Chicken Feed : कोंबड्यांसाठी खाद्य निर्मितीचे तंत्र

Poultry Farming : कोंबडीच्या वयानुसार आणि त्यांच्या प्रकारानुसार खाद्यात फरक असतो. सुरवातीला प्रथिनांची गरज जास्त असते आणि ऊर्जा कमी लागते. ब्रॉयलर, लेअर आणि गावरान कोंबड्यांच्या खाद्यात सुद्धा फरक असतो. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कोंबडी खाद्याची निर्मिती करावी.
Poultry Farming
Poultry Farming Agrowon

डॉ. परिमल परसावर, डॉ. दर्शना भैसारे, डॉ. बलराम चौहान

Chicken Feed Manufacturing Techniques : कोंबडीपालनात मुख्य खर्चापैकी खाद्य नियोजन हे सर्वात महत्त्वाचे आहे. पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळाले तर कोंबडीची वाढ उत्तम राहते, स्वास्थ्य योग्य राहते, प्रतिकारक्षमता चांगली राहते. वजनदार अंडी मिळतात. खाद्य तयार करणे ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्य (जसे ऊर्जा प्रदान करणारी खाद्य, प्रथिने प्रदान करणारी खाद्य, इत्यादी) एका विशिष्ट प्रमाणात (कोंबडीच्या वयानुसार किंवा प्रकारानुसार) मिसळली जातात. यामुळे कोंबड्यांना संतुलित आहार मिळतो.

ऊर्जा तयार करणारे घटक

ऊर्जेसाठी कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचा उपयोग केला जातो.

कर्बोदके

मका, ज्वारी, गहू, तुटलेला तांदूळ, तांदळाची भुशी, गव्हाची भुशी यामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असतात. बहुतेक ठिकाणी मका वापरला जातो कारण त्यात ऊर्जेचे प्रमाण खूप अधिक (३००० ते ३३०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) असते, कोंबड्यांसाठी रुचकर असते. त्यात ‘कॅरोटीन’ रंगद्रव्य असते, जे अंड्याच्या बलकास पिवळा रंग देतो. मका कोरडा आणि बुरशी मुक्त असला पाहिजे.

तुटलेला तांदूळ हा कमी भावात मिळतो जे आपण खाद्यात वापरू शकतो. ऊर्जेसाठी कमीत कमी दोन ते तीन घटक वापरावे.

Poultry Farming
Poultry Farming : उच्चशिक्षित कुटुंबाचे यशस्वी कुक्कुटपालन

स्निग्ध पदार्थ

कोंबडी ही खूप जलद गतीने वाढते. त्यांना लागणारी ऊर्जा वेगवेगळ्या खाद्य घटक, धान्यातून पुरेशी मिळत नाही. अशा वेळेस स्निग्ध पदार्थांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थ जसे की, प्राणी चरबी, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल व सर्व प्रकारचे खाद्य तेल यांचा खाद्यात वापर केला जातो.

स्निग्ध पदार्थ कोंबडी खाद्यात सुमारे ४ टक्यांपर्यंत मिसळले जातात. स्निग्ध पदार्थांमध्ये जीवनसत्त्व ए, डी, ई, आणि के

हे चांगल्या प्रमाणात असते. खाद्याला चव येते.

प्रथिने पुरवठा करणारे घटक

शरीर, पेशींच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी, शरीरात एंझाईम आणि हॉर्मोन्स तयार होण्यासाठी, रक्तात वेगवेगळ्या क्रियांसाठी प्रथिनांची गरज असते.

सोयाबीन डीओसी, तेल विरहित शेंगदाणा ढेप, सरकी ढेपेमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक (१८ टक्यांपेक्षा जास्त) असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते बारा टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये तीस ते चाळीस टक्के प्रथिने असतात. खाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा. बहुतेक ठिकाणे सोयाबीन डीओसी वापरला जाते. कारण ते बाजारात सहज आणि कमी दरात उपलब्ध असते. सोयाबीनमध्ये ४५ ते ४९ टक्के प्रोटीन असते. खाद्य तयार करताना थेट सोयाबीन वापरू नयेत. कारण त्यात काही विषारी पदार्थ असतात. आपण सोयाबीन डीओसी(तेलविरहित सोयाबीन पेंड) हे खाद्यात मुख्यत: वापरतो. सोयाबीन दाणे भाजून घेतल्यावर त्यातून तेल काढून घेतल्यानंतर पूर्णपणे बारीक केले जाते.

शेंगदाणा पेंड आपण वापरू शकतो, यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बुरशी लवकर लागते. त्यामुळे शेंगदाणा पेंडीचे प्रमाण कमी ठेवावे.

मासळीची भुकटी, मीट मील, ब्लड मिल यांचा वापर करू शकतो. यांच्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय चांगले असते. मासळीची भुकटी जेव्हा तयार केली जाते तेव्हा त्यात मीठ मिसळतात. हे प्रमाण तपासणे आवश्यक आहे.

खनिज पुरवठा करणारे घटक

अन्नपचनासाठी खनिजांची आवश्यकता असते. आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते. तुलनेने मोठ्या प्रमाणात काही खनिजे आवश्यक असतात, जसे की कॅल्शिअम, फॉस्फरस आणि सोडियम.

सर्वसाधारण कोंबड्यांच्या आहारात १ ते १.५ टक्का कॅल्शिअम आणि ०.५ टक्का फॉस्फरस लागते. सामान्य वाढ आणि हाडाच्या विकासासाठी कॅल्शिअम आणि फॉस्फरस आवश्यक असतात. अंड्याचे मजबूत कवच तयार करण्यासाठी कॅल्शिअमची आवश्यकता असते. चुनखडी, मीठ, सोडा, शेल ग्रीट, हाडांचा चुरा यामध्ये खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

Poultry Farming
Chicken Disease : कोंबड्यांमधील कोलीसेप्टीसेमिया

जीवनसत्त्व पुरवठा करणारे घटक

जीवनसत्त्व ए, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स कोंबड्यांच्या आहारात असणे गरजेचे असते. जीवनसत्त्वे ही दोन प्रकारची असतात. काही तेलामध्ये विरघळणारे असतात जसे की जीवनसत्त्व अ, ड आणि के आणि काही तेलामध्ये न विरघळणारे असतात जसे की जीवनसत्त्व ब आणि क.

जीवनसत्त्व ड हे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणास मदत करते. जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते, शरीर कार्यक्षम व तजेलदार राहते.

जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे कोंबड्यांना भिन्न प्रकारचे आजार होतात. जीवनसत्त्व बी२, बी ६ आणि बी१२ यांच्या कमतरतेमुळे पायांचे विकार होतात.

बाजारात अनेक व्यावसायिक खनिज व जीवनसत्त्व मिश्रणे उपलब्ध आहेत. जर अशी मिश्रणे वापरली गेली, तर खाद्यामध्ये स्वतंत्रपणे खनिजे किंवा जीवनसत्त्वे मिसळण्याची गरज नाही. जरी जीवनसत्त्व प्रीमिक्स आहाराच्या केवळ ०.०५ टक्का प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांचा कोंबड्यांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रभाव पडतो.

खाद्यामध्ये मिसळण्याचे इतर घटक

माइकोटोक्सिन बाइंडर : खाद्यातील विषारी पदार्थांपासून वाचविते.

एसीडीफायर : कोंबड्यांच्या वाढीस मदत करतात, खाद्यातील हानिकारक पदार्थांची वाढ थांबवितात आणि पोषक तत्त्वांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतात. खाद्याची पचन शक्ती वाढवितात.

लिव्हर टॉनिक : शरीरातील हानिकारक पदार्थांना चांगल्या प्रकारे बाहेर काढण्यास मदत करते.हे हर्बल आणि सिंथेटिक (कृत्रिम) दोन्ही प्रकारांत बाजारात उपलब्ध असतात.

एंटीकोक्सिडियल्स : एंटीकोक्सीडियल्स खाद्यात मिसळल्याने कॉक्सिडीओसीस सारख्या गंभीर आजारापासून दूर ठेवण्यास मदत होते.

प्रोबायोटिक्स : यातील उपयुक्त जिवाणू आतड्यांच्या आजारावर उपयुक्त असतात. बाजारातून चांगल्या कंपनीचे प्रोबायोटीक्स घ्यावे. उपलब्ध नसल्यास पाण्यामध्ये दही मिसळून द्यावे.

एंटीऑक्सिडंट : खाद्याची गुणवत्ता तयार करते. खाद्याला लवकर खराब होऊ देत नाही.

खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण आणि टक्केवारी

खाद्य ऊर्जेचे प्रमाण (kcal/kg) समावेश टक्केवारी

(टक्के)

मका ३,३५० ६०

ज्वारी ३,२०० ३०-४०

तुटलेला तांदूळ २,९०० ४०

गहू ३,१०० ५०

तांदळाची भुशी २,००० १०-२०

गव्हाची भुशी १,३०० १०-१५

खाद्य घटक वापरण्याचे प्रमाण

आहारात कुठल्याही खाद्याचा एका विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त समावेश करत नाहीत. कारण प्रत्येक खाद्यात काही हानिकारक घटक असतात, त्यांचे प्रमाण वाढले की कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात.

खाद्य प्रथिने टक्केवारी समावेश टक्केवारी

सोयाबीन डीओसी (तेलविरहित सोयाबीन पेंड) ४५-४९ ३५

तेल विरहित शेंगदाणा पेंड ४५-६० १०-३०

सरकी ढेप ३५ १०

तिळाची ढेप ४२ १५

मीट मिल ५५ १०

ब्लड मिल ७५ ५

टीप : सर्व खाद्य बारीक करून सुमारे आठ मिनीट फावड्याने किंवा मिक्सरच्या साह्याने मिश्रण एकजीव करून घ्यावे. या सर्वांचे प्रमाण तज्ज्ञांकडून माहिती करून घ्यावे.

डॉ. दर्शना भैसारे, ८४३९७ ८७६२२, (कुक्कुटपालन शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com