Carbon Storage: कार्बन साठवणुकीसाठी आवश्यक उपाययोजना

Agriculture Management: हवामान बदलाच्या वाढत्या संकटात कार्बन साठवणूक ही प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरत आहे. सेंद्रिय शेती, वृक्षारोपण, पीक फेरबदल व शून्य मशागत या पद्धती शेतकऱ्यांसाठी पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

बायजा चादर, डॉ.भागवत चव्हाण, अक्षय गार्डी, डॉ. रविंद्र जाधव

Farm For Future: शून्य मशागत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खतांचा वापर या सर्व पद्धती मातीतील कार्बन टिकवून ठेवतात. शेतीतील जैविकता वाढवणे म्हणजेच कार्बन साठवणुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. महासागरातदेखील कार्बन शोषण्यासाठी मोठे स्रोत आहेत. समुद्रातील शेवाळ, खारफुटीची वने, प्रवाळी दांड आणि सागरी गवत ही कार्बनचे नैसर्गिक साठवण करणारी परिसंस्था आहे.

जगभर तापमानवाढ आणि हवामान बदल यांची झपाट्याने वाढ होत आहे. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण हे या समस्येचे मुख्य कारण आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी कृतींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वेगाने वाढला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणीय समतोलात मोठ्या प्रमाणावर बिघाड झाला आहे. त्यासाठी कार्बन साठवणूक ही संकल्पना अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पुढे आली आहे.

कार्बन साठवणूक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वेगळा करून, त्याचे दीर्घकालीन स्वरूपात साठवण किंवा रूपांतर करणे. यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू माती, झाडे, महासागर अथवा भूगर्भात साठवला जातो. त्यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण घटते. यातून तापमानवाढ व हवामान बदलाचे परिणाम कमी करता येतात. ही प्रक्रिया जैविक व भूगर्भीय अशा दोन मुख्य प्रकारांत विभागलेली आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या पद्धतींचा वापर केल्यास पर्यावरणाचे संरक्षण होते, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्टीनेही फायदे होतात.

Agriculture
Agriculture Carbon Emission: शेतीतील कार्बन उत्सर्जनाची कारणे अन्‌ व्यवस्थापन

जैविक कार्बन साठवणूक

जैविक पद्धतींमध्ये नैसर्गिक प्रक्रियांद्वारे कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यात येतो. उदाहरणार्थ, वृक्ष लागवड, वनसंपदा संवर्धन, सेंद्रिय शेती, आच्छादन पिके, पीक फेरबदल इत्यादी. मोठी जंगले हे ‘कार्बन सिंक’ म्हणून कार्य करतात. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. शून्य मशागत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खतांचा वापर या सर्व पद्धती मातीतील कार्बन टिकवून ठेवतात. शेतीतील जैविकता वाढवणे म्हणजेच कार्बन साठवणुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

महासागरातदेखील कार्बन शोषण्यासाठी मोठे स्रोत आहेत. समुद्रातील शेवाळ, खारफुटीची वने, प्रवाळी दांड, आणि सागरी गवत ही कार्बनचे नैसर्गिक साठवण करणारी परिसंस्था आहे. फायटोप्लॅक्टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि मृत झाल्यावर समुद्राच्या तळाशी जातात, जिथे कार्बन दीर्घकाळ साठून राहतो. हे जैविक पंप आणि विद्राव्यता पंप म्हणून कार्य करतात.

भूगर्भीय व मानवनिर्मित साठवणूक

औद्योगिक क्षेत्रातून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड विशेषत: वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद निर्मिती कारखान्यांमधून पकडून, त्याचा वापर किंवा साठवण भूगर्भात केली जाते. यासाठी ‘सीसीयूएस’ ही पद्धत वापरली जाते. यामध्ये कार्बन डायऑक्साइड गोळा केला जातो, वाहतूक केली जाते आणि खोल भूगर्भात मुरवून सुरक्षित ठिकाणी साठवला जातो. काही वेळेस याचा वापर नवीन उत्पादने निर्माण करण्यासाठी केला जातो. ‘बीइसीसीएस’ तंत्रज्ञानामध्ये बायोमास जाळून ऊर्जा मिळवली जाते आणि उत्सर्जित कार्बन डायऑक्साईड भूगर्भात साठवला जातो.

Agriculture
Organic Carbon: जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी उपाययोजना

कार्बन साठवणुकीचे फायदे

जमिनीची सुपीकता : जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढल्याने तिची पोषकता, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता, आणि सूक्ष्मजिवांची क्रियाशीलता वाढते. हे सर्व शेतीसाठी लाभदायक ठरते.

उत्पादनात वाढ : सुपीक जमिनीत पीक वाढ चांगली होते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. रासायनिक खते व कीडनाशकांचा खर्च कमी होतो.

खर्चात बचत : सिंचन, रासायनिक खते व कीटकनाशकांचा खर्च घटतो. सेंद्रिय उपायांमुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहते.

हवामान बदलाचा सामना : अधिक कार्बन असलेली माती अधिक लवचिक असते. अशी माती दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या घटनांना सामोरे जाऊ शकते.

कार्बन क्रेडिट्सद्वारे उत्पन्न : कार्बन साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट्स विकून उत्पन्न मिळवता येते.

जैवविविधता वाढ : वृक्षारोपण व सेंद्रिय शेतीमुळे कीटक, पक्षी, सूक्ष्मजीव यांचे प्रमाण वाढते.

आव्हाने आणि उपाय

कार्बन डायऑक्साइड साठवणुकीचा खर्च अधिक आहे, तांत्रिक मर्यादा आहेत. साठवलेल्या कार्बन डायऑक्साइडची गळती होण्याची शक्यता असते. भूकंप किंवा पाण्याचे प्रदूषण यासारखे धोके संभवतात. त्यामुळे संशोधनाला चालना, मजबूत नियमन, लोकसहभाग व नैसर्गिक उपायांना प्राधान्य देणे, कार्बनला आर्थिक मूल्य प्राप्त करून देणे गरजेचे आहे. या सगळ्यासाठी शासनाने धोरणात्मक पाठिंबा देणे आवश्यक आहे.

कार्बन साठवणूक हे पृथ्वीच्या संवर्धनासाठी प्रभावी माध्यम आहे. भारतासारख्या देशात जैविक उपाय हे अधिक व्यवहार्य व शाश्वत ठरतात. शेतकऱ्यांनी या पर्यायांचा अवलंब केल्यास पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिक स्थैर्य देखील मिळू शकते.

प्रत्येक व्यक्ती, समाज, उद्योग आणि सरकारने या दिशेने सक्रियपणे काम केल्यास आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित पृथ्वी ठेवणे शक्य आहे. हे एक सामूहिक आव्हान आहे आणि यावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

कार्बन साठवणुकीचे उपाय

वृक्षारोपण : शेती बांधावर किंवा शेताच्याकडेला झाडे लावल्यास ती कार्बन शोषण्यास मदत करतात. झाडांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात, सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करत राहतात.

मशागत कमी करणे : नांगरणी कमी केल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात ऑक्सिडाइझ होतात, त्यामुळे कार्बन जास्त टिकून राहतो.

आच्छादन पिके : खरिपाच्या हंगामात पीक घेतल्यानंतर उरलेली जमीन मोकळी न ठेवता हरभरा, मूग, उडीद अशा हरित पिकांनी झाकल्यास मातीची धूप टळते आणि सेंद्रिय कार्बन वाढतो.

पीक फेरबदल : एकाच जमिनीत वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून पालटून घेतल्यास मातीतील पोषणतत्त्वांचा समतोल राखला जातो. मातीतील कार्बन टिकून राहतो.

सेंद्रिय खतांचा वापर : शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत यांचा वापर केल्यास मातीतील कार्बनचे प्रमाण वाढते, सेंद्रिय घटक टिकतात.

शेतीमधील अवशेष व्यवस्थापन : उरलेले पीक अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतर करणे किंवा थेट जमिनीत मिसळून कार्बनचे पुनर्वापर करणे फायदेशीर ठरते.

सेंद्रिय शेतीचा अवलंब: रासायनिक खतांचा वापर टाळून जैविक व नैसर्गिक पद्धती वापरल्यास जमिनीतील कार्बन जास्त टिकतो.

- बायजा चादर, ९७६५५०२४९७

(सहाय्यक प्राध्यापक, मृदा शास्त्र व कृषी रसायनशास्त्र, सौ.के.एस.के.कृषी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com