Mumbai News : ‘‘राज्यात आजही दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, खरीप हंमाग सुरू झाला आहे पण राज्यात बि, बियाणे, खते व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. जी खते, बियाणे बाजारात आहेत, ती बोगस आहेत.
बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. ही बोगस खते, बियाणे व औषधे गुजरात व आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहेत. राज्य सरकारने या बोगस बियाणे व खत विक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची लूट थांबवावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
टिळक भवन येथे मंगळवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पटोले यांनी विविध मुद्द्यांचा ऊहापोह केला. या वेळी माजी मंत्री अनिस अहमद व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
श्री. पटोले म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाचे सरकार हे विद्यार्थी व तरुणांची परीक्षा पाहत आहे. ‘नीट’मध्ये पेपरफुटी झाली असतानाही सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही, सरकारची भूमिका वेळकाढूपणाची व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. सरकारने नीट परीक्षाच रद्द करावी.’’
‘‘राज्यात पोलिस भरतीसाठी पावसाळा सुरू झाला असताना शारीरिक परीक्षा घेणे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. पोलिस भरतीच्या शारीरिक परीक्षांवर सरकारने फेरविचार करावा,’’ अशी मागणी श्री. पटोले यांनी केली.
‘‘राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती केली. त्यास काँग्रेसचा तीव्र विरोध आहे,’’ असेही ते म्हणाले.
‘बदनामीचा प्रयत्न’
‘‘प्रसार माध्यमांमधून माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे, परंतु त्यात फारसे तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली होती, मी वारकरी संप्रदायाचा असून, गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले होते, एका कार्यकर्त्याने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले, यात गैर काय आहे. काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कारस्थाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असे श्री. पटोले म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.