Post-Harvest Management : उत्पादनाच्या वैशिष्ट्यानुसार निवडावे पॅकेजिंग

Fruit Packaging : फळे आणि भाजीपाला उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे वाया जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण प्रचंड आहे.
Fruit Packaging
Fruit PackagingAgrowon
Published on
Updated on

डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे

Fruit Preservation Technology : भारतात वर्षभर सूर्यप्रकाशाची उपलब्धता आणि विविध हंगामांत मिळणाऱ्या पावसामुळे होणारी सिंचनाची सोय यामुळे वर्षभर विविध प्रकारच्या फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार, भारतात फळांचे उत्पादन सुमारे १०७ दशलक्ष मेट्रिक टन आणि भाज्यांचे उत्पादन सुमारे २०४ दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे.

भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यांचे उत्पादन विशिष्ट प्रदेशामध्ये अधिक होत असले, तरी त्यांची मागणी अन्य प्रदेशांमध्ये अधिक आहे. उदा. महाराष्ट्रात द्राक्ष आणि आंबा या फळांचे, तर कांदा या कंदभाजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, तर उत्तर प्रदेशात बटाटे आणि टोमॅटोचे.

तिथून ती देशाच्या विविध भागांमध्ये पाठवली जातात. या वितरणाच्या किंवा वाहतुकीच्या व्यवस्था तितक्या सक्षम नाहीत. वाहतुकीमध्ये उत्पादने वाया जाण्याचे प्रमाण अधिक राहून त्याचे दर्जा कमी राहतो. परिणामी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागते. या समस्येवर मात करण्यासाठी, प्रभावी पॅकेजिंग आणि वितरण प्रणालीची आवश्यकता असते.

पॅकेजिंगचे महत्त्व

फळे आणि भाज्यांची गुणवत्ता आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी पॅकेजिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य पॅकेजिंगमुळे वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान कमी राहते. त्याचा शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना फायदा होतो.

वाहतुकीदरम्यान फळे आणि भाज्या चुरगळणे, कुजणे किंवा खराब होणे टाळण्यासाठी योग्य पॅकेजिंग आवश्यक आहे.

योग्य पॅकेजिंगमुळे फळे आणि भाज्या जास्त काळ ताजी राहतात. त्याचा साठवण कालावधी वाढते. परिणामी, त्याचा विक्रीयोग्य कालावधी वाढून शेतकऱ्यांचा फायदा होतो.

पॅकेजिंगमुळे फळे आणि भाज्यांचा रंग, चव आणि पोषण मूल्य टिकून राहते.

आकर्षक पॅकेजिंग उत्पादनाला वेगळी ओळख देते. अन्य काटेकोर निकषांचे पालन करून सातत्याने दर्जेदार उत्पादनांचा ब्रॅण्ड निर्माण होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी उच्च दर्जाचे पॅकेजिंग आवश्यक आहे.

उत्पादनाची वैशिष्ट्ये

एकूण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणारी फळे, भाजी उत्पादनांची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत.

ही उत्पादने नैसर्गिकरीत्या नाशिवंत असतात.

वातावरणातील तापमान, आर्द्रता यांच्या बदलत्या प्रमाणामुळे नुकसान होऊ शकते.

वितरणातील धक्के व त्यातून निर्माण होणाऱ्या जखमांमध्ये सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होऊन त्यात रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

या जीवशास्त्रीय वैशिष्ट्ये लक्षात घेऊन उत्पादनांसाठी योग्य पॅकेजिंग प्रणाली विकसित करणे आवश्यक ठरते. कापणीनंतरही या उत्पादनामध्ये जिवंत उती कार्यरत असतात. त्याचा श्‍वसन दर (respiration rate) उच्च असतो. परिपक्वता आणि पिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक चयापचय क्रिया सतत चालू असतात. या प्रक्रिया साठवण आणि पॅकेजिंगच्या संपूर्ण विपणन चक्रात विशेष आव्हान निर्माण करतात. त्यामुळे प्रभावी पॅकेजिंग प्रणाली विकसनामध्ये उत्पादनांच्या खालील वैशिष्ट्यांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असते.

Fruit Packaging
Food Packaging : अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमधील संधी

श्‍वसन

ताजी फळे आणि भाज्या कापणीनंतरही श्‍वास घेतात. या श्‍वसन प्रक्रियेदरम्यान वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. यासोबतच उष्णतादेखील निर्माण होते. उत्पादनाचा श्‍वसन दर जितका जास्त असतो, तितकी ती लवकर पिकतात.

पॅकेजिंगमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता मर्यादित असेल, तर सामान्य एरोबिक श्‍वसनाऐवजी ऑक्सिजनरहित (ॲनारोबिक) श्‍वसन सुरू होते. त्यामुळे पेशींमध्ये रासायनिक बदल होतात. पेशींचे विघटन होते आणि आंबण्याची क्रिया वेगाने होते. (अल्कोहोलसारखी उप-उत्पादने तयार होतात.) उत्पादनाला एक वेगळा वास आणि चव येते. ते लवकर कुजते किंवा खराब होते.

वेगवेगळ्या फळे आणि भाज्यांचा श्‍वसन दर त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार आणि पिकण्याच्या अवस्थेनुसार भिन्न असतो. उदा. पालेभाज्या आणि लवकर पिकणारी फळे यांचा श्‍वसन दर जास्त असतो, तर कंदमुळे आणि टणक फळांचा श्‍वसन दर कमी असतो.

त्यामुळे, त्या त्या विशिष्ट उत्पादनासाठी त्याच्या श्‍वसन दराला अनुकूल असे पॅकेजिंग निवडणे महत्त्वाचे असते. योग्य पॅकेजिंगमध्ये पुरेसे वायुविजन होणे गरजेचे असते. त्यामुळे उत्पादनाला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित राहील आणि ॲनारोबिक श्‍वसन टाळता येईल. उत्पादनाची गुणवत्ता टिकून आयुष्यमान वाढेल.

Fruit Packaging
Food Packaging Technology : खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी तंत्रज्ञान

श्‍वसन दरानुसार फळे आणि भाज्यांचे वर्गीकरण ः

श्‍वसन दर हा त्या उत्पादनातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या (CO२) आधारावर मोजला जातो. त्याचे एकक मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम प्रति तास (mg CO२/Kg·hr) असे असते. उत्पादनांचा श्‍वसन दर एका विशिष्ट तापमानामध्ये मोजला जातो.

विशेषतः शीतगृहामध्ये ठेवण्यात येणाऱ्या ५ अंश सेल्सिअस (किंवा ४१°F) तापमानामध्ये उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूच्या प्रमाणावर त्याचे सहा गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. (तक्ता १)

Post-Harvest Technology
Post-Harvest TechnologyAgrowon

अतिशय कमी श्‍वसन दर असलेले घटक तुलनेने जास्त काळ टिकू शकतात. त्यानंतर कमी आणि मध्यम श्‍वसन दर असलेले घटकांची साठवण कालावधी ठरते. उच्च श्‍वसन दर असलेले घटक लवकर खराब होऊ शकतात. अतिशय उच्च श्‍वसन दर असलेल्या उत्पादनांसाठी काढणीनंतर त्वरित शीतकरण आणि काळजीपूर्वक हाताळणीची गरज असते.

अत्यंत उच्च श्‍वसन दर असलेल्या घटकांनाही जलद शीतकरण करावे लागते. त्यांचा साठवण कालावधी अत्यंत कमी असल्यामुळे अत्यल्प वेळेत विक्रीचे नियोजन आवश्यक असते. या वर्गीकरणानुसार, प्रत्येक गटातील उत्पादनांसाठी योग्य साठवण आणि वाहतूक पद्धतींचा अवलंब करावा.

इथिलीन उत्पादन

फळे पिकण्याच्या प्रक्रियेत इथिलीन नावाचा नैसर्गिक वायू उत्सर्जित होतो. इथिलीन हे एक वनस्पती संप्रेरक असून, ते फळांच्या पिकण्याच्या आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेला गती देते. इथिलीन संवेदनशील भाज्या (उदा. पालेभाज्या, ब्रोकोली) या अन्य इथिलीन उत्पादक फळांच्या संपर्कात आल्यास लवकर पिवळ्या पडतात किंवा खराब होऊ शकतात. साठवणुकीदरम्यान इथिलीन उत्पादक आणि इथिलीन संवेदनशील उत्पादने वेगळी ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा उत्पादनांसाठी पॅकेजिंमध्ये इथिलीन शोषकाचा वापर करणे गरजेचे राहते.

विविध फळांचे त्यांच्या कमाल इथिलीन उत्पादन दरांनुसार वर्गीकरण केलेले आहे. सामान्यतः फळांच्या इथिलीन उत्सर्जनाचा २० अंश सेल्सिअस तापमानामध्ये मोजला जातो. त्याचे एकक मायक्रोलिटर प्रति किलोग्रॅम प्रति तास (µL/ kg·hr) हे आहे. (तक्ता २)

Post-Harvest Technology
Post-Harvest TechnologyAgrowon

या वर्गीकरणानुसार, फळांची वाहतूक आणि साठवणूक करताना त्यांच्या इथिलीन उत्पादनाच्या दराचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि आयुष्यमान टिकवून ठेवता येईल. उच्च इथिलीन उत्पादन करणाऱ्या फळांना कमी इथिलीन उत्पादन करणाऱ्या फळांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यातून उत्सर्जित होणाऱ्या इथिलीनमुळे कमी उत्पादन दराची फळे देखील लवकर पिकून खराब होऊ शकतात.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७ कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com