Wheat Management : गहू कापणी, साठवण करताना घ्यावयाची काळजी

Wheat Harvesting : लवकर काढणी केली असता गव्हाचे दाणे पूर्ण परिपक्व होत नसल्यामुळे पिकाचे उत्पादन घट तेत्यासाठी पेरणी वेळेनुसार योग्य पक्वतेला गहू पीक कापणीचे नियोजन करावे.
Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon

डॉ. विजेंद्र बाविस्कर

Wheat Farming : सध्या राज्यात बहुतांश भागामध्ये वेळेवर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पेरणी झालेला गहू आणि खपली गहू काढणीसाठी तयार आहे. त्याचबरोबर उशिरा पेरणी झालेला गहू फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत दिसत आहे. गहू काढणीची योग्य वेळ जाणून त्याचे वेळी काढणी करणे आवश्यक आहे.

लवकर काढणी केली असता गव्हाचे दाणे पूर्ण परिपक्व होत नसल्यामुळे पिकाचे उत्पादन घटते. याउलट गव्हाची कापणी उशिरा झाल्यास धान्य नासाडीची समस्या उद्‍भवू शकते. या वर्षी अगदी पाण्याच्या कमतरतेमध्येही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जोपासलेल्या गव्हाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी काढणीच्या या टप्प्यात योग्य ते काळजी घ्यावी. लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे या वर्षी गव्हाला चांगले दर मिळण्याची शक्यता दिसत आहे.

उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये सध्या ओंब्या बाहेर पडल्या आहेत. पाण्याची पुरेशी उपलब्धता असेल तर अशा वेळी वारा नसताना पाण्याची पाळी देणे लाभदायक ठरेल, अन्यथा गहू लोळण्याची शक्यता असते.

ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. त्यामुळे गव्हाच्या दाण्याची चकाकी कमी होते. एकूणच गहू दर्जात घट होते. अशा अवस्थेत १९:१९:१९ (विद्राव्य खत) किंवा डी.ए.पी. २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सिंचनाच्या जोडीला अन्नद्रव्यांची मात्रा मिळाल्याने दाण्याचा आकार वाढून चकाकीही वाढण्यास मदत होते.

पिकाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत तुषार सिंचनाने पाणी देणे टाळावे. कारण त्यामुळेही पीक लोळण्याची व गव्हाचा दाणा पांढरा पडण्याची शक्यता असते.

गव्हाचे दाणे कडक झाले असल्यास पाणी देणे थांबवावे. कारण पाणी पाट पद्धतीने द्यावे लागते. सध्या फेब्रुवारी आणि मार्चमधील वाऱ्यांचा वेग अधिक असतो. त्यामुळे पीक आडवे होण्याची किंवा लोळण्याची शक्यता अधिक असते.

Wheat Harvesting
Wheat Sowing : गव्हाचे क्षेत्र ९४ हजार हेक्टरने घटले

महाराष्ट्रात साधारणतः ११० ते १२० दिवसांमध्ये गहू पक्व होतो. गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडून नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे.

गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

अलीकडे गव्हाची कापणी, मळणी आणि उफणणी एकाच वेळी करणारी यंत्रे (कंबाईन हार्वेस्टर) उपलब्ध झाली आहेत. त्यातून कापणी केल्यानंतर सरळ धान्याची पोती भरून मिळतात. मात्र ती अद्याप मुबलक नसल्याने शेतकरी पक्वता गाठण्याआधीच किंवा यंत्राची वाट पाहत फार उशिरा काढणी करतात. या दोहोंमुळे नुकसान होऊ शकते. त्याचे या यंत्रामध्ये आधी कापणी केलेल्या गव्हाचे मिश्रण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Wheat Harvesting
Wheat Harvesting : गहू पीक काढणीच्या अवस्थेत

साठवण

गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्‍त अशा सुरक्षित जागेची निवड करावी.

साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठींचा वापर करावा.

पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या चादरीवर ठेवावीत.

साठवणुकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्के इतके कमी असणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन देऊन ओलाव्याते प्रमाण कमी करावी. ऊन दिल्यावर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर योग्य पद्धतीने साठवण करावी.

पुढील वर्षी पेरणीसाठी मागील वर्षीचा गहू बियाणे म्हणून वापरायचा असल्यास गहू बियाण्यास प्रति किलो १० ग्रॅम वेखंड भुकटी याप्रमाणे बीजप्रक्रिया अवश्‍य करावी.

खपली गव्हाची काढणी करताना घ्यावयाची काळजी

खपली गव्हाची कापणी करताना शक्यतो सकाळी करावी. सकाळी वातावरणात ओलावा असल्यामुळे ओंब्या गळून पडत नाहीत.

उन्हामध्ये तापमान वाढलेल्या आणि कोरड्या वातावरणात ओंब्या गळण्याची शक्यता जास्त असते. काढणी केल्यानंतर पेंड्या एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून मळणी यंत्राने मळणी करावी.

आता कंबाइन हार्वेस्टरनेसुद्धा खपली गव्हाची काढणी करता येते. मात्र त्यासाठी त्यातील सेटिंग योग्य प्रकारे बदलून घ्यावेत.

मळून तयार झालेला खपली गहू मोठ्या चाळणीवर टाकून त्यातील बाहेर आलेले गहू व काडीकचरा वेगळा करावा. यामुळे उत्पादित मालाला चांगला दर मिळण्यास मदत होते.

तयार केलेली खपली उन्हात चांगली वाळवून पोत्यात अगर कोठीत ठेवावी. घरी खाण्यासाठी लागेल तशी भरडून आणावी. भरडताना जास्त तुकडे होऊ नयेत याची काळजी घ्यावी. बाजारात खपली भरडण्यासाठी छोटे हलर उपलब्ध आहेत. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा.

डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७

(कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वयीत गहू संशोधन प्रकल्प, आनुवंशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com