Cotton Market : कापूस बाजारात तेजीचे वारे

Cotton Rate : मागील दोन आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणेचे वारे आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

अनिल जाधव

Cotton Production : मागील दोन आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणेचे वारे आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये ५०० ते ८०० रुपयांनी वाढले आहेत. देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारणेच्या बाजूने आहे. तरीही काही कारणांमुळे कापूस बाजारात चढउतारही दिसू शकतात, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. मग पुढच्या काळात कापूस बाजारात काय परिस्थिती राहू शकते? कापूस बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते? याचा घेतलेला आढावा.

यंदाच्या हंगामातील ५ महिन्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी सकारात्मक परिस्थिती खुपच कमी वेळा राहिली. सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर केला. देशात जास्तीत जास्त उत्पादन लांब धाग्याच्या कापसाचे होते. यंदाचा हंगाम सुरु झाला तेव्हा कापूस बाजार हमीभावाच्या दरम्यान होता. ऑक्टोबर महिन्यात कापसाचा भाव सरासरी ७ हजार राहिला. नोव्हेंबर महिन्यातील भावपातळी १०० ते २०० रुपयांनी जास्त होती. त्यानंतर मात्र कापसाचे भाव कमी झाले. कापसाच्या भावावर दबाव वाढला होता.

हंगामाच्या सुरवातीच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे भाव टिकून राहण्याला दोन कारणं होती.
यंदाच्या पावसाळी हंगामात सुरवातीपासूनच पाऊस कमी होता. लागवडीपासून ते पीक काढणीला येईपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी यंदा उत्पादन कमी राहील, असा अंदाज होता. त्यातच लागवडही घटली होती. २०२२-२३ च्या हंगामात देशात १२८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. पण यंदा लागवड क्षेत्रात ४ लाख हेक्टरने घट होऊन १२४ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र स्थिरावलं.

Cotton Market
Cotton Rate : कापूस भावात तेजीचे संकेत

लागवड कमी, पाऊस कमी, प्रत्यक्ष दिसत असलेली उत्पादकता कमी आणि त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने गेल्यावर्षीपेक्षा कमी दिलेला उत्पादनाचा अंदाज अशी परिस्थिती हंगामाच्या सुरवातीपासूनच होती. पण जसं जशी कापसाची वेचणी होत गेली तसतशी बाजारातील आवक वाढत गेली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारातील आवक वाढायला सुरवात झाली. डिसेंबर महिन्यात आवक चांगली वाढली. डिसेंबरपासून आवक उच्चांकी पातळीवर पोचली. विशेष म्हणजे आवकेचा दबाव दरावर येऊन भाव पडले देखील. पण आवक कायम होती. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही स्थिती होती.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रुईला उठाव वाढत होता, पण सरकीला उठाव नव्हता. तसेच सरकीचे भाव २२०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण मागील दोन आठवड्यांपासून सरकीला देखील मागणी वाढली. परिणामी कापसाला आणखी आधार मिळाला. कापसाच्या भावात सुधारणा होण्यास रुईच्या मागणीत वाढीसह सरकीला उठाव मिळाल्यानेही मदत झाली. सध्याचे सरकीचे भाव २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले. म्हणजेच सरकीचे भाव क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढले आहेत. तर सरकी पेंडचे भावही क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढून २६०० ते २७०० रुपयांवर पोचले.

Cotton Market
Cotton Market : भारतीय रुपयाचे अवमूल्यन हेच कापसातील तेजीचे कारण

देशातील भावपातळी
- सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० रुपये
- काही बाजारांमध्ये ८ हजारांचा भाव मिळाला
- जिनिंगचा भाव ७ हजार ६०० ते ८ हजारांच्या दरम्यान आहे
- सरकी भाव २ हजार ७०० ते ३ हजार रुपये
- सरकी पेंड - २६०० ते २७०० रुपये

वायद्यांमधील कापसाचे भाव
- अमेरिका - ९५.५७ सेंट प्रतिपाऊंड
(क्विंटल १७,५०० रुपये)
- चीन - १६,१३० युआन टन
( क्विंटल १८,८८० रुपये)
- एमसीएक्स - ६१,७००
(क्विंटल १७,४००)

प्रत्यक्ष खरेदीतील रुईचे भाव
- कॉटलूक ए इंडेक्स - १०७ सेंट प्रतिपाऊंड (क्विंटल १९,५५० रुपये)
- देशात - ६१ हजार रुपये प्रतिखंडी (क्विंटल १७,१३५ रुपये)
- म्हणजेच देशातील भाव ९३.८१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत
- देशातील भाव २४०० रुपयाने कमी
- म्हणजेच भाव आणखीही १२ टक्क्यांनी कमी

देशातील बाजारातील कापूस आवक
(१७० किलोच्या गाठींमध्ये)
दिनांक…आवक

१ फेब्रु…१,९७,०००
५ फेब्रु…१,६४,७००
९ फेब्रु…१,६९,२००
१४ फेब्रु…१,३७,५००
२० फेब्रु…१,२२,४००
२३ फेब्रु…१,१२,६००
२६ फेब्रु…१,०४,०००
२९ फेब्रु…९४,९००
१ मार्च…९४,१००


राज्यनिहाय सध्याची आवक (गाठींमध्ये)
राज्य…आवक…टक्के

महाराष्ट्र…३३,०००…३५
गुजरात…३०,०००…३२
उत्तर भारत…११,५००…१२.२२
मध्यप्रदेश…६८००…७.२२
तेलंगणा…५०००…५.३१
कर्नाटक…४५००…४.७८
आंध्रप्रदेश…१५००…१.६०
इतर…१८००…१.९२

हंगामातील सरासरी भाव (रुपये/प्रतिक्विंटल)
१ ऑक्टो…७०००
१५ ऑक्टो…७०००
१ नोव्हें…७१००
१५ नोव्हें…७२००
१ डिसें…६५००
१५ डिसें…६८००
१ जाने…६७००
१५ जाने…६७००
१ फेब्रु…६७००
१५ फेब्रु..६८००
२७ फेब्रु…७१००
१ मार्च…७३००

निर्यातीसाठी मागणी वाढली
निर्यातीला जबरदस्त मागणी भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने आणि अमेरिकेतील कापसाची स्टॉक कमी झाल्याने भारतातून निर्यातीला अचानक मागणी आली. फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसाठी दोनच आठवड्यात ४ लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले होते. दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढे करार झाले. तर मार्च महिन्यात निर्यातीसाठीचे ३ लाख गाठींचे करार फेब्रुवारीतच झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले. आतापर्यंत देशातून १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल, असा अंदाज होता. पण आता भारत २० लाख गाठी कापूस निर्यात करेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतून गणात्रा यांनी सांगितले. तर काहींच्या मते निर्यात २५ लाख गाठींवरही पोहचू शकते.

चीन ठरतोय गेमचेंजर
फेब्रुवारी महिन्यात भारतातून ४ लाख गाठी निर्यातीचे करार झाले, हा कापूस चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जाणार आहे. त्यातही चीन सर्वात मोठी खरेदीदार ठरला होता. चीनने फेब्रुवारीत ३ लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले. भारताचा कापूस स्वस्त आहे आणि दुसरं म्हणजे भारताकडून कापूस आयात करण्याचा खर्च अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलपेक्षा कमी लागतो. त्यामुळे या देशांची मागणी वाढली. पुढील काळातही चीन आणि बांगलादेश भारताकडून जास्त कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे.

कापूस उत्पादन आणि आवक
- सीसीआय उत्पादन अंदाज - २९४ लाख गाठी
- बाजारातील आतापर्यंतची आवक २१५ लाख गाठी
- शिल्लक कापूस ८० लाख गाठी
- सीसीआयची खरेदी ३२ लाख गाठी

उद्योगांचीही मागणी वाढणार
चालू हंगामात सुरुवातीच्या साडेचार महिने कापसाचे भाव कमी आहेत. तसेच बाजारातील आवक मागील वर्षाच्या तुलनेत जास्त होती. भाव कमी झाल्यानंतर आवक वाढतच होती. त्यामुळे उद्योगांना असा विश्वास होता की यंदा कापसाचे भाव वाढणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्याला लागणाऱ्या कापसाची खरेदी करून साठा केला नाही. परिणामी उद्योगांना भविष्यात आपली गरज पूर्ण करण्यासाठी कापसाची खरेदी करावी लागेल. याचा आधार भविष्यात कापूस भावाला मिळू शकतो.

भावाढीसाठी कोणती कारणं असतील?
- देशातील बाजारात ७५ टक्के कापूस येऊन गेला. केवळ २५ टक्के कापूस शिल्लक
- अमेरिकाचा यंदाच्या हंगामात उत्पादित झालेला ८० टक्के कापूस विकला गेला. त्यामुळे स्टॉक कमी
- चीन, बांगलादेश, व्हिएतनामची खरेदी सुरुच
- देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा १२ टक्क्यांनी कमी
- शेतकऱ्यांची विक्री कमी झाल्याने भाववाढीला सपोर्ट
- देशातून कापूस, सूत आणि कापड निर्यात वाढली
- सूतगिरण्या आणि कापड उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी
- मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही भावात खरेदी करावीच लागेल
- देशात मागणीपेक्षा पुरवठा कमी

कापूस आयात होईल का?
- सध्या देशात कापसाचा भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये आहेत
- आयात कापूस आयात शुल्काविना किमान ९ हजार ४०० रुपयाने पडेल
- देशातील भावापेक्षा आयात कापूस १५०० ते १८०० रुपयाने महाग पडेल
- लांब धाग्याच्या कापूस आयातीवर ११ टक्के शुल्कही लागू
- ११ टक्के शुल्क गृहीत धरले तर १० हजार ३०० रुपयाने आयात होईल
- त्यामुळे कापूस आयात यंदा सध्या परवडणारी नाही
- कापूस आयात व्हायची असेल तर देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळीवर पोचायला हवे
- यंदाही निर्यात जास्त आणि आयात कमी ही स्थिती राहण्याची शक्यता

भविष्यात बाजार कसा राहू शकतो?
कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली. यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत. मार्च महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहचू शकतो. तर मे महिन्यापर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात कापसाच्या भावात चांगली वाढ झाली. कापसाचे भाव मार्च महिन्यात कापूस भाव ७५०० ते ८ हजारांच्या दरम्यान राहू शकतात. तर मे महिन्यापर्यंत भावात आणखी ३०० ते ५०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

विक्री करताना घ्यायची काळजी
कापसाचे भाव वाढत असताना बाजारात चढ उतारही दिसून येत असतात. जसे तेजीला आधार देणाऱ्या घडामोडी घडत असतात तसेच भाव स्थिर होण्यास किंवा कमी होण्यासही काही कारणं पुढे येतात. याचा परिणाम काही काळ बाजारावर जाणवत असतो. तसेच काही अचानक घडणाऱ्या घडामोडीही बाजारावर परिणाम करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना आपल्याकडे किती माल आहे त्यानुसार दोन, तीन किंवा चार टप्प्यात कापसाची विक्री करावी. आपण किती काळ थांबू शकतो त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात विक्री करण्याचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरू शकते. एक महिन्यात विक्री करायची असेल तरीही वेगवेगळ्या टप्प्यात केल्यास काही प्रमाणात तेजी मंदीचा फायदा घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेऊन कापसाची विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले.

- अनिल जाधव - ८३८००८६१६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com