Sugarcane Blackening : उसाला तुरा येण्याची कारणे आणि उपाय; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

Sugarcane Disease : लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला, तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुरा येतो.
Sugarcane farming
Sugarcane farmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास भोईटे, डॉ. राजेंद्र भिलारे

Sugarcane Disease, Causes and Remedies : लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला, तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुरा येतो. भारी खोल, काळ्याभोर जमिनीत उशिरा, तर हलक्या आणि उथळ तांबड्या पाणथळ अशा जमिनीत उसाला लवकर तुरा येतो.

यावर्षी राज्यात उसाला तुरा येण्याचे अधिक प्रमाण दिसून येत आहे. शास्त्रीयदृष्ट्या उसाला फुले येणे ही अवस्था चार टप्प्यातून पूर्णत्वास येते. यात सर्वप्रथम ऊस पिकात फुलकळीस सुरुवात होते. त्यानंतर फुलोरा लागणे, फुलाची परिपक्वता आणि चौथा टप्पा म्हणजे तुरा बाहेर येण्याची अवस्था. या सर्वांमध्ये फुलकळीची सुरुवात ही सर्वात महत्त्वाची अवस्था होय. ही फुलकळीची अवस्था म्हणजेच पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया होय. ही प्रक्रिया दिवसाचा प्रकाश कालावधी किती मोठा आहे यावर अवलंबून असते. प्रकाशकाळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे

Sugarcane farming
Sugarcane Disease : ऊसावरील पोक्का बोंग, तपकिरी तांबेरा रोगाचे नियंत्रण

प्रमाण, पोषणद्रव्याची उपलब्धता, पानातील उपलब्ध संजीवकांचे प्रमाण यावर परिणाम करते. दिवसाचा प्रकाशकाळ अधिक असल्याने सूर्यप्रकाशाची तीव्रता ऊस पिकास अधिक प्राप्त होते. त्यामुळे उसाची पाने सूर्यप्रकाशाची तीव्रता ६६० एन./एम. ते ७४० एन./एम. एवढ्या प्रमाणात मिळवतात. यामुळे उसात फ्लोरिजन हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक फुलकळीचे रूपांतर तुऱ्यात करते. महाराष्ट्रातील हवामानात उसाच्या वाढीवरील अग्रांकुर जुलै

महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात फुलकळीचे रूपांतर तुऱ्यात होते.

पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल परिस्थिती

सर्वसाधारणपणे दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस एवढे असेल तसेच दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानातील फरक हा कमीत कमी असेल तर ऊस पिकात फुलकळी तयार होण्यास मदत होते.

महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक असेल तर हवेतील आद्रता ६५ ते ९० टक्यांच्या आसपास असते. यामुळे पुष्पांकुर तयार होण्यास मदत होते. प्रकाशाची तीव्रता १०००० ते १२००० फूट कॅण्डल असेल तर पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते.

तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक

वाण

उसाच्या सर्व वाणात तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. म्हणजेच तुरा येण्याचे प्रमाण उसाच्या आनुवंशिक वाणावर अवलंबून असते.

लवकर तुरा येणारे वाण : को ७२१९, को.सी. ६७१, को ९४०१२ को. एम.११०१५

मध्यम कालावधीत तुरा येणारे वाण: को ७१२५, को ८६०३२, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६

उशिरा तुरा येणारे वाण: फुले ऊस १३००७

Sugarcane farming
Sugarcane Crushing Season : अहिल्यानगर विभागात आतापर्यंत पंचावन्न लाख टन उसाचे गाळप

अति पाऊस किंवा पाणथळ जमीन

ज्यावर्षी जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस होतो, त्यावर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते. पाणथळ जमिनीत तुरा येण्याचे प्रमाण अधिक असते. एरवी ९९००४ या वाणास उशिरा तुरा येतो परंतु पाणथळ जमिनीत या वाणास लवकर तुरा येतो.

प्रकाश कालावधी आणि तापमान

सर्वसाधारणपणे दिवसाचा कालावधी १२.३० तास आणि रात्रीचा कालावधी ११.३० तासांचा असेल तर हा कालावधी तुरा येण्यास अनुकूल समजला जातो. असे वातावरण १० ते १२ दिवस सलग राहिल्यास पुढे ७० ते ९० दिवसांत तुरा येतो.

नत्राचे प्रमाण

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. तसेच अधिक पावसामुळे जमिनीतील नत्र वाहून गेले अथवा पाणथळ परिस्थिती निर्माण झाल्याने नत्र उपलब्ध न झाल्यास तुरा येतो.

पाण्याचा ताण

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.

जमिनीचा प्रकार

भारी खोल व काळ्याभोर जमिनीत उशिरा तर हलक्या आणि उथळ तांबड्या पाणथळ अशा जमिनीत उसाला लवकर तुरा येतो.

लागवडीचा हंगाम आणि पिकाचा प्रकार

लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुरा येतो.

एप्रिल ते जून या काळात लागण केलेला ऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये तीन ते चार कांड्यावर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाले तर अशा उसाला डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो. परंतु, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्यावर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये तुरा येत नाही.

भौगोलिक स्थान

विषुववृत्तापासून जवळ म्हणजेच दक्षिण भारतात उसाला लवकर तुरा येतो तर दक्षिण भारताकडून जसजसे उत्तर भारताकडे जाऊ तसतसे उशिरा तुरा येण्याचे आढळून आले आहे. उदाहरणार्थ दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू या राज्यात उत्तरेकडील लखनौपेक्षा लवकर तुरा येतो.

उसावर होणारा परिणाम

तुरा येण्यापूर्वी उभ्या उसाला बाणासारखी टोके दिसू लागतात आणि वाढ थांबते.

तुरा आल्यावर सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्यांपर्यंत उत्पादनात जास्त घट येत नाही.

तुरा येऊन फुले गळू लागल्यावर उसामधील रसाची गुणवत्ता ढासळू लागते आणि साखरेचे रूपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. सुक्रोजचे प्रमाण देखील घटते.

उसामध्ये दशी पडून ऊस पोकळ पडतो. ऊस आणि साखर उत्पादन घटते.

तुरा येऊ नये म्हणून उपाययोजना

तुरा येऊ नये म्हणून शास्त्रीयदृष्ट्या अशी कोणतीही ठोस उपाययोजना नाही कारण तुरा न येणारे असे कोणतेही वाण सध्या उपलब्ध नाही. तथापि प्रायोगिकदृष्ट्या काही बाबी जसे जमिनीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, हंगामानुसार योग्य वेळी लागवड, जुलै व ऑगस्ट महिन्यात नत्र खताचा वापर करणे इत्यादी उपाययोजना केल्यास उसाला तुरा कमी प्रमाणात येतो.

उशिरा तुरा येणाऱ्या वाणांची लागवड करणे.उदा. फुले ऊस १३००७ या वाणाची लागवड करावी.

जमिनीतील पाण्याचा निचरा करावा.

डॉ. राजेंद्र भिलारे, ९८२२०७२४२८

(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com