
डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. दीपक सावळे
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात, तर उशिराने म्हणजेच १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करण्याची शिफारस केली आहे. पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी १ क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही.
गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या ६ पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या, तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. त्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचन व्यवस्थापन करावे.
पाण्याचा ताण पडल्यास दिसणारे परिणाम
मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी
(पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी)
या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यास मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येऊन उत्पादनात घट येते.
फुटवे फुटण्याची अवस्था
(पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी)
ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.
पीक फुलोऱ्यात येणे
(पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी)
परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.
दाण्यात चिक भरण्याची वेळ
(पेरणीनंतर ९० ते १०० दिवसांनी)
या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.
दाणे टणक होण्याची अवस्था
(पेरणीनंतर ११० दिवसांनी)
या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.
उपलब्ध पाण्याचे नियोजन
एकच पाणी देणे शक्य असल्यास, ते पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी द्यावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तर तिसरे पाणी ७० ते ८० दिवसांनी द्यावे.
चार पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तिसरे ७० ते ८० दिवसांनी, तर चौथे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.
पाच पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४० ते ४५ दिवसांनी, तिसरे ५५ ते ६० दिवसांनी, चौथे पाणी ७०ते ८० दिवसांनी, तर पाचवे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.
आंतरमशागत
पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.
पीक कांडी अवस्थेत आल्यावर मजुरांच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करणे शक्य होत नाही. मजूर लावून तण नियंत्रण करताना पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकाचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
गहू पिकामध्ये चांदवेल, हराळी या सारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो.
त्याकरिता आवश्यकतेनुसार एक किंवा दोन खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी.
आंतरमशागतीच्या कामांमुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
तणनाशक फवारणी केल्यानंतर १० ते १२ दिवस पिकास पाणी देऊ नये.
तणनाशकांच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये.
खुरपणीनंतर नत्राची उर्वरित मात्रा द्यावी.
बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१ ते ३० दिवसांनी) हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) द्यावा.
पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना, १९:१९:१९ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी.
दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (२०० ग्रॅम युरिया प्रति १० लिटर पाणी)
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.