवामान बदल आणि आव्हान, बांबू आधारित उपाययोजना, अंमलबजावणी आणि शाश्‍वत विकास’ या भोवती परिषद केंद्रित असणार आहे.
Bamboo Processing
Bamboo ProcessingAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी बांबू पिकावर आधारित उपाय, संधींचा शोध घेणाऱ्या ‘पर्यावरणीय शाश्‍वतता शिखर परिषदे’चे उद्या (ता. ९) येथे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्‍वत भविष्यासाठी बांबूच्या क्षमतेचा वापर’ हा या परिषदेचा मुख्य विषय असणार आहे.

‘हवामान बदल आणि आव्हान, बांबू आधारित उपाययोजना, अंमलबजावणी आणि शाश्‍वत विकास’ या भोवती परिषद केंद्रित असणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या परिषदेचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि फिनिक्स फाउंडेशन संस्था (लातूर) आयोजक आहेत.

परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादीर गोदरेज, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे प्रमुख उपस्थित आहेत.

Bamboo Processing
Bamboo Farming : सरकार बांबू लागवडीसाठी देतयं अनुदान!

पाच सत्रात होणाऱ्या या परिषदेत दुसऱ्या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, तिसऱ्या सत्रास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चौथ्या सत्रास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थित आहेत.

परिषदेत केंद्रीय कृषी सचिव मनोज अहुजा, आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संघाचे महासंचालक डॉ. अजय माथुर, ‘टेरी’च्या महासंचालक डॉ. विभा धवन, हेमेंद्र कोठारी, ‘नेरी’चे संचालक डॉ. अतुल वैद्य, ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार, केंद्रीय वन संशोधन संस्था (डेहराडून) येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अजय ठाकूर, समर्थ अभियानाचे संचालक सतीश उपाध्याय, केंद्रीय बांबू अभियानचे संचालक प्रभात कुमार आदी मान्यवर हे प्रमुख उपस्थित, व्यक्ते, पॅनलिस्ट असणार आहेत.

परिषद यशस्वितेसाठी ‘राज्य पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, कोकण बांबू विकास केंद्राचे संचालक संजीव करपे, राज्य पर्यावरण कृतिदलाचे संचालक अभिजित घोरपडे आदी प्रयत्नशील आहेत.

शाश्‍वत धोरणाची पायाभरणी

हवामान बदलामुळे पर्यावरणाचे होणार नुकसान कमी करण्यात बांबू पिकाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या परिषदेत अल्प आणि दीर्घकालीन कृती कार्यक्रम असलेल्या दिशादर्शक शाश्‍वत धोरणाची पायाभरणी करण्यात येणार आहे. परिषदेस केंद्र-राज्य शासन, पर्यावरण, बांबू, शेती, व्यापार, उद्योग, विद्यापीठांतील तज्ज्ञ, धोरणकर्ते संबोधित करणार आहेत.

Bamboo Processing
Bamboo Cultivation : गट शेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करा

‘बांबूचे औद्योगिक धोरण येणार’

राज्य सरकारने बांबू लागवडीस प्रोत्साहन दिले आहे. याकरिता रोजगार हमी योजनेतून बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांस ७ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. राज्यांत बांबू लागवड वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात बायोमासचा तुटवडा सध्या भेडसावत आहे.

यात वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाला बांबू हाच प्रमुख पर्याय म्हणून समोर येत आहे. याशिवाय राज्य सरकार बांबूचे औद्योगिक धोरणाच्या दृष्टीने काम करत आहेत. देशात असे धोरण नाही, त्यामुळे देशाला दिशादर्शक असे काम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून होणार असल्याची माहिती, पाशा पटेल यांनी दिली.

‘‘कार्बन उत्सर्जन, वाढते तापमान यामुळे आपल्या पृथ्वीवरील जीवनमान संकटात सापडत आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष ॲन्टोनिओ गुटरेस यांनी नुकताच ‘तापमान वाढीचे युग संपले, होरपळीचे युगामध्ये प्रवेश झाला आहे’ असा वाढत्या पर्यावरणीय संकटामुळे मानव जातीस निर्माण झालेल्या संकटांबाबत निर्वाणीचा इशारा दिला आहे. पर्यावरण संरक्षणाकरिता बांबू लागवड हे यातील सर्वात शाश्‍वत भविष्याकरिता अत्यंत बहुमोल पर्याय आहे. भारतात बांबू आणि प्रक्रिया उत्पादनास मोठी संधी आणि भविष्य आहे. याचे महत्त्व सर्वपातळींवर अधोरेखित करण्याकरिता शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.’’
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com