
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Water Conservation : तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) या गावात एकूण भौगोलिक क्षेत्र २५१४ हेक्टरपैकी ८५७ हेक्टर (३४ टक्के) क्षेत्रावर मातीची खोली १० सें.मी. पेक्षा जास्त आहे. या जमिनीचे वर्गीकरण ‘डी१’ या प्रकारात केले जाते. अशी माती अत्यंत कमी उत्पादक किंवा कोणत्याही पिकासाठी उपयुक्त नसते. कारण या जमिनीमध्ये ओलावा टिकत नाही. ओलाव्याच्या अभावामुळे नैसर्गिक कार्बन चक्र फार कमी प्रमाणामध्ये स्थिर होते.
अशा मातीला ‘अतिउथळ’ म्हटले तरी हरकत नाही. हे संपूर्ण क्षेत्र सर्व साधारणपणे गावाच्या दक्षिणोत्तर डोंगररांगेच्या पायथ्याचे आहे. तडसरमध्ये ४०२ हेक्टर क्षेत्र (एकूण क्षेत्राच्या १६टक्के) हे उथळ मातीचे आहे. ज्या क्षेत्रावर मातीचा थर हा १० सें.मी. ते २५ सें.मी. या दरम्यान असतो. तिला ‘डी२’ संकेताकाने निर्देशित केले जाते. तडसरमध्ये या क्षेत्राचा वापर सर्वसाधारण माळरान म्हणून जनावरे चारण्यासाठी केला जात आहे.
तडसरमध्ये सर्वसाधारणपणे २५ ते ५० सें.मी. इतक्या मातीच्या जाडीचा थर असलेले क्षेत्र ४५० हेक्टर (१८ टक्के) आढळते. त्यास ‘डी३’ मध्ये टाकतात. या जमिनी काहीशा उत्पादक असून, त्यात सध्या ऊस, हळद, आले, फळभाज्या इ. पिके घेतली जातात. गावामध्ये ५० ते १०० सें.मी. मातीचा थर असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र ५२९ हेक्टर (एकूण क्षेत्रफळाच्या २१ टक्के) उत्पादनक्षम आहे. मातीच्या खोलीच्या या वर्गवारीस ‘डी४’ असा संकेतांक दिला जातो. गावाच्या पूर्वेकडील व काही पश्चिमेकडे असणाऱ्या क्षेत्रामधील जमिनीचा समावेश या वर्गवारी मध्ये होतो.
या जमिनीमध्ये सध्या ऊस हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. गावांतील केवळ २४२ हेक्टर क्षेत्रावरील ( १० टक्के) मातीचा थर हा १०० सें.मी. पेक्षा जास्त आहे. या जमिनी अतिउत्पादक म्हणून वर्गीकृत केल्या जातात. त्यास ‘डी५’ असा संकेतांक दिला जातो. सर्वसाधारणपणे हे क्षेत्र वर्ग दोनच्या क्षमता वर्गीकरणांमध्ये समावेश होतो.
या जमिनी वर्षभर वेगवेगळ्या पिकांसाठी वापरल्या जाऊ शकतात. महाराष्ट्रातील माणदेश हा प्रदेश ( माणगंगा नदी खोरे ) मातीच्या उपलब्धतेसाठी संपन्न आहे, मात्र येथे नैसर्गिकरीत्या कमी पाऊस पडतो. उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये मातीची उपलब्धता कमी अधिक प्रमाणामध्ये तडसर या गावासारखीच आहे. त्यामुळेच राज्यातील कृषी उत्पादकता ही कमी राहून सरासरीही गाठत नाही. (शेजारी तक्ता क्र. १ पहा.)
वरील नकाशामध्ये तडसर मातीची खोली दिलेली आहे. त्यात कमी खोलीच्या माती थराचे क्षेत्र फिकट गुलाबी रंगात, मध्यम माती थरास पिवळ्या रंगात दर्शवले आहे. तर गावठाणाशेजारी मातीची चांगली खोली असल्याचे गडद गुलाबी व गडद तांबडा रंग दर्शवितो. या नकाशावरून आपणास गावातील मातीच्या उपलब्धतेबाबत अंदाज येतो. या माहितीचा वापर करून पीक नियोजन करता येते. याशिवाय या मातीची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक पाणलोट क्षेत्र उपचार इतर अभियांत्रिकी उपचार ठरविता येतात.
तडसर मधील मातीची संरचना
तडसर या गावांमध्ये ८५२ हेक्टर क्षेत्रावर (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३४ टक्के) खोल काळी जमीन, मध्यम काळी जमीन, चिकन माती (पोयटा) या प्रकारच्या माती अधिक स्वरूपात उपलब्ध आहे. या खालोखाल ५२९ हेक्टर क्षेत्रावर (२१ टक्के) चिकणमाती / मध्यम काळी माती / लाल माती / उथळ माती उपलब्ध आहेत. काळी माती / मध्यम काळी माती ४०२ हेक्टर क्षेत्रावर (१६ टक्के) उपलब्ध आहेत. उर्वरित जवळपास ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरती मिश्र स्वरूपाची माती उपलब्ध आहे. एकूणच गावातील सरासरी ३५ ते ४० टक्के शेत जमिनीवर उत्पादक अशा स्वरूपाचा मातीचा थर अस्तित्वात आहे. (तक्ता क्र. दोन) अशाच प्रकारे त्याचेही नकाशा उपलब्ध होतो. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील जमिनीची खोली व तिच्या संरचनेचे विश्लेषण केल्यास मातीची उत्पादकता व व्यवस्थापन यांचा कृतिशील आराखडा तयार करता येतो.
अशा प्रकारची माहिती उपलब्ध झाली तरी वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीचे किमान प्रातिनिधिक तरी नमुने घ्यावेत. त्यांचे प्रयोगशाळेतून शास्त्रीय विश्लेषण करून घ्यावे. एखाद्या मृदा शास्त्रज्ञांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसोबत मातीमध्ये उपलब्ध असणारी मूलद्रव्ये, त्यांच्या अधिकता किंवा कमतरतांबाबत चर्चा व मार्गदर्शन घडवून आणावे. गावांतील सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतर शिवारनिहाय उपलब्ध असणारी माती व त्या ठिकाणचे पीक संरचना याबाबत कृषी तज्ज्ञांकडून किंवा कृषी विभागाकडून सल्ला कोणते पीक चांगल्या प्रकारे घेता या विषयी मार्गदर्शन घ्यावे.
त्यानुसार पीक पद्धतींचा अवलंब करावा. कमी उत्पादकतेमुळे होणारे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येते. उदा. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात ५ ते २० सें.मी. उथळ स्वरूपाची माती असताना त्यात मध्यम जमीन आवश्यकता असणारे गहू पीक घेता येणार नाही. जर तरीही एखाद्या शेतकऱ्याला रब्बीमध्ये गहू पीक घ्यावयाचेच आहे, तर त्याच्याकडे पेरणीपासून काढणीपर्यंत सरासरी १० ते ११ पाणी पाळ्या देण्याएवढे पाणी उपलब्ध आहे का, याचा विचार करावा.
जर तेवढे पाणी पुरणार नसेल, तर एकतर क्षेत्र कमी करावे किंवा पीक घेणे टाळावे. हेच गहू पीक भारी काळ्या जमिनीमध्ये चार ते पाच आवर्तनामध्ये चांगले येते. याशिवाय उथळ स्वरूपाच्या जमिनीमध्ये गव्हाचे उत्पादनही खूप कमी येते. म्हणजेच एखाद्या पिकाचा अशास्त्रीय पद्धतीने आग्रह धरल्यास आपण गावातील व शेतकऱ्यांच्या स्वतःकडे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय करत आहोत. त्यात वरवर शेतकऱ्याचा मोठा आर्थिक तोटा दिसत असला तरी अंतिमतः गावाला होणारा तोटा मोठा असतो. अशा जमिनीमध्ये पीक संरचना महत्त्वाची ठरते.
तडसर या गावामध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये ओघळीवरचे उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र क्षेत्र उपचारांमध्ये उदा. बांधबंधिस्ती, सलग समतल चर अशा उपायासोबत जैविक उपायांची गरज भासत आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावातील माहितीचे संकलन केल्यानंतर जमिनीची पीकक्षमता वृद्धी करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन करणे हितावह ठरणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.), - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.