Ornamental Fish Business : स्वयंरोजगारासाठी शोभिवंत मत्स्यपालन

Aquarium Business : शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये युवक, महिला, बचत गट व मत्स्यप्रेमींच्या स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध आहेत. ॲक्वेरियम बांधणीसह देखभाल, सोशल मीडिया पोस्ट आणि ग्राहक सेवा यांचा वापर केल्यास हा व्यवसाय सातत्याने वाढता राहतो.
Ornamental Fish
Ornamental FishAgrowon
Published on
Updated on

अमिता जैन

शोभिवंत मत्स्यपालन हा एक कमी गुंतवणुकीतून अधिक नफा देणारा, मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त असा व्यवसाय आहे. युवक आणि महिलांसाठी शोभिवंत मत्स्यपालन हा अत्यंत किफायतशीर स्वयंरोजगाराचे साधन आहे. छोट्या टाक्यांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येते.

या व्यवसायासाठी कमी आर्थिक भांडवल लागते. तसेच शोभिवंत मत्स्यपालन अत्यंत कमी पाण्याचा वापर करून किंवा पाणी पुनर्वापर करुन देखील करता येते. शोभिवंत माशांची किंमत सामान्य खाण्यायोग्य माशांपेक्षा अधिक असते, ज्यामुळे व्यावसायिकाला जास्त नफा मिळतो.

शोभिवंत मत्स्य प्रजनन

शोभिवंत मत्स्यपालनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रजनन व पिलांचे संगोपन. कारण यावर व्यवसायाचा दर्जा, नफा अवलंबून असतो. शोभिवंत माशांचे प्रजनन म्हणजे रंगीबेरंगी, आकर्षक माशांची योग्य पद्धतीने पैदास करून बाजारासाठी दर्जेदार मासे उत्पादन करणे. शहरीकरण आणि अत्याधुनिक गृह सजावटीत मत्स्यालयांना महत्त्व आहे. त्यामुळे निरोगी व रंगीबेरंगी शोभिवंत माशांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

शोभिवंत माशांची निवड

गप्पी, मॉली, स्वॉर्डटेल, गोल्डफिश, कोई कार्प, टेट्रा, बार्ब्स अशा प्रजाती प्रजननासाठी सोप्या आणि बाजारात सतत मागणी असलेल्या आहेत. या प्रजाती कमी देखभालीत वाढू शकतात. त्यांच्या रंगांच्या विविधतेमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.

प्रजननासाठी निरोगी, सक्रिय व रंगीबेरंगी नर-मादी निवडावी. प्रजननाच्या आधी काही दिवस चांगला आहार देऊन माशांचे पोषण करावे. प्रजननासाठी पाण्याचे तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस, सामू ६.५ ते ७.५ दरम्यान ठेवावा. टाकीत ऑक्सिजनची उपलब्धता व स्वच्छता राखण्यासाठी यंत्रणा बसवावी.

लाइव्ह बेअरर प्रजातीचे मासे (गप्पी, मॉली, स्वॉर्डटेल) थेट पिल्लांना जन्म देतात, त्यामुळे नर-मादी एकत्र टाकीत सोडून पिले झाल्यावर लगेच वेगळ्या टाकीत काढून संगोपन करावे, कारण मोठे मासे पिलांना खातात.

Ornamental Fish
Fish Conservation : शोभिवंत मत्स्यपालनात तयार झाली ओळख

गोल्डफिश, कोईसारख्या प्रजातींमध्ये अंड्यातून पिले बाहेर पडतात. मॉप वापरून अंडी गोळा करून वेगळ्या टाकीत ठेवावीत. येथे ३ ते ७ दिवसांनी पिले बाहेर पडतात. पिल्ले साधारण १ ते २ महिन्यांत विक्रीस तयार होतात. निरोगी रंगीबेरंगी पिलांना बाजारात चांगली मागणी असते. स्थानिक मत्स्यालय, हौशी ग्राहक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटल्समध्ये सजावटीसाठी या माशांचे विक्री होते.

खाद्यजीव निर्मिती

शोभिवंत मत्स्य प्रजनन आणि पिलांच्या संगोपनात खाद्यजीवांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, कारण पिलांच्या वेगवान वाढीसाठी, रोगप्रतिकारक्षमतेसाठी सूक्ष्म व नैसर्गिक आहार देणे आवश्यक असते.

पाण्यातील नैसर्गिक अन्न साखळीतील सूक्ष्म जीव म्हणजे खाद्यजीव. हे खाद्यजीव पचनास सोपे, पौष्टिक व प्रथिनयुक्त असतात. डाफ्निया, आर्टेमिया, इन्फ्युसोरिया, मोयना, मायक्रोवर्म्स, कल्चर शेवाळ हे मुख्य खाद्यजीव आहेत, जे घरच्या घरी कमी खर्चात तयार करता येतात.

माशांसाठी व्यावसायिक पद्धतीने खाद्यजीव निर्मिती म्हणजे मोठ्या प्रमाणावर डाफ्निया, आर्टेमिया, मोइना, इन्फ्युसोरिया इत्यादींचे उत्पादन करून मत्स्यपालकांना विक्री करणे. यासाठी प्लॅस्टिक टँक, वातन यंत्रणा, पाणी फिल्टर, पाणी तपासणी किट आणि नैसर्गिक खाद्य स्रोत (पालकाची पाने, यीस्ट, ब्रॅन) लागतो.

डाफ्निया व मोइना तयार करण्यासाठी टँकमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात सडलेली पालक पाने, यीस्ट मिसळून ठेवावे तसेच

स्टार्टर कल्चर सोडावे. ७ ते १० दिवसांत खाद्यजीवांची संख्या वाढते, ती चाळणीने काढून स्वच्छ पाण्याने धुऊन विक्रीस ठेवता येते.

आर्टेमिया हॅचरीसाठी खारट पाणी तयार करून त्यात यीस्ट सोडल्यास २४ ते ४८ तासांत नवजात आर्टेमिया मिळते, जे ताजे विकता येते. स्थानिक मत्स्यपालक, मत्स्यालय व हौशी ग्राहकांकडे हे खाद्यजीव प्रति लिटर दराने विकून नियमित उत्पन्न मिळवता येते.

Ornamental Fish
Fish Species : किली : शोभिवंत माशाची प्रजात

जलीय वनस्पतींचे संगोपन

मत्स्यालय सजावटीमध्ये जलीय वनस्पतींचे महत्त्व खूप मोठे आहे. या वनस्पती पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतात, पाण्यातील नत्रयुक्त पदार्थ शोषून पाण्याची गुणवत्ता टिकवतात. माशांसाठी नैसर्गिक आश्रय देतात. यामुळे पिलांचे संरक्षण होते, नैसर्गिक खाद्य साखळी तयार होते. मत्स्यालय अधिक आकर्षक दिसते.

मत्स्यालय, ऑफिस, हॉटेल, घरातील सजावट तसेच जलतळ सजावटीसाठी जलीय वनस्पतींची मोठी मागणी आहे. जलीय वनस्पतींच्या हायग्रोफिला, कबोंबा, हॉर्नवॉर्ट, अ‍ॅन्यूबियास, वालिसनेरिया, अ‍ॅल्गी बॉल या प्रजाती सहज वाढतात. विक्रीस योग्य असतात.

वनस्पतींच्या संगोपनासाठी प्लॅस्टिक ट्रे, सिमेंट टाक्या किंवा मोठे काचेचे टँक यांचा उपयोग करावा. पाण्यात प्रकाश पोहोचण्यासाठी टाक्या उघड्या ठेवाव्यात किंवा एलईडी ग्रो लाइट लावावा. पाण्याचा सामू ६.५ ते ७.५ आणि तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस ठेवावे. वनस्पतींच्या वाढीसाठी नैसर्गिक खत म्हणजेच गोमूत्र अर्क, कंपोस्ट पाण्यात मिसळून द्यावे. कार्बन डायऑक्साइड बबलरचा मर्यादित वापर करावा.

वनस्पतींची काढणी करताना मुळे तुटू न देता अलगद उचलून, स्वच्छ पाण्यात धुऊन, गट बांधून विक्री केली जाते. बाजारात ताज्या, निरोगी व शेवाळ मुक्त वनस्पतींना नेहमी चांगला दर मिळतो.

टिश्यू कल्चर पद्धतीने जलीय वनस्पतींचे उत्पादन करणे हा आधुनिक, स्वच्छ, रोगमुक्त व दर्जेदार उत्पादनाचा मार्ग आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने तयार झालेल्या वनस्पती लहान आकारात असतात. मत्स्यालयात लावल्यावर वनस्पती जलद वाढतात. या व्यवसायासाठी सुरुवातीला प्रशिक्षण घेणे आवश्यक असते, परंतु एकदा पद्धत अवगत झाल्यावर महिला, युवकांसाठी पूरक स्वयंरोजगाराचा उत्तम मार्ग ठरू शकतो.

ॲक्वेरियम बांधणी, मत्स्यालय

ॲक्वेरियम बांधणी हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि सातत्याने उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. घर, ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल व शाळांमध्ये मत्स्यालय ठेवण्याची आवड दिवसेंदिवस वाढत आहे. सजावटीसाठी ॲक्वेरियमची मोठी मागणी आहे.

योग्य आकाराचे, आकर्षक डिझाईन असलेले, शोभिवंत मासे व जलीय वनस्पती असलेले ॲक्वेरियम तयार करून देणे, घरी नेऊन बसवणे आणि दरमहा/तिमाही देखभाल करणे या व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळते.

ग्राहकाकडील जागेच्या उपलब्धतेनुसार ॲक्वेरियमचे आकार व सजावट सल्ला देऊन ते पूर्णपणे तयार करून देता येते. त्यानंतर मासे, वनस्पती, खाद्य पुरवठा व पाण्याची देखभाल सेवा देऊन नियमित फी आकारता येते. मत्स्यालय सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती व मासे विकून अतिरिक्त नफा मिळवता येतो.

- अमिता जैन, ९९११७५१५९३

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com