
New Delhi News : किमान आधारभूत मूल्य (एमएसपी)चा कायदा करणे आणि इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाना सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चेस केंद्र सरकार अखेर तयार झाले आहे. चंडीगड येथे १४ फेब्रुवारीस ही बैठक होणार आहे.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी आमरण उपोषण काळात सरकारकडील वैद्यकीय उपचार घेण्यास मान्यता दिली आहे. कनौरी सीमेवर २६ नोव्हेंबर २०२४ पासून श्री. डल्लेवाल हे उपोषण करत आहेत.
संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (केएमएम) यांच्या नेतृत्वाखाली हरियाना आणि पंजाब सीमेवरील कनौरी आणि शंभू सीमेवर गेल्या ११ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘दिल्ली चलो’सह रेल रोको आणि देशभर धरणे आंदोलन केली गेली. मात्र, केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही.
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांनी अपील दाखल केले, मात्र सरकार बधले नाही. यानंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय)चे ज्येष्ठ नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी आमरण उपोषण सुरू केले. यावरही सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत पंजाब सरकारला श्री. डल्लेवाल यांच्या प्रकृतीसंदर्भात लक्ष देण्याचे आदेश दिले. श्री. डल्लेवाल यांनी मात्र, जोपर्यंत केंद्र सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा आणि सरकारी उपचार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
अखेर, शनिवारी (ता.१८) केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव प्रिया रंजन उच्चस्तरीय यांच्या नेतृत्वाखालील उच्च स्तरीय समितीने श्री. डल्लेवाल आणि दोन्ही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच कनौरी सीमेवर बैठक घेतली. बैठक सकारात्मक होऊन श्री. डल्लेवाल यांनी सरकारचे उपोषण दरम्यान नाकारलेले उपचार सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच या बैठकी दरम्यान, केंद्र सरकारकडून १४ फेब्रुवारीच चंडीगड येथे बैठकीचे निमंत्रण शेतकरी संघटनांना देण्यात आले.
उशिराची तारीख दिली...
केंद्र सरकारकडून बैठकीसाठी १४ फ्रेबुवारी ही उशिराची तारीख देण्यात आल्याची नाराजी केएमएमचे नेते श्रवण सिंग पंधेर आणि एम.एस. राय यांनी व्यक्त केली. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ फ्रेब्रुवारीपर्यंत लागू असल्याने १४ तारखेला चर्चा ठेवण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
आजचा मोर्चा स्थगित..
शंभू बॉर्डर येथून २१ जानेवारी (आज) रोजी १०१ शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणाऱ्या मोर्चा २६ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय केएमएमने घेतला आहे. तर २६ जानेवारीस काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा भाजप कार्यालय, विविध मॉल आणि सायलोज पुढे दुपारी १२ ते १.३०च्या दरम्यान सर्वत्र केला जाईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.