
Chandrpur News : शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची व त्याचेशी निगडीत असलेले जिल्ह्यातील अकुशल व कुशल स्वरूपाची कामे न करण्याचे आदेश ‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांनी निर्गमित केले आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
शेतकऱ्यांना शेतीची अवजारे आणि शेतीमाल ने-आण करणे सोयीचे व्हावे, त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या संमतीने शेतीशिवारामधून शासन ‘मनरेगा’च्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणांत पाणंद रस्ते निर्माण करीत आहे. यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची योजना बंद न करता ती अखंड सुरू ठेवण्यासाठी हल्लीच्या महायुती शासनाने शासकीय खर्चामधून रस्त्याची मोजणी करून मोफत पाणंद रस्ते बांधून देण्याचे जाहीर केले.
असे असताना दुसरीकडे मात्र ‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्ते व रस्त्याची निगडीत कोणत्याही स्वरूपाची अकुशल व कुशल कामे सुरू न करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
जिल्ह्यातील यंत्रणेच्या सर्व प्रमुखांसह तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना पाठविलेल्या आदेशात उपजिल्हाधिकारी यांनी सदर आदेशापूर्वी पाणंद रस्ते व रस्त्याशी निगडीत कामावर वर्क कोड तयार केले असल्यास अशा कामांना स्थगिती देऊन कामे सुरू करण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहे.
महसूल विभाग ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी पाणंद रस्ते निर्मितीला प्राधान्य देत असताना दुसरीकडे मात्र ‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांनी पाणंद रस्ते व रस्त्याशी निगडीत कामे न घेण्याचे निर्देश दिल्याने पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणी विषयी ग्रामीण जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
अंमलबजावणी विषयी संभ्रम
‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांनी पाणंद रस्त्याविषयी निर्देश देताना दुसरीकडे मात्र ग्रामीण शेतकरी आणि शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि ग्रामीण दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करून देण्यासाठी ज्या कामावर अकुशल प्रमाण जास्त आहे अशी सार्वजनिक कामे नेहमी प्रमाणे सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने एकूणच अंमलबजावणी विषयी संभ्रम आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.