Lok Sabha Elections 2024 : राज्यात मतदानाचा जोर वाढला; हातकणंगलेमध्ये राडा, इंदापुरात आमदाराची कार्यकर्त्याला शिवीगाळ, धाराशिवमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

Hatkanangale Lok Sabha constituency : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या ११ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान हातकणंगले, बारामती आणि धाराशिवमध्ये विविध घटनांमुळे मतदानावर परिणाम झाला आहे.
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या ११ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर मतदार संघात झाले असून येथे ३८.४२ टक्के मतदान झाले आहे. यापाठोपाठ हातकणंगले मतदार संघात ३६.१७ टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात हाणामारी, दमदाटी आणि हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह बारामतीमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. तर धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चाकू हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती साम टिव्हीच्या वृत्तातून समोर येत आहे.

मतदान केंद्रावर राडा

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर आणि अपक्ष उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी रिंगणात उतरले आहेत. सध्या येथे चुरस पाहायला मिळत असतानाच वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर राडा झाला. येथे माने आणि सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याने मतदान थांबवण्यात आले होते. हा प्रकार साखराळे गावात बुथ क्रंमाक ६२ आणि ६३ वर घडला असून पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला आहे. यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले आहे.

Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत नेत्यांसह उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

रांगेत वृद्धाचा मृत्यू

यादरम्यान मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या एका ६९ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर घडली. महादेव श्रीपती सुतार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन खाली पडले. यावेळी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी त्यांनी येथील सीपीआर दवाखान्यात हलवले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बारामतीत आदमाराची शिवीगाळ

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापुरचे आमदार दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी भरणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

दत्ता भरणेंविरोधात तक्रार

रोहित पवार यांनी, मतदानाच्या दिवशी माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार लोकांवर अशा पद्धतीने शिवीगाळ करत असून दमदाटी करत असल्याचे म्हटले आहे. तर सुळे यांनी, राज्यात सध्या आदृश्य शक्तिच्या माध्यमातून गलीच्छ राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच सुळेंनी निवडणूक आयोगाकडे व्हॉट्सअप आणि ई-मेलद्वारे मेलवरुन तक्रार दाखल केली आहे.

भरणेंचे स्पष्टीकरण

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भरणेंनी, ‘मी शिवी दिली नाही, ग्रामीण भाषेत बोललो, तो कार्यकर्ता पैसे वाटत होता. यावरून कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरू झालं होतं. मी त्याला बाहेर काढलं आणि त्याला तेथून जायला सांगितलं, असे स्पष्टीकरण भरणे यांनी दिलं आहे.

धाराशिवमध्ये कार्यकर्त्यावर चाकू हल्ला

राज्यात लोकसभा मतदानाच्या दिवशीच धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर थेट चाकू हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून ही घटना पाठसावंगी येथील गावात घडली आहे. तर समाधान नानासाहेब पाटील असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com