Farmers Story : स्त्री-पुरुष शेतकऱ्यांच्या नजरेतून शेतीचे जग

Agriculture Experiences : मानवी जगण्याचे आकलन वाढवायचे असेल, तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी त्यांच्या जगण्याच्या चौकटीतून हे जग कसे दिसते याबद्दल लिहिले पाहिजे. शेतकऱ्याच्या जगण्याबद्दल देखील स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांनी स्वतः लिहिले पाहिजे आणि ते सर्वांना वाचायला मिळाले पाहिजे.
Farmer Couple
Women FarmerAgrowon
Published on
Updated on

मुक्ता दाभोलकर

विज्ञानाचे प्रयोग असोत, की साहित्याचे लेखन. प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याचे विश्लेषण व मांडणी करण्याची व्यक्तीची क्षमता त्यात महत्त्वाची मानली जाते. जीवनानुभवाचे महत्त्व सांगताना मराठीत आपण ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असे म्हणतो. किती तरी म्हाताऱ्या बाया बोलता बोलता म्हणत नाहीत का? ‘कसा संसार केला माझं मला माहीत.’ व्यक्ती ज्या परिस्थितीचा भाग बनून जगते, त्या परिस्थितीतील जगण्याबद्दलची सर्वात जास्त जाण तिलाच असते.

त्यामुळे मानवी जगण्याचे आकलन आपल्याला वाढवायचे असेल, तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी त्यांना त्यांच्या जगण्याच्या चौकटीतून हे जग कसे दिसते याबद्दल लिहिले पाहिजे. शेतकऱ्याच्या जगण्याबद्दल देखील स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांनी स्वतः लिहिले पाहिजे आणि ते सर्वांना वाचायला मिळाले पाहिजे. फेसबुक या समाजमाध्यमावर मला काही शेतकऱ्यांचे लेखन वाचायला मिळत आहे. त्याबद्दल मला आज सांगायचे आहे.

त्यात पहिल्या आहेत कल्पना दुधाळ. कल्पना दुधाळ या शेतकरी आणि कवयित्री आहेत. खुरपणी, तोडा, घासकापणी अशा शेतीत स्वतः करत असलेल्या कष्टाच्या कामांचा त्यांच्या लेखनात सहज उल्लेख असतो. काम करत असतानाचे फोटोही असतात.

सोबत ‘हे छोटू कलिंगड बघतंय माझ्याकडे जसं तान्हुलं लेकरू’. ‘डाळिंबात काकडीचं आंतरपीक घेतलंय. वेलांना सांगितलंय जाळी लावलीय, त्यावर चढायचं मजेत, वाकडं व्हायचं नाही, मस्त सरळ लुसलुशीत वाढायचं...ऐकतील.’ असे हायकू नावाच्या जपानी अल्पाक्षरी कवितेप्रमाणे असलेले त्यांचे लेखन असते.

सोमिनाथ घोळवे हे दुसरे फेसबुक फ्रेंड. ते शेती, दुष्काळ, पाणी या प्रश्नाचे अभ्यासक आणि शेतकरी आहेत. प्रत्यक्ष शेतीच्या अनुभवातून उन्हाळा सुरू झाल्यावर झाडं जगवण्याचे आव्हान, शेतातलं जेवण, मोटरसायकलची दुरुस्ती, हुरडा, भरभरून देणाऱ्या काळ्या आईला एखादा हंगाम विश्रांती घेऊ देण्याबद्दलचे त्यांच्या वडिलांचे शब्द अशा अनेक गोष्टींबद्दल लिहितात.

Farmer Couple
Drought Crisis : १९७२ च्या दुष्काळातून आपण धडे घेतले का?

तिसरे फेसबुक फ्रेंड आहेत सचिन श्रावस्ती. शेतात प्रत्यक्ष काम करण्याचे, बाजारात माल विकण्याचे, भरपूर श्रमानंतर घेतलेल्या जेवणाचे जिवंत तपशील त्यांच्या लेखनात असतात. शेवग्याच्या दोन सरीतील पाणी दिलेल्या खपली गव्हाशेजारून चिखलातून चालत शेवग्याच्या शेंगा तोडणे, त्या बाजारात नेणे, रात्री मित्र मंडळीत वाटणे, असा त्यांचा बारा तासांचा दिनक्रम ते मांडतात. विहिरीबद्दल आणि शेताच्या बांधावर मिळणाऱ्या मोरपिसांबद्दल लिहितात. ज्याच्या कष्टाचे खाणे मोर खातो त्या शेतकऱ्याने आणि बांधावर फेरी मारायला गेलेल्या शहरी माणसाने मोरपिसांबद्दल लिहिणे यात फरक आहे.

चौथे फेसबुक फ्रेंड आहेत प्रा. सुखदेव काळे. उत्तम वाचक असलेले काळे सर शेतकरी कुटुंबातील आहेत. कृषी तंत्रज्ञानाचे प्राध्यापक आहेत. वस्तीवर दुधाच्या गाडीला दूध घालताना सांगितलेला आकडा, काट्याच्या फलकावर आतल्या बाजूला दिसणारा आकडा, व्हॉट्सॲप येणारा आकडा यात तफावत दिसल्यानंतर सर्वांच्या मनात दाटून येणारी फसवले गेल्याची भावना, शेती संस्कृतीचा कणा असलेल्या विश्वासाचा ऱ्हास, गोठ्यात जनलेली गाय, तिची कालवड, गेली पंचवीस वर्षे घरातील कुत्र्या मांजरांसकट गुरांचे औषध करणारे डॉक्टर आणि दुग्ध व्यवसायातील व्यग्रतेमुळे विशेषतः कुटुंबातील स्त्रियांना कधी घर न सोडता येणे अशा अनेक गोष्टींबद्दल काळे सर छोट्या छोट्या पोस्ट्स लिहितात.

Farmer Couple
Rural Story : स्थित्यंतराच्या रेट्यात गोंधळलेली पिढी

काळे सरांची एक छोटीशी पोस्ट माझ्या अगदी लक्षात राहिली आहे. शेती संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीचे नवरा बायको नात्याबद्दलचे विचार आणि शिक्षणातून आधुनिक विचारांचा परिचय झालेल्या शेतकरी कुटुंबातील तरुणाचे नवरा-बायको नात्याबद्दलचे विचार याबद्दल ती पोस्ट बोलते. पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबातून येऊन, नोकरीला लागून लग्न झाल्यावर मधुचंद्रासाठी जाताना, ‘...लग्न झाले नाही तो मुलगा घरच्यांना सोडून एकट्या बायकोला घेऊन निघाला’ म्हणून आई नाराज झाली याबद्दल सर लिहितात.

नवरा- बायको या नात्याला फक्त स्वतंत्र खोली नाही तर स्वतंत्र वेळ गरजेचा असतो, त्यातून ते नाते खुलते याची जाण कुटुंबापासून न दुरावता त्यांच्यापर्यंत पोचवणे हे काम सामुहिक श्रम महत्त्वाचे असलेल्या शेतकरी कुटुंबातील तरुण मुलांनी कसे केले असेल? की बायकोमुळे आम्हाला विसरला अशी हेटाळणी होऊ नये यासाठी बरेच जण घाबरून त्या वाटेलाच गेले नसतील?

शेतीच्या प्रश्नावरील लेखन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, आवड म्हणून शेती करणाऱ्यांचे अनुभव या सर्वांपेक्षा हे लेखन वेगळे आहे. शेतीवर स्वतःच्या कुटुंबाचे भरण-पोषण करणाऱ्या व्यक्तीच्या रोजच्या जगण्याबद्दल दृष्टी देणारे हे लेखन आहे. शेतकऱ्यांतील माणसाची गोष्ट इतरांपर्यंत पोहोचविणारे असे लेखन अजून खूप जणांनी करायला हवे.

(लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन, पंचायत राज प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

९४२३२९७९६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com