संदीप नवले
Palak Vegetable : पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावाने पालक पिकात ओळख तयार केली आहे. साखर कारखाना बंद पडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पालक पिकालाच हुकमी व नगदी पीक बनविले. पुणे, मुंबईसह गुजरातची बाजारपेठ मिळवून विक्री व्यवस्था शाश्वत, भक्कम केली. याच पिकातून शेतीसह कुटुंबाचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर पुणे शहरापासून २५ ते ३० किलोमीटरवर कुंजीरवाडी (ता. हवेली, जि. पुणे) वसले आहे. लोकसंख्या सुमारे १५ हजार ते २० हजारांच्या आसपास, तर भौगोलिक क्षेत्र ४५५ हेक्टर आहे. मुळा- मुठा नदी आणि कॅनॉल जात असल्याने गावाचा परिसर बागायती आहे. पालक पिकात गावाने वेगळी ओळख तयार केली आहे.
पालक झाले गावाचे पीक
काही वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात ऊस शेती व्हायची. काही प्रमाणात तुकाराम धुमाळ व अन्य मोजके शेतकरी पालकासारखे पीक घ्यायचे. गावाजवळील साखर कारखाना बंद पडल्यानंतर मात्र ऊस उत्पादकांपुढे समस्या निर्माण झाली. काही शेतकरी गुलछडी, गुलाब या पर्यायी पिकांकडे वळले. मात्र बदलत्या हवामानात रोग- किडीचा प्रादुर्भाव आणि जमा-खर्चाचा ताळेबंद काही जुळेना.
दरम्यान, तुकाराम यांनी पालक हेच मुख्य पीक म्हणून निवडले. गावातील अंकुश भिवा धुमाळ, बबन भिकू माळ, सोपान खटाटे आदींनीही त्यांना साथ दिली. विक्रीत अनेक अडचणी होत्या. पण हार न मानता आणि जिद्द कायम बाळगत पुणे, मुंबई बाजारपेठेत जम बसविण्यात ते यशस्वी झाले. या शेतकऱ्यांची प्रेरणा घेत गावातील अन्य शेतकरीदेखील या पिकाकडे वळले. आजमितीस गावातील सुमारे शंभर शेतकरी पालक शेतीत असून प्रत्येकाकडे दहा गुंठ्यांपासून एक- दोन, चार- पाच एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र आहे.
पालकाची शेती
पालकासाठी कुंजीरवाडी भागातील वातावरण, मध्यम ते भारी जमीन अनुकूल ठरली आहे. सुमारे ३५ ते ४० दिवसांत पालक काढणीस येतो. त्या हिशेबाने अनेक शेतकरी वर्षभरात सुमारे सहा ते आठ वेळा हे पीक घेतात. टप्प्याटप्प्याने लावण असल्याने काढणीस ते सोपे जाते. एका पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर नांगरट करून वाफे किंवा पट्टा पद्धतीने पुढील पिकाची तयारी केली जाते.
पालकाला तशी वर्षभर मागणी राहते. मात्र उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक ठिकाणचे क्षेत्र व उत्पादन कमी असल्याने बाजारात मागणी व दरांतही चांगली वाढ होते. त्याचा फायदा बागायती कुंजीरवाडीतील शेतकऱ्यांना होतो. पावसाळा आणि हिवाळ्यात पोषक वातावरणात उत्पादनात काही प्रमाणात वाढ होते. पण दरांत चांगलीच घट होते त्यावेळी अनेक वेळा हे पीक परवडतही नाही.
काढणीचे व्यवस्थापन
गावातील प्रमुख व जुने पालक उत्पादक तुकाराम धुमाळ सांगतात की पूर्वी मी माझ्यासह अन्य
शेतकऱ्यांचा पालकही विकायचो. माझा वाहतूक व्यवसायही आहे. आता कुंजीरवाडी
तसेच थेऊर परिसरातील गावपरिसरात पालकाची शेती विस्तारली आहे. शंभरच्या आसपास तरुण या विक्री नियोजनात उतरले आहेत. आमच्याकडे ३० ते ४० मजुरांची ‘टीम’ आहे.
दुपारनंतर काढणी होते. वाहतुकीत खराब होऊ नये म्हणून ५० गड्ड्या एकत्रित बांधून पालकाचे पोटल वाहनांद्वारे पाठवले जाते. यात वेळेचे खूप नियोजन करावे लागते. चार ते पाच तासांमध्ये ही प्रक्रिया करावी लागते. माल वेळेत न गेल्यास मोठे नुकसान होण्याची भीती असते.
संबंधित वाहनचालक व संबंधितांना तशा सूचनाही केल्या जातात. गाव परिसरातून दररोज २५ गाड्या पालक भरून पाठवल्या जातात. पोटल बांधण्यासाठी दररोज हजारो रुपयांची सुतळी व बारदाना लागतो. थेऊर फाट्यावर पाच ते सहा विक्रेते या मालाची विक्री करतात.
उत्पादन, बाजारपेठ, अर्थकारण
तुकाराम धुमाळ यांच्याकडे सुमारे पाच एकरांत पालक असतो. ते सांगतात की एकरी सुमारे
१६ हजार ते २० हजार गड्ड्यांचे उत्पादन मिळते. एकरी सुमारे १२ हजार ते १५ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. पुणे, मुंबई या स्थानिक व शाश्वत बाजारपेठा आहेत. वर्षभराचा विचार केल्यास प्रति गड्डी २ ते पाच रुपये दर, तर उन्हाळ्यात हाच दर पाच ते दहा रुपये मिळतो.
जून, जुलैच्या काळात ज्या वेळी पाऊस खूप होऊन पालकाचे नुकसान होते त्या काळात गुजरात- अहमदाबाद, अमरावती, नागपूर भागांतून मागणी वाढते. त्या वेळी १० रुपयांपर्यंत प्रति गड्डी दर मिळतो. गुजरातचे व्यापारी आपले वाहनात माल भरून नेतात. मालाचे ऑनलाइन पेमेंट करतात. अशावेळी दरांचा फायदा मिळतो. काही व्यापारी मोबाइल, ई-मेलद्वारे मागणी नोंदवितात.
पालकाच्या एका पिकातून एकरी २० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. वर्षभरात सहा ते आठ पिके झाली, तर त्यानुसार मिळकत होते. गावात या माध्यमातून वार्षिक काही कोटींच्या आसपास उलाढाल होते.
राहणीमान उंचावले
पालक पिकातून कुंजीरवाडीतील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. त्यांचे राहणीमान उंचावले आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगली घरे बांधली आहेत. दुचाकीसोबत चारचाकीही घरासमोर उभी असल्याचे दिसते.
आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणेही शक्य झाले आहे. पालक शेतीच्या माध्यमातून गाव व गावाबाहेरील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. मजुरांनाही चांगला मेहनताना मिळत आहे.
शेतकरी प्रतिक्रिया :
माझी सहा एकर शेती आहे. ऊस आणि पालक ही कायमस्वरूपी पिके असतात. वर्षभरात पालकाची सुमारे आठ पिके घेतो. प्रति पीक २० ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळून आर्थिकदृष्ट्या
सक्षम झालो आहे.
अंकुश धुमाळ, ८९७५९६०७२७
कोथिंबीर, कांदापात, मेथी आदी भाजीपाला शेतकऱ्यांकडून घेऊन मी विक्री करतो. या माध्यमातून
भागातील ५०० शेतकरी जोडले आहेत. त्यातून त्यांना बांधावर दोन पैसे अधिक मिळू लागले आहेत.
भाऊसाहेब धुमाळ, ९०११८६२५२५
तुकाराम धुमाळ, ८८०५०४९२९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.