उपोषण, धरणे आणि मोर्च्यांतील बदल

गेल्या १०० वर्षांत उपोषण, धरणे आणि मोर्चे यांच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. याचा वापर मुख्यतः कोणत्या तरी मागणीसाठी किंवा एखादी गोष्ट करू नये यासाठी होतो.
Protest
Protest Agrowon

गेल्या १०० वर्षांत उपोषण (Hungar Strike), धरणे आणि मोर्चे (Marches) यांच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. याचा वापर मुख्यतः कोणत्या तरी मागणीसाठी किंवा एखादी गोष्ट करू नये यासाठी होतो. स्वातंत्र्यानंतर मात्र वैयक्तिक स्वरूपाच्या मागणीसाठी धरणे आंदोलने आणि आमरण उपोषणे अशा बॅनरखाली मोठ्या संख्येने आंदोलने होतात.

महात्मा गांधी जेव्हा परकीय सत्ते विरुद्ध उपोषणाला बसत तेव्हा सारा भारत देश चिंताग्रस्त व्हायचा. यामागे गांधीजींचे नैतिक अधिष्ठान हे मूळ कारण होते. सोशल मीडिया नसलेल्या व टेलिफोन, दूरदर्शन नसलेल्या त्या काळात ‘गांधी बाबा उपोषणाला बसलेत’ म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक लोक एक वेळेचा उपवास करत. गांधीजींच्या मृत्यूनंतर सुद्धा लोकांनी एक वेळेचे जेवण किंवा गोड खायचे बंद केल्याची हजारो उदाहरणे आहेत. महात्मा गांधींचा उपोषण करतानाचा जो मनोनिग्रह आहे त्याची क्वचितच प्रचिती आता कलेक्टर ऑफिसरसमोर बसणाऱ्या स्वातंत्र्यानंतरच्या उपोषणांमध्ये आढळते.

पश्‍चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तालुका पातळीवर एक माणूस स्वतःला दोन एकर गायरान जमीन मिळावी म्हणून दरवर्षी उपोषणाला बसायचा व कोणतेतरी आश्वासन पदरात पाडून घ्यायचा. एकदा त्याने तहसील कार्यालयासमोर बायकोसह उपोषणास बसायचे ठरवले. नेहमीच्या पद्धतीने त्याने तशी नोटीस तहसीलदारांना दिली. त्याने बायकोला दोन तासांसाठी माझ्या बरोबर चल असे सांगून तहसील कार्यालयासमोर तो उपोषणाला बसला.

Protest
Organic Cotton : शेतकऱ्यांनी जाणले सेंद्रिय कापूस उत्पादनाचे तंत्र

उपोषणाला बसताना तहसीलदारांनी त्याला समजावून सांगितले की केवळ एक व्यक्ती अर्ज करतो म्हणून त्याला जमीन द्यायची असे करता येत नाही. शिवाय गायरान जमीन ही सार्वजनिक कामासाठी ठेवलेली असते. परंतु तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तहसीलदारांनी फौजदारांना सांगून तो उपोषणाला बसला त्या ठिकाणी त्याच्यावर नजर ठेवायला सांगितले. दुपारनंतर भूक लागल्यावर त्याची चुळबुळ सुरू झाली. एक-दोन वाजता बायकोने त्याला ‘तुला काही कळत नाही, उगाच इथे आणून बसवतो, घरी मुले उपाशी आहेत,’ असे सांगून ती दुपारी घरी निघून गेली. त्याच संध्याकाळी स्वच्छतागृहात गेल्यावर शेंगदाणे आणि फुटाणे खाताना पोलिसांनी त्याला पकडले. तब्बल १० वर्षांनंतर तो उपोषण करायचा बंद झाला तो कायमचाच!

स्वातंत्र्याच्या पूर्वी उपोषण करताना मुख्यतः सामाजिक प्रश्‍न, भारतीय समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मागितली जाणारी दाद, सैधां‍त्तिक मुद्यांवर धरणे किंवा मोर्चे अशी आंदोलने होत. गेल्या १०० वर्षांतला बदल हा जाणवत आहे, की हल्ली मोर्चातल्या अनेक लोकांना कशासाठी मोर्चा काढला आहे हे सुद्धा सांगता येत नाही. अनेक ठिकाणी ३०० ते ४०० रुपये मजुरीवर माणसे आणून मोर्चात सामील केल्याचे आरोप होतात. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वार्ताहर मोर्चात चालणाऱ्या लोकांना जेव्हा विचारतो त्या वेळी मोर्चाचे कारणच त्यांना सांगता येत नाही असे अनेकदा स्पष्ट होते.

Protest
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

गेल्या १०० वर्षांत महाराष्ट्रामध्ये अनेक ऐतिहासिक मोर्चे, सत्याग्रह, धरणे, आंदोलने, उपोषणे झाली. त्यामध्ये १९४२ चे ‘चले जाव आंदोलन,’ साने गुरुजींनी विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी मे १९४७ ला पंढरपूर येथे केलेले उपोषण यांचा समावेश होतो. मुंबईमध्ये झालेल्या टॅक्सीचालकांचा संप आणि कामगार चळवळींनी केलेली आंदोलने, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झालेली प्रचंड मोठी आंदोलने, शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केलेली आंदोलने अशा काही महत्त्वाच्या आंदोलनांचा उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल.

हल्ली सर्व मोर्चाचे रान हे सोशल मीडियावरून पेटवले जाते. प्रथम व्हॉट्सॲप, फेसबुक, यू-ट्यूबवर एखाद्या विषयावर मत मांडून पेटून उठण्याचे आवाहन केले जाते. त्याला पूरक भूमिका एकाच वेळी वेगवेगळ्या प्रदेशात, भाषेत घेतली जाते. त्यानंतर कधी कधी कँडल मोर्चा, मूक मोर्चा, धरणे आंदोलन अशा स्वरूपात मोर्चा प्रकट होतो. आता आंदोलने थोडे मार्केटिंगचा आधार घेत अधिक सुनियोजित पद्धतीने होऊ लागली आहेत.

मोर्चा हे देखील हत्यार अनेक वेळेला उपसले जाते. त्याला जोडून जर शहर, जिल्हा, राज्य किंवा देश बंद करण्याचे आवाहन केले तर अजून त्यांची व्याप्ती वाढते. आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते जर परिपक्व व जबाबदार असतील तर काही आंदोलने यशस्वी होतात. मात्र काही आंदोलने सपशेल फसतात. काही मुद्यांवर आग्रह धरून व काही मुद्दे सोडून देऊनच वाटाघाटी यशस्वी होतात. कधी कधी मात्र युद्धात जिंकून तहात हरल्यासारखे होऊ शकते. एका जिल्ह्यात अवैध वाळू चोरीसंबंधी एक प्रचंड मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्याबरोबर शिष्टमंडळाची चर्चा सुरू झाली.

रात्रीचे नऊ वाजले, बाहेर मोर्च्यातले लोक असह्य होत होते. शेवटी रात्री ११ वाजता नेत्यांनीच कलेक्टरला, ‘आपण पुढच्या वेळी राहिलेल्या मुद्यांवर चर्चा करू’ असे सांगितले. पण कलेक्टर त्यांना म्हणाले, ‘काही करून आजच सर्व मुद्दे संपवू या!’ शेवटी शिष्टमंडळातील भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांना आपण कशासाठी मोर्चा आणला होता तेच समजेना! आपल्या देशात अशा विषयांचे प्रशिक्षण देणारे पदवी व पदव्युत्तर कोर्स काढले तर जगभरातील सर्व नेत्यांची मुले प्रवेश घेतील व अगाध ज्ञान प्राप्त करतील असा विचार मनात आल्याशिवाय मनातील आंदोलन संपत नाही हे मात्र खरे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com