Traditional Groundwater Detection : पायाळू माणूस पाणी दाखवू शकतो का? सत्य आणि समज-गैरसमज!

Underground Water Sources : पायाळू माणसाला जमिनीखालील पाणी दिसते. त्याने जमिनीला पाय लावला, तर पाण्याच्या प्रवाहाचा आवाज त्याला ऐकू येतो अशी समजूत आहे. ही समजूत चुकीची आहे. अशा बऱ्याच गैरसमजूती आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या आहेत.
Traditional Water Finding Method
Traditional Water Finding Method Agrowon
Published on
Updated on

मुक्ता दाभोलकर

पाण्याला ‘जीवन’ असा प्रतिशब्द आहे. शेतकऱ्याचे आणि पाण्याचे नाते तर फारच घट्ट आहे. जमिनीत नेमके कुठे पाणी मिळेल? याचे काही ठोकताळे अनेक वर्षांच्या अनुभवातून माणसे बांधत आलेली आहेत. जमिनीचा उतार, नदीचा शेजार, ठरावीक झाडे, मातीची ओल बघून जुनी-जाणती, अनुभवी माणसे जमिनीत कुठे पाणी लागेल याचा अंदाज बांधतात.

परंतु अमुक ठिकाणी किती पाणी लागेल? किती खोलीवर लागेल? याचा नेमका अंदाज कोणी बांधू शकत नाही. त्यामुळे विहीर खणणाऱ्या किंवा बोअर काढणाऱ्या व्यक्तीच्या मनात धाकधूक असतेच. विहीर खणणे किंवा बोअर मारणे हे मोठे खर्चाचे काम असते.

अशावेळी पाण्याचा निश्‍चित ठावठिकाणा सांगता येत नसल्यामुळे माणूस अगतिक असतो. कोणाच्या का कोंबड्याने पण उजाडू दे, अशी त्याच्या मनाची स्थिती असते. अशाप्रसंगी पाणी दाखवणाऱ्या पायाळू माणसाला गाठायचे हे आपण आजूबाजूला सर्वत्र बघितलेले असते. मग आपणही तेच करतो.

पायाळू माणसाला जमिनीखालील पाणी दिसते. त्याने जमिनीला पाय लावला, तर पाण्याच्या प्रवाहाचा आवाज त्याला ऐकू येतो अशी समजूत आहे. ही समजूत चुकीची आहे. परदेशात पायाळू माणसातील या तथाकथित शक्तीबाबत शास्त्रीय पाहणी झालेली आहे. या पाहणीत जमिनीखालून पाण्याचे पाइप घालून त्यातील विशिष्ट पाइपमधून ठराविक वेळी पाणी सोडण्यात आले. चाचणीत सहभागी झालेल्या पायाळू व्यक्तींना त्यापैकी नेमक्या कोणत्या पाइपमधून पाणी वाहत आहे, हे ओळखायला सांगण्यात आले. पायाळू माणसाला पाणी दाखवता येते हा दावा या चाचणीत खोटा ठरला.

प्रत्यक्षात देखील पायाळू माणसाने दाखविलेल्या ठिकाणी हमखास पाणी लागतेच असे नाही. बहुतेक वेळा असे होते, की पायाळू माणूस त्याच भागातील असतो, त्याला परिसराची माहिती असते. वर नमूद केलेल्या उतार, ओल, विशिष्ट झाडे अशा नेमक्या कोणत्या गोष्टींचे निरीक्षण करून ठोकताळे बांधावे याची माहिती त्याला असते.

त्यामुळे एखाद्या अनुभवी माणसाप्रमाणे तो केवळ एक ठोकताळा बांधतो व काही वेळा तेथे पाणी लागते. परंतु त्याच्या अंगात जन्मजात विशेष शक्ती असल्याची आपली ठाम समजूत असल्याने, त्याच्या या शक्तीमुळेच पाणी मिळाले अशी आपली समजूत होते. पाणी लागले तर पायाळू माणसाने ते दाखवले असा प्रचार होतो आणि लागले नाही तर आपल्या नशिबात नाही असे वाटून माणसे गप्प बसतात.

Traditional Water Finding Method
Geopathic Stress Zone : जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्याचा मानवी आजारांशी संबंध

पाणी शोधण्याचा अंधश्रद्धेवर आधारित अजून एका प्रकार केला जातो. पाणी दाखवणारी व्यक्ती हातात एक नारळ घेते व पाणी शोधायच्या ठिकाणी चालायला सुरुवात करते. एका ठरावीक ठिकाणी तळहातावरील नारळ हळूहळू उभा राहू लागतो. ज्या ठिकाणी तळहातावर आडवा ठेवलेला नारळ जवळपास पूर्णपणे उभा राहिलेला दिसतो, त्या ठिकाणी पाणी दाखविणारी व्यक्ती थांबते व तेथे पाणी आहे असे सांगते. ही तर संपूर्णपणे हातचलाखी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देखील हा तथाकथित चमत्कार प्रभावीपणे सादर करतात. अर्थात कोणतेही पाणी दाखवण्यासाठी नाही, तर अशा पद्धतीची बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी ते हे करतात.

Traditional Water Finding Method
Farmers Story : स्त्री-पुरुष शेतकऱ्यांच्या नजरेतून शेतीचे जग

समजा एखाद्या मोठ्या इमारतीच्या गच्चीवर हातात नारळ ठेऊन पाणी शोधणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्या व्यक्तीला फिरवले, तर हातातील नारळ गच्चीवरील पाण्याच्या टाकीपाशी आल्यावर नेमका उभा राहील का? किंवा अशा व्यक्तीला जर एखाद्या शिवारात डोळ्याला पट्टी बांधून हातावर नारळ ठेऊन फिरवले, तर नेमके बोअरिंग जवळ आल्यावर त्याच्या हातातील नारळ उभा राहील का, हा प्रश्‍न देखील आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. ज्याचा प्रश्‍न सुटत नाही, तो ग्राहक न्यायालयात जात नाही. त्यामुळे आपल्या मनात रुजलेल्या या गैरसमजुती धंद्यासाठी वापरणाऱ्यांचे फावते.

पायाळू माणसामुळे लचक बरी होते ही देखील एक अशास्त्रीय समजूत आहे. कमी तीव्रतेची लचक अशी तशी ही दोन-चार दिवसांत आपोआप बरी होणारच असते. अशा व्यक्तीवर पायाळू व्यक्तीने उपचार केल्यास त्याला क्रेडिट मिळते. गंभीर आजारांमुळे होणारी पाठदुखी कोणत्याही पायाळू व्यक्तीच्या उपचारामुळे कधीही बरी होत नाही. पायाळू माणसाला आग, वीज, पाणी यापासून भीती नसते अशी ही समजूत असते.

त्याला देखील कोणताही शास्त्रीय आधार नाही. आईच्या पोटातून बाहेर येताना पहिल्यांदा पाय बाहेर आले म्हणून माणसाला काही विशेष गुण प्राप्त होतात ही आपल्या समाजात खोलवर रुजलेली गैरसमजूत आहे. त्याला धरून आपण वागलो, तर आपल्या पुढच्या पिढ्या देखील त्यावर विश्‍वास ठेवतच मोठ्या होतात. त्यामुळे ही समजूत आता आपण सोडून द्यायला हवी.

(लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन, पंचायत राज प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

९४२३२९७९६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com