Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

Farmer Protest : मध्यमवर्गीय मित्रांबरोबर शेतकरी आंदोलनावर गप्पा

Farmer Issue : माझ्या मध्यमवर्गीय मित्रांबरोबरच्या कालच्या गप्पांमध्ये अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुरू असणाऱ्या आंदोलनाबद्दल चर्चा झालीच.

Talk about Farmer Agitation : माझ्या मध्यमवर्गीय मित्रांबरोबरच्या कालच्या गप्पांमध्ये अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुरू असणाऱ्या आंदोलनाबद्दल चर्चा झालीच. मागणी पुरवठा, केंद्र सरकारची वित्तीय शिस्त (फिस्कल डिसिप्लिन), एकूण २३ शेतीमालांनाच हमीभाव कशासाठी, इतर शेतीमाल का वगळले इत्यादी अनेक मुद्दे त्यांनी तावातावाने टेबलवर आणले. थोडक्यात शेतकऱ्यांचे लाड करता कामा नयेत, अशीच त्यांची ठाम भूमिका होती.

मग मी त्यांना काही गोष्टी सुनावल्या :

कोट्यवधी रुपयांची कर्जे बुडवून देशातून पळून जाणारे बडे उद्योगपती, आपला उद्योग आजारी पाडून तो ‘एनसीएलटी’कडून दिवाळखोरीत काढून परत तोच उद्योग दुसऱ्यातर्फे बोली लावून स्वस्तात पदरात पाडून घेणारे उद्योगपती आणि त्यांच्या मोठी कॉर्पोरेट्स उतमात करत असतात, त्या वेळी तुम्हाला फिस्कल डिसिप्लिन आठवत नाही?

आपल्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधव अजूनही मातीशी नाळ ठेवून आहेत, त्यांना अजूनही आशा वाटते आहे की अपार कष्ट करून, शेतीतून आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी लागणारे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. या त्यांच्या चिकाटीचा आदर करायला शिका.

Farmer Protest
Delhi Farmers Protest : ‘एमएसपी’साठी कायदेशीर हमी देण्यासाठी अध्यादेशाची मागणी

ज्या दिवशी त्यांच्या मातीशी निगडित स्वप्नांशी असलेली दरवर्षी कमकुवत होत जाणारी नाळ कायमची तुटेल त्या दिवशी ते जवळच्या मोठ्या शहरांचा रस्ता धरणार हे नक्की. त्यांच्या जागी मी असेन तर तेच करीन, आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर मान्य कराल की तुम्ही देखील हेच केले असते.

आपण काही दोन चार शेतकऱ्यांच्या आयुष्याबद्दल उरबडवेपणा करत नाही आहोत; या प्रश्‍नाची व्याप्ती बघा. आभाळ फाटेल.

कल्पना करा, ज्या वेळी लाखो कुटुंबे शहराकडे कायमचे राहण्यासाठी कूच करतील त्या वेळी तुम्ही आता ज्या ज्या शहरात राहत आहात त्या शहरातील नागरी सुविधांवर काय परिणाम होईल? येथील आधीच मोडकळीस आलेल्या सार्वजनिक सुविधा कशा कोलमडून पडतील? घनकचरा, सांडपाणी यांची व्यवस्था न लागल्यामुळे सार्वजनिक आरोग्य कसे धोक्यात येईल? आणि गर्दीमुळे तुम्हाला कसे असुरक्षित वाटू लागेल? या प्रश्‍नांची तीव्रता अशी असेल, की तुमच्या शहराच्या म्युनिसिपालिटीच्या व स्थानिक पोलिसांच्या नेहमीच्या यंत्रणा पुऱ्या पडणार नाहीत हे ध्यानात ठेवा.

ते सारे आपले भारतीय बांधव आहेत हे लक्षात ठेवूया. जसे तुमचे वडील, आजोबा काही वर्षांपूर्वी या शहरात आले तसेच त्यांची आताची पिढी शहरात येऊ पाहणार आहे. एक दोन पिढ्यांचा फरक. फिनॉमिनॉन तोच. त्यामुळे नैतिक, घटनात्मक, कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय अशा कोणत्याच निकषांवर तुम्हाला याला विरोध करता येणार नाही.

तुम्ही राजकीय लोकशाही हवी म्हणत असाल तर तुम्ही आर्थिक लोकशाहीची पाठराखण करा.

Farmer Protest
Farmer's Delhi Chalo Protest : दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

हे मान्य करा की सर्व हालअपेष्टा, कष्ट उद्‍ध्वस्त करणारा निसर्ग सहन करून आपले शेतकरी बांधव अजूनही ग्रामीण भागात राहत आहेत; त्यामुळे तुम्ही सध्यातरी अर्ध्यामुर्ध्या नीटपणे आपापल्या शहरात राहू शकत आहात.

शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्या खोलवरच्या जखमांवरचे फक्त मलमपट्टी आहे; तो शेतीप्रश्‍नावरचा काही दीर्घकालीन उतारा नव्हे. तो निघेल तेव्हा निघेल. आज मलमपट्टी तर मलमपट्टी; किमान यातना तरी कमी होऊ देत.

शहरवासीयांनो, शेती अरिष्टावर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी शेतकरी बांधवाना साथ द्या. मानवतावादी कारणांसाठी नव्हे तर शेती फुलण्यात, शेती किफायतशीर, परवडणारी(Viable) होण्यात तुमचे देखील हित आहे म्हणून.

लक्षात घ्या सार्वजनिक पैशातून लाखो शेतकऱ्यांची शेती Viable झाली, तर तुम्हा शहरवासीयांना देखील अप्रत्यक्ष दिलासा मिळत असतो. भारतातील शेती क्षेत्रातील अरिष्ट तांत्रिकदृष्ट्या बघितले तर ग्रामीण भागातले संकट आहे; पण त्यावर उपाययोजना केली नाही तर ते शहरांवर देखील येऊन आदळणार!

शहरातील मध्यमवर्गीयांनो, आभार माना आपल्या शेतकरी बांधवांचे की ते अजून तरी हिंसक होऊन शहरांवर चाल करून आलेले नाहीत.

माझ्या या बोलण्यामुळे मित्रांची कॉफी आणि बियर अजून कडवट झाली, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com